देशात कर्करोगाचे रुग्ण वेगाने वाढत असल्याची आकडेवारी आरोग्य राज्यमंत्र्यांनी लोकसभेत दिली. 2015 ते 2025 या काळात देशात कर्करोग रुग्णांची संख्या सुमारे साडेपाच लाखांनी वाढली. यात भारत जगात तिसर्या क्रमांकावर तर महाराष्ट्र देशात दुसर्या क्रमांकावर आहे. केवळ कॅन्सरच नव्हे तर माणसाने एकूणच त्याच्या वैयक्तिक आरोग्याविषयी काळजी करावी असेच निष्कर्ष विविध आरोग्य सर्वेक्षणे सतत नोंदवतात. उत्साहाने आणि ऊर्जेने भरलेले सळसळते वय, अशा शब्दात तरुण वयाचे वर्णन केले जाते. तथापि बहुसंख्य युवांना त्याच वयात दीर्घ व्याधी गाठतात.
हृदयविकार, कर्करोग, रक्तदाब अशा विकारांचा त्यात समावेश आढळतो. अनेक जण दुर्दैवाने त्यात जीवनाची लढाई हरतात. अशी घटना घडली की त्याचे वर्णन ‘त्यांना मृत्यूने अकाली गाठले’ असे केले जाते. मृत्यू दुर्दैवी खराच, पण बेताल दिनचर्या आणि अयोग्य आहार-विहार अनारोग्याला अकाली आमंत्रण देणारे ठरत असावेत का? वैद्यकीय तज्ज्ञांचे त्यावर एकमत होऊ शकेल. माणसाने बैठी जीवनशैली आत्मसात केली पण तिच्या बरोबरीने आरोग्य ही कष्टाने कमावण्याची गोष्ट आहे ही जाणीव मात्र अभावानेच रुजलेली आढळते. व्यायाम करण्यासाठी वेळ नाही किंवा दिनचर्या वेळापत्रकात बद्ध करणे शक्य नाही. हेच पालुपद वाजवले जाते.
वास्तविक अत्याधुनिक तंत्रज्ञानाने अनेक प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यात रोज नवनवीन आविष्कार घडतात. त्यामुळे माणसाची अनेक कामे सोपी झाली. कष्ट कमी झाले. याचा दुसरा अर्थ वेळेची बचत झाली असा होऊ शकेल. त्यावेळेचा विनियोग व्यायामासाठी केला जाणे शक्य आहे. यासंदर्भात जाणिवेचा अभाव असू शकेल असे तरी कसे म्हटले जाऊ शकेल? विविध प्रकारच्या माध्यमातून आरोग्याविषयी सातत्याने लिहिले जाते. समाजमाध्यमांमुळे ती प्रक्रिया काहीशी व्यापक झाली आहे. अनेक नामवंत तज्ज्ञ समाजमाध्यमांवर लोकांशी संवाद साधतात. आरोग्य सल्ले देतात. म्हणजे आरोग्य कसे राखायचे याची किमान माहिती लोकांना असू शकेल.
गरज आहे ती माणसाने स्वयंप्रेरणेने आरोग्याची काळजी घेण्यासाठी पावले उचलण्याची. अर्थात, याबाबतीत जागरूकतेचा अगदीच अभाव आहे असे नाही. लोक जागरूक होत आहेत. मैदाने आणि त्यावरील जिम मध्ये माणसांची संख्या हळूहळू का होईना पण वाढत आहे. एखादी व्याधी जडल्यावर माणसे तज्ज्ञांचे व्यायाम आणि आहार-विहाराचे सगळे सल्ले अमलात आणण्याचा प्रयत्न करतात. मधुमेह झाल्यावर वेगात चालणे सुरु करणारी आणि ते बंधन पाळणारी अनेक माणसे सापडतील. तथापि आरोग्याच्या बाबतीत ‘बैल गेला आणि झोपा केला’ अशी वृत्ती आत्मघातकी ठरू शकण्याचा धोका असतो. तेव्हा नंतर चिंता करण्यापेक्षा आधीच काळजी घेतलेली बरी.. हेच निष्कर्ष सुचवतात.