धुळे : (प्रतिनिधी) । तालुक्यातील मोहाडी (प्र. डांगरी) येथील स्मशानभुमित काल मध्यरात्री अघोळी खेळ चालला. हा प्रकार गावातील एका शेतकर्याला दिसल्याने त्याने अघोरींना हटकले. त्यानंतर सकाळी ही वार्ता गावात वार्यासारखी पसरली. अनेकांनी अघोरींची ही पूजा जवळून पाहिल्यांनंतर त्यांना चांगलाच घाम फुटला.
फागणे (ता.धुळे) व कल्याण येथील एकाच कुटूंबाविरोधात ही अघोरी पुजा केली गेल्याचे दिसून येत आहे. तेथे एकाच कुटूंबातील आठ ते दहा दहाजणांचे टाच पिना टोचलेले, फाडलेले पासपोर्ट आकाराचे फोटो, प्रत्येक फोटोवर माझी सासु, लहान दिर, चुलत सासरे, चुलत सासु, छोटी दिराणी असे लिहिलेले आहे. सरण जेथे रचतात त्या ओट्यावर एका बोकडची धडावेगळी केलेली मान, 200 ते 250 लिंबू जळालेल्या अवस्थेत, नारळ, कवड्यांचा खच, दोन कटर, दोन जिवंत कोंबड्यांचे पाय दोरीने बांधलेले होते. या लिंबूंवर हळद, कूंकू, काळा बुक्का, अत्तर शिंपडण्यात आले होते. तसेच बाजुला मृत पकडले बोकड पडलेला दिसून आला. ओट्याच्या अवतीभोवती रांगोळी काढण्यात आलेली होती. मध्यरात्री अडीच वाजता हा अघोरीचा प्रकार घडला. अघोरींसोबत काही जण कारमध्ये स्मशानात आल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. अघोरींची पूजा सुरू असतांन जवळील एका शेतातील शेतकर्याला जाग आली. त्यास स्मशानात सरण जळताना दिसले. तेथे काही जणांच्या हालचाली संशयास्पदपणे दिसल्याने त्यांनी लांबून टॉर्च चमकावली असता आपल्याला कोणीतरी बघतय याची चाहूल लागताच अघोरी आणि त्यांचे सहकारी पसार झाले. सकाळी हा प्रकाराची गावात एकाच चर्चा सुरू झाल्याने ग्रामस्थांनी स्मशानभुमिकडे धाव घेतली. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान याबाबत संबंधीत सोनगीर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास गेले असून उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.