
नाशिक, दि. ४ सप्टेंबर २०२६ (जिमाका वृत्तसेवा) : Nasik
सिंहस्थ कुंभमेळा २०२७ दरम्यान भाविक व दर्शनार्थींची सेवा करणाऱ्या धार्मिक व सेवाभावी संस्थांना १५ लाख रुपयांपर्यंत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या शासनाच्या महत्त्वपूर्ण निर्णयाच्या अनुषंगाने नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पहिल्या टप्प्यात ८४ धार्मिक संस्थांची क्यूआर कोड आधारित एकल खिडकी प्रणालीद्वारे ऑनलाइन नोंदणी पूर्ण झाली आहे. या अर्जांची पडताळणी प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुंभमेळ्यात भाविकांची सेवा करणाऱ्या धार्मिक व सेवाभावी संस्थांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पात्र संस्थांना ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन केले होते. १९ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत प्राधिकरणाच्या क्यूआर कोड आधारित डिजिटल प्रणालीद्वारे पहिल्या टप्प्यातील अर्ज प्राप्त झाले आहेत. प्राथमिक अर्जाची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत देण्यात आली होती. या कालावधीनंतर मुदतवाढीची कोणतीही विनंती प्राप्त झालेली नाही.
या डिजिटल व पारदर्शक प्रणालीमुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या इतिहासात प्रथमच गोदावरी खोऱ्यात एकत्र येणाऱ्या धार्मिक परिसंस्थेची थेट, पारदर्शक आणि परीक्षणयोग्य नोंदणी उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे, सर्व ८४ संस्थांनी कोणत्याही हस्तलिखित मध्यस्थांशिवाय डिजिटल प्रणालीद्वारे अर्ज दाखल केले आहेत.
संस्थानांचा सर्वाधिक सहभाग
प्राप्त अर्जांमध्ये ४५ संस्थानांचा समावेश असून, त्याखालोखाल १३ आश्रम, १२ आखाडे, ६ मंदिरे, ५ मठ तसेच प्रत्येकी एक धार्मिक स्थळ, साधू निवास आणि इतर संस्थेचा समावेश आहे. या सर्व अर्जांची सद्यस्थिती ‘Submitted’ असून पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. अद्याप कोणत्याही निधीला मंजुरी अथवा निधीचे वितरण करण्यात आलेले नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नाशिक जिल्ह्यातील ७१ संस्थांची नोंदणी
कुंभमेळ्याच्या नियोजित द्वि-केंद्रित धोरणानुसार नोंदणी केलेल्या ८४ संस्थांपैकी ७१ संस्था नाशिक जिल्ह्यातील आहेत. त्यामध्ये नाशिक तालुक्यातील ३५ आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील २० संस्थांचा समावेश आहे. तसेच सिन्नर ५, इगतपुरी ४, मालेगाव २, चांदवड २, दिंडोरी, निफाड आणि कळवण तालुक्यातील संस्थांनीही नोंदणी केली आहे. नाशिक जिल्ह्याबाहेरील तसेच महाराष्ट्राबाहेरील १३ संस्थांनीही नोंदणी केली आहे. यामध्ये शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान, प्रयागराज येथील पीठ, अहमदाबाद येथील आखाडा, छत्रपती संभाजीनगर येथील आखाडा तसेच पुणे, ठाणे, नंदुरबार आणि जळगाव येथील संस्थांचा समावेश आहे.
४.४८ कोटी भाविकांच्या आगमनाचा अंदाज
नोंदणी केलेल्या संस्थांनी सिंहस्थ कालावधीत ४.४८ कोटींपेक्षा अधिक भाविकांच्या उपस्थितीचा आणि ८.१५ कोटींपेक्षा अधिक मुक्कामी भाविकांचा अंदाज नोंदविला आहे. पंचवटी येथील समस्त पाथरवट समाज मारुती मंदिर संस्थेने सर्वाधिक ३.४ कोटी एकूण भाविक आणि ८ कोटी मुक्कामी भाविकांचा अंदाज व्यक्त केला आहे.
नोंदणी केलेल्या संस्थांपैकी ३१ संस्थांनी पायाभूत सोयी-सुविधांची मागणी केली असून, त्यासाठी अंदाजे ५ कोटी ६७ लाख ८५ हजार रुपयांची मागणी नोंदविण्यात आली आहे. यामध्ये क्रांतीकारी राष्ट्रसंत इंद्रदेवजी राधारास बिहारी बहुउद्देशीय संस्थेने सर्वाधिक ७७.१ लाख रुपयांची मागणी केली आहे.
प्रत्यक्ष पडताळणीनंतर प्रस्ताव प्राधिकरणाकडे
ऑनलाइन नोंदणीचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांना संबंधित संस्थांची तसेच त्यांच्या मागण्यांची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. नाशिक शहर तसेच इतर जिल्ह्यांतून प्राप्त झालेल्या मागण्यांची स्थानिक पातळीवर पडताळणी न करता संबंधित प्रस्ताव थेट नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाकडे पाठविण्यात येणार आहेत. उर्वरित अर्जांची पडताळणी करून प्रशासकीय अभिप्रायासह प्रस्ताव प्राधिकरणाकडे सादर करण्यात येतील.
प्राप्त आकडेवारीचा उपयोग भाविकांची गर्दी नियंत्रण, आरोग्य, स्वच्छता, वाहतूक व्यवस्थापन तसेच साधूग्रामच्या नियोजनासाठी करण्यात येणार आहे. धार्मिक व सेवाभावी संस्थांसाठी ऑनलाइन नोंदणी प्रणाली सुरू असून, सिंहस्थ कुंभमेळ्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उर्वरित संस्थांनी लवकरात लवकर ऑनलाइन नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.




