Saturday, October 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपडसाद : सांत्वनातील निवडकपणा आणि हरवत चाललेली माणुसकी

पडसाद : सांत्वनातील निवडकपणा आणि हरवत चाललेली माणुसकी

नाशिकमध्ये रस्ते अपघातामुळे बळी पडलेल्यांची व अपघातात जायबंदी झालेल्यांची संख्या दिवसागणिक वाढतच असल्याने लोकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. नुकत्याच घडलेल्या एका भीषण अपघातात एका व्यावसायिकाच्या मृत्यूने तर अनेकांना हादरवून सोडले. शहरातील रस्त्यांवरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे झालेल्या या दुर्दैवी घटनेत पाच निष्पाप जीवांना आपले प्राण गमवावे लागले. रस्ते सुरक्षेचा प्रश्न, प्रशासनाचा भोंगळ कारभार आणि कंत्राटदारांची मनमानी यामुळे या आधीही अनेकांचे बळी गेले आहेत. परंतु, या ताज्या घटनेनंतर जे चित्र समोर आले, ते प्रशासकीय ढिसाळपणापेक्षाही अधिक वेदनादायी आणि आपल्या राजकीय तसेच सामाजिक व्यवस्थेच्या नैतिक अधोगतीचे दर्शन घडविणारे आहे.

- Advertisement -

मार्च महिन्यात अंबड लिंकरोड भागात, ५ एप्रिलला मेरी-म्हसरुळला, ६ जूनला श्रमिकनगर, सातपूरला, २५ जुलैला मेरी-पंचवटी भागात तर २८ जुलैला एस्लो पॉइंट, अंबड एमआयडीसी येथे अशा पाच अपघातात निष्पाप नागरिकांचे बळी गेले. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी एका विशिष्ट कुटुंबाकडे सध्या सांत्वनासाठी मंत्र्यांची, पक्षांच्या प्रमुखांची आणि स्थानिक नेत्यांची अक्षरशः रांग लागली आहे. मदतीचा ओघ आणि आश्वासनांची खैरातही केवळ याच कुटुंबाच्या उंबरठ्यावर होत आहे. सांत्वन, मदत, सहकार्य करायला हवेच, त्याबद्दल कोणाचेच दुमत होणार नाही.

ज्यांनी आपल्या घरातला कर्ता माणूस गमावला त्यांचे दु:ख किती मोठे असते हे समजू शकते. मात्र, त्याचवेळी अशाच कारणाने मृत्यू पावलेल्या इतर चार मृतांच्या कुटुंबियांकडे साधे लक्ष द्यायलाही कोणत्याही नेत्याला किंवा मंत्र्याला वेळ मिळालेला नाही. पैकी एक तर निवृत्त जवान होते. मदतीत आणि सांत्वनात केलेला हा दुजाभाव अत्यंत लेशदायक आहे. मृत्यू हा सर्वांसाठी समान असतो. मृत्यूची वेदना ही गरीब-श्रीमंत, जात-पात किंवा राजकीय वजन बघून येत नाही. मग मदतीचा हात पुढे करताना व्यवस्थेकडून हा निवडकपणा का दाखवला जातो?

हा प्रश्न केवळ एका घटनेपुरता मर्यादित नाही, तर हा राजकीय व्यवस्थेला लागलेला एक नवा आणि अतिशय घातक आजार आहे. ठराविक समाजाची सहानुभूती मिळवण्यासाठी, भविष्यातील निवडणुकांची गणिते जुळवण्यासाठी किंवा व्होट बँकेचे राजकारण करण्यासाठी मृत्यूच्या दावणीलाही राजकारण बांधले जात आहे का, हा अत्यंत संतप्त करणारा प्रश्न यातून उभा राहतो. एखाद्या दुःखी कुटुंबाचे सांत्वन करणे, त्यांना आर्थिक व भावनिक आधार देणे हे कौतुकास्पद आहेच; पण ते समाजस्वास्थ्यासाठी गरजेचेही आहे. पण त्याचवेळी इतर बाधितांकडे सोयीस्करपणे पाठ फिरवणे ही घोर असंवेदनशीलता आहे. लोकप्रतिनिधी हे संपूर्ण जनतेचे असतात; ते केवळ एका विशिष्ट समाजाचे किंवा गटाचे नसतात.

जेव्हा राज्याचा एखादा मंत्री किंवा नेता मदतीचा हात पुढे करतो, तेव्हा त्यात सर्वसमावेशकता असली पाहिजे. संविधानाने सर्वांना समान हक्क दिले आहेत, मग अशा संवेदनशील प्रसंगी शासनाच्या प्रतिनिधींकडूनच असा दुजाभाव कसा काय होऊ शकतो? आजकाल राजकारणात हा जो ‘नवीन ट्रेंड’ रुढ होऊ पहात आहे, तो समाजासाठी अत्यंत घातक आहे. यामुळे समाजात विषमता आणि तेढ निर्माण होण्याची शयता वाढते. ज्या चार कुटुंबांना मदतीपासून आणि साध्या सांत्वनापासूनही वंचित ठेवले गेले, त्यांच्या भावना काय असतील याचा विचार कोणीही केलेला दिसत नाही. आधीच घरातील व्यक्ती गमावल्याचे अथांग दुःख आणि त्यात व्यवस्थेने दिलेली ही दुय्यम वागणूक त्यांच्या जखमांवर मीठ चोळणारी आहे. आमच्या माणसाच्या जीवाला काहीच किंमत नाही का? असा आर्त सवाल त्या कुटुंबांच्या मनात उभा राहिला असेल. अनेकदा सामान्य माणूस अशावेळी हतबल असतो.

ज्याच्याकडे राजकीय पाठबळ आहे, समाजमाध्यमांवर ज्याची चर्चा आहे किंवा ज्याच्या जातीचा/गटाचा प्रभाव मोठा आहे, त्याच्याच पाठीशी उभे राहण्याची ही राजकीय मानसिकता लोकशाहीच्या मूळ तत्त्वांना हरताळ फासणारी आहे. खड्ड्यांमुळे जाणारे बळी ही प्रशासनाकडून झालेली हत्या आहे आणि त्यानंतर सांत्वनात होणारा हा दुजाभाव ही माणुसकीची हत्या आहे. राज्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की, त्यांच्या पदाची खुर्ची ही समानतेच्या तत्त्वावर उभी आहे. मृत्यूच्या दुःखात राजकारण शोधण्याची आणि ठराविक समाजाला खुश करण्यासाठी सांत्वनाचा दिखावा करण्याची ही प्रवृत्ती वेळीच थांबली पाहिजे.

समाजानेही या असंवेदनशीलतेविरुद्ध सजग होऊन आवाज उठवणे गरजेचे आहे. जेणेकरून भविष्यात कोणत्याही निष्पाप मृताच्या दुःखाचे भांडवल करण्याचे आणि सांत्वनातही भेदभाव करण्याचे धाडस कोणी करणार नाही. माणुसकीला जात, धर्म आणि राजकीय गट नसतो, हे यानिमित्ताने पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याची वेळ आली आहे. शासनाची आणि लोकप्रतिनिधींची सहानुभूती ही सर्वांसाठी समान असायला हवी, तरच अशा संकटाच्या काळात समाजाचा व्यवस्थेवरील विश्वास टिकून राहील. हल्ली प्रत्येक गोष्टीतच निवडकता येत चालली आहे. आपला-परका हा वाद चार भिंतीत ठीक; पण त्याला सामाजिक आयाम प्राप्त होत चालल्यामुळे समाजातील दरी विस्तारत चालली आहे, हे चिंता वाढविणारे असल्यामुळे हा प्रपंच.

ताज्या बातम्या

यंदा ऑक्टोबर हीटचा तडाखा अधिकच; तापमानात २ ते ७ अंशांची वाढ

0
नाशिक | प्रतिनिधी राज्यात यंदा ऑक्टोबर हीटचा तडाखा अधिक तीव्रतेने जाणवत असून, ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यातच कमाल तापमानाने सरासरीपेक्षा २ ते ७ अंशांची वाढ नोंदवली आहे....