झाशी । Jhansi
उत्तर प्रदेशमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. रुग्णालयात १० नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झालाय. झाशीमधील महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमधील NICU वॉर्डमध्ये ही दुर्देवी घटना घडली. ३७ नवजात बाळांना खिडकी तोडून वाचवण्यात आले. या दुर्देवी घटनेनंतर देशात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार रात्री १० च्या सुमारास ही आगीची घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. यानंतर एकीकडे आग विझवण्याचं काम चालू असताना दुसरीकडे आगीत सापडलेले इतर नवजात अर्भकं व रुग्णांना वाचवण्यासाठी बचाव मोहीम हाती घेण्यात आली. आगीच्या घटनेनंतर रुग्णालयाच्या आवारात काही काळ मोठी गर्दी आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती उद्भवल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
झांसीचे जिल्हाधिकारी अविनाश कुमार यांनी सांगितले की कदाचित शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली असू शकते. या घटनेचा सखोल तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. जखमींना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.