Saturday, July 27, 2024
Homeनगरदहा तालुक्यांना कापडाची प्रतिक्षा!

दहा तालुक्यांना कापडाची प्रतिक्षा!

शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेशाचा मुहूर्त हुकण्याची शक्यता

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

यंदा राज्य सरकार मार्फत राबवण्यात येणार्‍या मोफत गणवेश योजना 2024-25 साठी राज्य स्तरावरून कापड येणार आहे. येणारे कापड महिला बचत गटाच्यावतीने शिवून विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आहे. मात्र, आता शाळा सुरू होण्यासाठी 14 दिवसांचा कालावधी शिल्लक असून अद्याप संगमनेर, पाथर्डी, नगर, कर्जत आणि नगर मनपा वगळता जिल्ह्यातील दहा तालुक्यांना गणवेशाच्या कापडाची प्रतिक्षा आहे. याबाबत राज्य पातळीवर संपर्क साधल्यानंतर योग्य माहिती देण्यात येत नसल्याने आता शिक्षण विभाग देखील हतबल झाला आहे. यामुळे यंदा जिल्ह्यात शाळेच्या पहिल्या दिवशी मोफत गणवेशाचा मुहूर्त हुकणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

- Advertisement -

या शैक्षणिक वर्षापासून शासनाने मोफत गणवेश योजनेत प्रत्येक गावातील महिला बचत गटाच्या प्रतिनिधी यांना कापड देवून त्यांच्या मार्फत जिल्हा परिषद आणि अनुदानीत शाळेतील पात्र शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून प्रत्येक जिल्हा पातळीवर नियोजन करण्यात येवून महाराष्ट्र शिक्षण परिषदेकडे गणवेशासाठी विद्यार्थीनिहाय कापडाची मागणी करण्यात आली. जिल्ह्यात या योजनेत 2 लाख 30 हजार विद्यार्थी पात्र आहेत. माफेत गणवेश योजना राबवण्यासाठी प्रत्येक तालुका पातळीवर गटशिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती असून ही समिती मोफत गणवेशाचे काम पाहणार आहेत. 15 जूनला सुरू होणार्‍या शैक्षणिक सत्राच्या पहिल्या दिवशी राज्यातील 44 लाख 60 हजार विद्यार्थ्यांना किमान एक गणवेश देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

प्रत्येक तालुक्यात असणार्‍या बचत गटाच्या महिला हा गणवेश शिवून शाळांपर्यंत पोहोचविणार आहेत. याबाबतचा कार्यारंभ आदेश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून देण्यात आले आहेत. दरवर्षी मोफत गणवेश योजनेत शाळा पातळीवर असणार्‍या शाळा व्यवस्थापन समितीला पैसे देवून त्यानूसार गणवेश खरेदी करण्यास सांगण्यात येत होते. मात्र, यंदापासून योजनेच्या अंमलबजावणीत बदल करण्यात आला आहे. यंदापासून राज्य पातळीवरून कापड पूरवण्यात येणार असून हे कापड महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्यावतीने चालवण्यात येणार्‍या महिला बचत गटांच्या प्रतिनिधी यांच्या मार्फत ते शिवून घेण्यात येणार आहे. मात्र, अद्याप जिल्ह्यातील दहा तालुक्यात कापडचा पत्ता नसल्याने विद्यार्थ्यांची मापे कशी ठरवणार, त्यानंतर ते कधी शिवणार आणि शाळेत कसे पोहचणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे यंदा मोफत गणवेशाचा महुर्त शाळेच्या पहिल्या दिवशी हुकण्याची शक्यता आहे.

योजनेत अनेकदा बदल
यापूर्वी विद्यार्थ्यांच्या मोफत गणवेश योजनेत शासनाने वेळोवळी बदल केलेले आहे. यापूर्वी शाळा व्यवस्थापन समितीकडे विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनूसार गणवेशाचे पैसे (अनुदान) देण्यात येत होते. त्यापूर्वी जिल्हा परिषद पातळीवर गणवेश खरेदी करण्यात येवून ते पुरवण्यात येत होते. मात्र, यात मोठा आर्थिक गफला होत असल्याने शासनाने आता बचत गटांमार्फत गणेवश शिवून देण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता कापड मिळाले नसल्याने गणवेश वेळेत कसा शिवून घ्यावा, या चिंतेत गटशिक्षणाधिकारी आणि मुख्याध्यपक आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या