अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
यंदा नगरसह राज्यातील अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. नगर जिल्ह्यात अकरावीसाठी 1 हजार 57 तुकड्या मंजूर असून या ठिकाणी 97 हजार 70 जागा उपलब्ध आहे. जिल्ह्यात दहावीचा निकाल 92 टक्के लागला असून जिल्ह्यातील 61 हजार 412 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले असून अकरावीसाठी नगर शहरासह जिल्ह्यात बक्कळ जागा उपलब्ध असल्याने पालक व विद्यार्थ्यांनी एकाच ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
यंदापासून शिक्षण विभागाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला. यासाठी मागील महिन्यांत माध्यमिक शिक्षण विभाागाने तयारी करत सर्व ज्युनिअर कॉलेज व माध्यमिक- उच्च माध्यमिक विद्यालय यांची अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे. अकरावी प्रवेशासाठी संकेतस्थळ विकसीत करण्यात आलेले असून याठिकाणी पालक व विद्यार्थ्यांना शाखानिहाय जागा व प्रवेश क्षमता पाहता येणार आहे. नगर जिल्ह्यात यु-डायसवर माहिती उपलब्ध असणारी 432 उच्च माध्यमिक विद्यालयांची संख्या असून या ठिकाणी ही ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यात अकरावीसाठी कला विभागाचे 374, वाणिज्य विभागाचे 161, विज्ञान 484 संयुक्त 29, व्होकेशनल 9 असे एकूण 1 हजार 57 अकरावीचे तुकड्या मंजूर आहेत. या ठिकाणी 97 हजार 70 जागा उपलब्ध आहे. यंदा दहावीच्या परीक्षेत 62 हजार विद्यार्थी पास झालेले असून या सर्वांनी थेट अकरावीत प्रवेश घेतल्यास जिल्ह्यात 30 हजारांहून अधिक जागा शिल्लक राहणार आहे. यामुळे यंदा अकरावी प्रवेशाचे टेन्शन राहणार नाही. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेत नियमित चार फेर्या पूर्ण झाल्यानंतर अकरावीचे वर्ग सुरू होणार आहेत.
शालेय शिक्षण विभागाच्यावतीने ठरवून दिलेल्या तरतुदीनुसार यंदा अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विहीत पध्दतीने ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. नगर जिल्ह्यात अकरावीसाठीच्या 97 हजारांहून अधिक जागा उपलब्ध असून एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाहीत. पालक व विद्यार्थ्यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता, अधिकृत संकेतस्थळावरून अकरावी प्रवेशाची प्रक्रिया राबवावी.
– अशोक कडूस, शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग.