अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत 70.57 टक्के मतदारांचे 2002 च्या मतदार यादीशी मॅपिंग पूर्ण झाले आहे. यात सर्वात जादा काम हे संगमनेर तालुक्यात 82. 74 टक्के तर अहमदनगर शहर मतदारसंघात सर्वात कमी 52. 12 टक्के काम झालेले आहे.
राज्यात मतदार यादीचा विशेष सखोल पुनर्रीक्षण कार्यक्रम मे महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. याच्या पूर्वतयारीसाठी जिल्ह्यात सध्या मॅपिंगचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील मतदार यादीत 38 लाख 46 हजार 187 मतदार आहेत. यापैकी 27 लाख 14 हजार 443 मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील 12 मतदारसंघापैकी संगमनेर मतदारसंघात सर्वाधिक 84.74 टक्के मॅपिंग झाले.

यानंतर अकोले मतदारसंघात 82.72 टक्के मॅपिंग झाले आहे. अहमदनगर शहर मतदारसंघात 3 लाख 25 हजार 686 मतदार आहेत. यापैकी 1 लाख 69 हजार 740 मतदारांचे (52.12 टक्के) मॅपिंग झाले आहे. या मतदारसंघाचे 100 टक्के मॅपिंग करण्यासाठी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी मतदारांनी महापालिका निवडणुकीत ज्या मतदान केंद्रावर मतदान केले होते, त्याच ठिकाणी मॅपिंगची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यासाठी सर्व मतदान केंद्रावर दररोज सायंकाळी पाच ते सात यावेळेत 297 बीएलओ थांबणार आहे. यावेळेत मतदारांनी येऊन आपले मॅपिंग करुन घ्यावे, असेही अवाहन पाटील यांनी केले आहे.
मतदारसंघनिहाय मॅपिंग टक्केवारी
अकोले 82.72, संगमनेर 84.72, शिर्डी 74.74, कोपरगाव 64.58, श्रीरामपूर 78.11, नेवासा 62.4, शेवगाव 75.32, राहुरी 69.58, पारनेर 68.4, नगर शहर 52.12, श्रीगोंदा 60.55 आणि कर्जत-जामखेड 76.72 यांचा समावेश आहे.




