नाशिक | प्रतिनिधी Nashik
शहरातील रस्त्यांची दुरवस्था, जीवघेणे खड्डे आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला असून युवानेते आमदार आदित्य ठाकरे उद्या गुरुवारी (दि.१३) सकाळी ११ वाजता राजीव गांधी भवनातील पक्षाच्या गटनेता कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.
शहरातील खड्डे, रस्त्यांची दुरवस्था, विविध विकासकामांमुळे नागरिकांना होणारा त्रास तसेच सिंहस्थाच्या नावाखाली सुरू असलेल्या कामांच्या नियोजनाचा मुद्दा पत्रकार परिषदेत उपस्थित केला जाणार आहे. यावेळी महापालिका प्रशासनाच्या कारभारावरही पक्षाकडून टीका होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आदित्य ठाकरे गुरुवारी (१३) नाशिक दौऱ्यावर येणार असून, ते राजीव गांधी भवनातील पक्षाच्या गटनेता कार्यालयात महापालिकेतील नगरसेवकांशी चर्चा करणार आहेत. शहरातील रस्त्यांची सद्यस्थिती, खड्ड्यांची समस्या, सिंहस्थासाठी सुरू असलेली कामे आणि नागरिकांच्या विविध प्रश्नांची माहिती ते नगरसेवकांकडून घेणार आहेत.
या बैठकीनंतर १७ ऑगस्ट रोजी खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिकेवर काढण्यात येणाऱ्या मोर्चाची दिशा निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे आजची पत्रकार परिषद आणि उद्याचा आदित्य ठाकरे यांचा दौरा या दोन्हींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
खड्ड्यांच्या प्रश्नावर नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या विशेष महासभेतही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले होते. त्यानंतर आता ठाकरे गटाने पुन्हा एकदा रस्ते आणि विकासकामांचा मुद्दा ऐरणीवर आणल्याने महापालिका प्रशासनाविरोधातील आंदोलनाची धार वाढण्याची शक्यता आहे.




