Sunday, September 8, 2024
Homeजळगावभुसावळ : ५५ मालगाड्यांद्वारे १.२६२ लाख टन कांदा निर्यात

भुसावळ : ५५ मालगाड्यांद्वारे १.२६२ लाख टन कांदा निर्यात

भुसावळ – Bhusawal

मध्य रेल्वेने मे, जून आणि १० जुलैपर्यंत ५५ माल गाड्यांमधून वाहतूक करून एक लाख टनांहून अधिक कांद्याची बांगलादेशात निर्यात केली आहे. रेल्वेसाठी ही एक मोठी कामगिरी आहे.

- Advertisement -

यामुळे शेतकर्‍यांच्या आकांक्षा पूर्ण झाल्या आहेत. तसेच शेजारी देश असलेल्या बांगलादेशच्या आवश्यक गरजा पूर्ण केल्या आहेत. देशात कांदा उत्पादनासाठी प्रसिध्द असलेल्या नाशिक, मनमाड, कोपरगाव या भागातील शेतकरी कांद्याच्या या निर्यातीमुळे समाधानी आहे. शिवाय, शेतकरी, निर्यातदार, रेल्वे आणि बांगलादेशसाठी सुद्धा ही अनुकूल स्थिती आहे.

भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून कांद्यासारख्या आवश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी करण्यात आलेल्या विनंतीनुसार रेल्वेने बांगलादेशात कांद्याची निर्यात सुरू केली. १.२६२ लाख टन कांद्याने भरलेल्या ५५ मालगाड्या भुसावळ विभागातील नाशिक, खेरवाडी, निफाड, लासलगाव आणि मनमाड स्थानकांमधून आणि तसेच सोलापूर विभागाच्या कोपरगाव, येवले स्थानकांमधून बांगला देशातील दर्शना, रोहनपूर, बिरोले आणि बेनापोल येथे पाठविण्यात आले.

दि.६ में रोजी लासलगाव ते दर्शना (बांगलादेश) येथे पहिल्या रॅक पाठविण्यात आला होता. मे महिन्यातच कांद्याच्या २७ मालगाड्यांची निर्यात करण्यात आली. जूनमध्ये २३ आणि जुलैमध्ये आतापर्यंत ५ मालगाड्या (रॅक्स) बांगलादेशात रवाना करण्यात आल्या आहेत. ५५ पैकी १३ मालगाड्या मनमाडहून, ११ निफाड, येवले १०, खेरवाडी ८, नाशिक ७, लासलगाव ५ आणि कोपरगाव येथून एक रेल्वे अशा मालगाड्या बांगलादेशात रवाना करण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वेने माल वाहतूक करणार्‍यांशी नियमितपणे घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकांच्या परिणामस्वरूप बांगलादेशात कांद्यांची निर्यात झाली आहे. जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून माल वाहतुकदारांना सर्वतोपरी मदत केली जात आहे.

लोडिंग दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकारांनी दिलेल्या निर्देशानुसार सोशल डिस्टन्सिंगचे आणि निर्जंतुकीकरणाचे उपाय योजना केल्या जात आहेत. रेल्वे माल वाहतुकीला चालना देण्यासाठी मध्य रेल्वेने मोठ्या मालवाहतूक करणार्‍या ग्राहकां समवेत व्हर्च्युअल बैठक आयोजित केली आहे. मध्य रेल्वेवरील सर्व विभागीय स्तरावर सुद्धा अशाच बैठका घेण्यात येत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या