नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – संपादक
महाराष्ट्रातील प्रमुख ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि कोटी कोटी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना सुरक्षा रक्षकांकडून मारहाण, धक्काबुक्की व अपमानास्पद वागणूक मिळण्याचे प्रकार आता वारंवार समोर येत आहेत. परवा घडलेली घटना ही अलिकडच्या दोन-तीन वर्षातील ही केवळ पाचवी-सहावी असली तरी यानिमित्ताने त्र्यंबकेश्वर मंदिर व्यवस्थापन आणि सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ही मालिका बनली आहे.
या मंदिरात महाराष्ट्र सुरक्षा बलातर्फे (चडऋ) सुरक्षा पुरवली जाते. काही महिन्यांपूर्वी एका भाविकास रक्षकांनी लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केल्याची घटना सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती, ज्याचा देशभर तीव्र निषेध झाला आणि अखेरीस प्रशासनाला संबंधितांवर गुन्हेदेखील दाखल करावे लागले. त्यानंतर व्यवस्थापनातर्फेही बरेच बदल केले गेले. असे असले तरी, या प्रकारांना पायबंद बसलेला नाही, हे परवाच्या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध झाले. अर्थात, काही विश्वस्तांच्या मते अशी घटना घडलीच नाही. पण गुन्हा दाखल झाल्याने हे गौडबंगाल काय हे पुढे यायला हवे.
तीर्थक्षेत्रांवर गर्दी होणे ही नवी बाब नाही. देशातील सर्वच तीर्थक्षेत्रांवर आजकाल कैकपटीने अधिक गर्दी होत असते. साईबाबांची शिर्डी, संत गजानन महाराजांचे शेगाव, बालाजीचे तिरुपती, अंबाबाईचे कोल्हापूर किंवा खंडोबाची जेजुरी अशा गर्दीच्या ठिकाणांवर भाविकांचा ओघ वर्षभर अखंड सुरू असतो. विशेषतः सण, उत्सव आणि सुट्ट्यांच्या दिवशी तिथे प्रचंड गर्दी लोटते. मात्र, अशा ठिकाणी भाविकांशी अरेरावी करण्याचे किंवा त्यांना मारहाण करण्याचे प्रकार अत्यंत अपवादात्मक किंवा न च्या बरोबरीत घडतात. मग त्र्यंबकेश्वरलाच असे वारंवार का घडते? हा प्रशासकीय आत्मपरीक्षणाचा विषय बनला आहे.
गर्दीचे व्यवस्थापन (उीेुव चरपरसशाशपीं) हे आज एक प्रगत आणि संवेदनशील प्रशासकीय शास्त्र बनले आहे.
जगातील आणि देशातील मोठ्या गर्दीच्या व्यवस्थापनासाठी पोलिसांना, प्रशासनाला आणि सुरक्षा यंत्रणांना विशेष प्रशिक्षण दिले जाते. गर्दीच्या वेळी भाविकांची मानसिकता कशी असते, त्यांना संयमाने कसे हाताळावे, रांगेचे नियोजन कसे करावे याचे तंत्र विकसित झाले आहे. असे असताना त्र्यंबकेश्वरमध्ये वारंवार सुरक्षा रक्षक आणि भाविक यांच्यात संघर्ष का होतो? येथे सुरक्षेसाठी नेमलेल्या कर्मचार्यांमध्ये सौजन्याचा आणि संवेदनशीलतेचा अभाव आहे का? की प्रशासनाचे त्यांच्यावर कोणतेही नियंत्रण उरलेले नाही? हे प्रश्न अनुत्तरीत आहेत.
अर्थात, या संपूर्ण प्रकरणात केवळ सुरक्षा रक्षकच दोषी आहेत असे नाही. अनेकदा रांगेत नियम मोडणे, धावपळ करणे किंवा व्हीआयपी संस्कृतीचा आग्रह धरल्यामुळे भाविकांकडूनही काही वेळा असहिष्णुता दाखवली जाते आणि अधूनमधून त्यांच्याकडूनही कागाळ्या वा गैरवर्तन होते. परंतु, शेवटी कायदा, सुव्यवस्था आणि गर्दी नियंत्रण राखण्याची मुख्य जबाबदारी ही तिथे तैनात असलेल्या यंत्रणेचीच असते. सुरक्षा रक्षक हे सुरक्षेसाठी असतात, भाविकांवर हात उचलण्यासाठी नव्हे. भाविक हा देवदर्शनासाठी आलेला एक श्रद्धाळू असतो, कोणताही गुन्हेगार नाही, याचे भान सुरक्षा यंत्रणेला कधीही विसरून चालणार नाही.
सध्या त्र्यंबकेश्वर परिसरासमोर आणि प्रशासनासमोर एका मोठ्या आव्हानाची चाहूल लागली आहे, ती म्हणजे येऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याची! त्र्यंबकेश्वरची भौगोलिक रचना, तसेच जेथे सिंहस्थ पर्वकाळातील स्नानाधी विधी व्हायचे असतात ते कुशावर्त हे पवित्र कुंड अगदीच चिंचोळ्या भागात आहे. तेथे काही हजार भाविकांची गर्दीही सामावण्याची क्षमता नाही. त्यामुळेच परवा घडलेल्या घटनांकडे नेहमीचेच म्हणून दुर्लक्ष करणे परवडणारे नाही. सिंहस्थ पर्व काळात देश-विदेशातून कोट्यवधी साधू-संत आणि भाविक नाशिक व त्र्यंबकेश्वर नगरीत दाखल होतात. त्या महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जर आजच अशा लहान-मोठ्या गर्दीच्या प्रसंगी सुरक्षा रक्षकांकडून अशी अरेरावी व अतिरेक होत असेल, तर प्रत्यक्ष सिंहस्थ पर्व काळात काय भीषण परिस्थिती निर्माण होईल, याची कल्पना करवत नाही.
गर्दी नियोजनाचे आताच योग्य आणि मानसिकदृष्ट्या प्रशिक्षण दिले गेले नाही, तर सिंहस्थासारख्या पवित्र व संवेदनशील काळात नसते बालंट येण्याची शयता नाकारता येत नाही. काहींना ही भीती अनाठायी वाटण्याचीही शयता आहे. परंतु संकटं ही काही सांगून येत नसतात. त्यामुळेच गर्दीबरोबरच ताणतणाव व्यवस्थापनाचे शास्त्रीय प्रशिक्षण वारंवार देण्याची गरज अलिकडच्या घटनांनी अधोरेखित केली आहे.
या सर्व गंभीर बाबींचा विचार करून आता केवळ कागदी घोडे नाचवून चालणार नाही, तर शासनाने आणि स्थानिक प्रशासनाने यावर अत्यंत कठोर उपाययोजना करायला हव्यात. सर्वप्रथम, महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या कर्मचार्यांचे समुपदेशन व सौजन्य शिबिरे आयोजित केली पाहिजेत. भाविकांशी गैरवर्तन करणार्या रक्षकांना प्रारंभी योग्य ती समज देणे व असले प्रकार वारंवार होणार असतील तर तात्काळ निलंबित करून कडक कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला पाहिजे.
शिर्डी किंवा तिरुपती देवस्थानच्या धर्तीवर त्र्यंबकेश्वरमध्येही आधुनिक गर्दी व्यवस्थापनाचे तंत्रज्ञान आणि कुशल मनुष्यबळ राबविणे गरजेचे आहे. अन्यथा, त्र्यंबकेश्वरची ओळख ‘भक्तांच्या आदरातिथ्याची’ ऐवजी ‘सुरक्षारक्षकांच्या दहशतीची’ अशी निर्माण होईल, जी समस्त महाराष्ट्रासाठी अत्यंत लज्जास्पद असेल.




