Saturday, July 27, 2024
Homeनगरवर्षभरात जिल्ह्यातील 15 टोळ्या हद्दपार

वर्षभरात जिल्ह्यातील 15 टोळ्या हद्दपार

अहमदनगर (प्रतिनिधी)

जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार, संघटीत गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडीत काढण्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून प्रयत्न केले जात आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पदभार स्वीकारल्यापासून संघटीत गुन्हे करणार्‍या 15 टोळ्या जिल्ह्यातून हद्दपार केल्या असून वयक्तीक गुन्हे करणारे 30 सराईत गुन्हेगारही हद्दपार केले आहेत. तसेच गुन्ह्यात शिक्षा भोगून आल्यानंतर गुन्हे करणार्‍या 11 गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार केले असल्याचे जिल्हा पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

सप्टेंबर 2020 मध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून मनोज पाटील यांनी पदभार हाती घेतल्या. यानंतर ऑक्टोबरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्वीकारला. अधीक्षक पाटील व निरीक्षक कटके यांनी गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यातील गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सराईत गुन्हेगारांची पोलीस दप्तरी नोंद असावी यासाठी मोबाईल अ‍ॅप विकसित केले आहे. यामध्ये सराईत गुन्हेगारांची माहिती भरलेली असते. मालाविरोधी व शरिराविरोधी दोन पेक्षा जास्त गुन्हे करणार्‍या गुन्हेगारांसाठी टू-प्लस योजना अधीक्षक पाटील यांनी आणली. दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या आरोपींचा यामध्ये समावेश केला जातो. खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, वाळूतस्करी, चोरी, विनयभंग, शिवीगाळ, मारहाण असे गंभीर गुन्हे संघटीतपणे करणार्‍या सराईत गुन्हेगारांच्या टोळ्या जिल्ह्यात मोठ्याप्रमाण सक्रीय आहे. या टोळ्यांविरोधात हद्दपार, मोक्काअंतर्गत कारवाई करण्याचा धडाका जिल्हा पोलिसांनी लावला आहे.

गेल्या वर्षभरामध्ये अधीक्षक पाटील, निरीक्षक कटके यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये सराईत गुन्हेगारांच्या 15 टोळ्यांना हद्दपार करण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलीस कायदा 56 अन्वये 30 सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. कोणत्याही गुन्ह्यामध्ये दोन वर्ष शिक्षा भोगून आल्यानंतर पुन्हा गुन्हे केल्यास त्यांना महाराष्ट्र पोलीस कायदा 57 अन्वये हद्दपार करण्यात येते. गेल्या वर्षभरामध्ये जिल्ह्यातील अशा 11 गुन्हेगारांना हद्दपार केले आहे. वारंवार गुन्हे करून त्या परिसरात आपली दहशत निर्माण करू पाहणार्‍या सराईत गुन्हेगार, टोळ्यांना पोलीस अधीक्षक पाटील यांनी वठणीवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

सहा टोळ्यांवर ‘मोक्का’

महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्का) अंतर्गत वर्षभरात सहा टोळ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मोक्का कारवाईचे दोन प्रस्ताव नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे प्रलंबित आहे. वारंवार संघटीतपणे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणार्‍या टोळीवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली जाते. मोक्का लावल्यानंतर आरोपीला अटकपूर्व जामीन मिळवता येत नाही. मोक्का कायद्याअंतर्गत पोलिसांना दोषारोपपत्र दाखल करण्यास सहा महिन्यांची मुदत वाढून मिळते. अधीक्षक पाटील यांनी सहा सराईत गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करून चांगलाच दणका दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या