नाशिक : ‘नाशिक रन चॅरिटेबल ट्रस्ट’तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘नाशिक रन’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने नाशिककरांनी या रनमध्ये सहभाग नोंदवला.
प्रारंभी सकाळी साडेसहा वाजता प्रथमच नाशिक रन मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जवळपास ३०० पेक्षा अधिक नाशिकच्या खेळाडूंनी सहभाग घेतला.ही मॅरेथॉन महात्मानगरपासून जेहान सर्कल, सोमेश्वर मंदिर ते पुन्हा महात्मानगर मैदान अशी १० किलोमीटरची होती.
यंदा रनचे १८ वे वर्ष असून, मॅरेथॉन संपल्यानंतर रन फॉर फन मोठ्यांसाठी साडेचार, तर लहान मुलांसाठी अडीच किलोमीटरची होती. यातही मोठ्या संख्येने नाशिककर बघायला मिळाले.
वार्मअपच्या वेळी अनेकांनी झुम्बा डान्सवर थिरकण्याला प्राधान्य दिले. वार्मअप झाल्यानंतर नाशिककरांनी प्रत्यक्ष रनला साडेसातच्या सुमारास सुरुवात केली. या रनमध्ये अबालवृधांसह नाशिकच्या विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकारी आणि नागरिकांसह विविध संदेश देत यावेळी रन पूर्ण करण्यात आली.
सातपूर अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपन्यामध्ये अनेक परदेशी पदाधिकारी होते त्यांनीही आपल्या कुटुंबासह नाशिकरन मध्ये सहभाग घेत शोभा वाढविली.
रनचे संयोजन अध्यक्ष एच. एस. बॅनर्जी, उपाध्यक्ष जी. आर. रमेश, सचिव अनिल दैठणकार, खजिनदार राजाराम कासार, विश्वस्त मुकुंद भट, प्रबल रे यांनी केले. यावेळी नाशिक पोलिसांनीदेखील चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. तसेच नाशिक पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाहतूक नियमांची होत असलेली पायमल्ली दूर करण्याचे आवाहन करत वाहतूक सुरक्षा सप्ताहात सामील होण्याचे आवाहन याप्रसंगी केले.