नाशिक । शैलेंद्र तनपुरे- दै. ‘देशदूत’ – सल्लागार संपादक
भाजपने प्रचलित राजकारणाचा सारा परिप्रेक्ष्यच अलीकडे बदलून टाकला आहे. पूर्वी लोक काय म्हणतील हा एक मोठाच नैतिक दबाव सर्वांवर असायचा. तो झुगारून देत लोकांना उपकृत करण्याची संस्कृती त्यांनी आणली. पक्षाला सतत विजयपथावर नेण्यासाठी या पक्षात जी विजिगिषू वृत्ती दिसून येते तशी अभावानेच इतर पक्षात दिसते.
भारतीय जनता पक्षाच्या आक्रमक पण अत्यंत चतूर, चलाख व लवचिक राजकारणाला दाद द्यावी की विरोधकांच्या आढ्यताखोर, अहंकारी, नेभळट व बावळट गुणविशेषणांना दोष द्यावा, असा प्रश्न पडला आहे. भाजपच्या नेतृत्वाखाली बिहारच्या विधानसभा निवडणुकीत ‘एनडीए’ने मिळविलेल्या महाप्रचंड विजयामुळे असा शोध लागला असे नव्हे तर नाशिक जिल्ह्यातील गेल्या काही महिन्यांच्या राजकीय उलथापालथीकडे पाहिल्यावर कोणालाही असेच वाटू शकेल. मध्यंतरी महाविकास आघाडीने मनसेसोबत बैठक घेऊन महापालिकेत सगळे एकत्रितरीत्या निवडणुकीला सामोरे जातील, असे जाहीर केले.
लागलीच काँग्रेसच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी पक्षाचा असा काही निर्णयच झालेला नाही, असे झुरळ झटकावे अशा थाटात स्थानिक नेत्यांचा निर्णय झटकून तर टाकलाच शिवाय या नेत्यांना नोटीसही बजावली. ही घटना पाहिल्यानंतर विरोधक, विशेषत: काँग्रेस अजूनही जमिनीवरील वास्तव स्वीकारायला तयार नाही, याची तीव्रतेने जाणीव झाली. या घटनेच्या बातमीची शाई वाळतही नाही तोच पक्षाचे माजी आमदार, माजी जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल, काँग्रेस सेवादलाचे अस्तित्व शहरात टिकवून ठेवणारे आर. आर. पाटील यांचे चिरंजीव नरेश व स्नुषा नीलम पाटील तसेच काँग्रेसचे माजी नगरसेवक गुरुमित बग्गा, शिवसेना खासदार राजाभाऊ वाजे यांचे काका पण आयुष्यभर काँग्रेस विचाराची धुरा वाहणारे हेमंत वाजे यांनीही भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याची बातमी आली.
गुरुमित बग्गा सध्या काँग्रेसमध्ये नव्हते तरीही रुढार्थाने ते काँग्रेसचेच समजले जातात. हेमंत वाजे सध्या काँग्रेसमध्ये नसले तरी त्यांच्या मातोश्री रुमिणीताई वाजे या काँग्रेसच्या आमदार होत्या. त्यांचे काका शंकर बाळाजी वाजे हेदेखील काँग्रेसचे आमदार राहिलेले आहेत. जन्मापासून काँग्रेसबरोबर असलेले कोतवाल, पाटील, वाजे, बग्गा अशी पूर्णत: काँग्रेसच्या विचारांची माणसं भाजपसारख्या उजव्या विचारसरणीच्या पक्षात जातात, तेव्हा काँग्रेसच्या एकाही वरिष्ठाला वा स्थानिकांना त्यांच्याशी संपर्क करावा, त्यांना थांबवावे असे वाटत नाही. याचाच अर्थ कणाकणाने नव्हे तर मणामणाने हा पक्ष अस्तंगत होत चालल्याची ही भयसूचक नांदी आहे. तत्पूर्वीही हेमलता पाटील, समीर कांबळे, तुषार शेवाळे, उद्धव निमसे, शिवाजी गांगुर्डे आदी कट्टर काँग्रेस विचारांच्या मंडळींना पक्षत्याग करावासा वाटला. तेव्हाही कोणी दखल घेतली नाही. आतादेखील. आढ्यताखोरपणा म्हणतात तो हा. आम्हाला फरक पडत नाही, ही मिजास पूर्वी सत्ता असताना चालून जात असे. पक्ष दिवसेंदिवस ओसाड होत चालला आहे. असे असताना जे उरलंय ते सांभाळायचीही कुवत वा इच्छा नसेल तर भाजपच्या राजकारणाच्या नावाने बोटे मोडणेही योग्य नाही.
यापैकी काही जणांनी स्वार्थापोटी पक्षत्याग केला असे समजूया, पण या मंडळींना पक्षात थांबावेसे वाटत नाही, आपल्याला काही भवितव्य आहे असे वाटत नाही हे समजून तरी किमान पुढच्यांना थांबवण्यासाठी काही पावले उचलली, असेही घडले नाही. जणू लोकांनी जावे अशीच रणनीती काही नेत्यांची दिसली. लोकसभा निवडणुकीत धुळेसारख्या जागेवर काँग्रेसचा विजय झाला. तो कसा याच्या खोलात शिरण्यापेक्षा नंतर संबंधित खासदार शोभाताई बच्छाव यांनी पक्षासाठी काय केले असे विचारले तर काहीच उत्तर येत नाही. किंबहुना या विजयात महत्त्वाचा वाटा असलेले माजी आमदार कुणाल पाटील हेच भाजपमध्ये चालते झाले. त्यांचे काही वैयक्तिक विषय असू शकतील. परंतु पिढ्यान्पिढ्या काँग्रेसमध्ये असणारी, सत्तेची ऊब मिळविणारी माणसं अशी सहज जातात, त्याचा काही अर्थ लावून तरी हा पक्ष पुढची पावले टाकणार आहे का, हा खरा प्रश्न आहे. हे अशासाठी की, नाशिकमध्ये पक्षाची कशी तोळामासा स्थिती आहे, याची माहिती असूनही अमयाबरोबर जाणार नाही, अशी आडमुठी भूमिका घेतली जाणार असेल तर जी काही तोळामासा अवस्था आहे तिच्यातही घसरण व्हायची.
लोकांना फाट्यावर मारा संस्कृती
दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए असे हिंदीत एक वचन आहे. तुमच्यात धमक असेल तर तुम्ही जगालाही नमवू शकता, असा त्याचा मराठी अर्थ. भारतीय जनता पक्षाने गेल्या दहा-बारा वर्षांपासून ही धमक दाखवून अक्षरश: सर्वांनाच झुकायला लावले आहे. भले त्यांनी त्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबिले असतील, पण राजकारण करताना चांगल्या-वाईटाच्या सांधीत अडकण्याच्या भानगडीत ते पडले नाहीत. प्रेमात व युद्धात सारे क्षम्य असते असे म्हणतात. भाजपने या उक्तीचा विस्तार करून ती राजकारणापर्यंत आणली. त्यामुळेच त्यांना पक्षात कोणी येणार असतील तर त्यात ते डावेउजवे करीत नाहीत. फक्त अशांचा पक्षाला फायदा किती एवढेच ते बघतात. साहजिकच त्यांना सगळेच चालतात.
मुळात भाजपने प्रचलित राजकारणाचा सारा परिप्रेक्ष्यच बदलून टाकला आहे. पूर्वी लोक काय म्हणतील हा एक मोठाच नैतिक दबाव सर्वांवर असायचा. कोणतेही निर्णय घेणे असो, योजना जाहीर करणे असो, कोणाला पक्षात घेणे असो वा अगदी कोणावर कारवाई करणेही असो, अशा प्रत्येक वेळी लोक काय म्हणतील याचा विचार पक्षातील ज्येष्ठ मंडळी करीत असायची. आता लोकांना फाट्यावर मारण्याची संस्कृती उदयास आली. भाजपने तर कुणाचा तरी विचार करावा या गृहीतकाचीच मोडतोड करून टाकली. त्याऐवजी लोकांना उपकृत करा, ही नवी युक्ती त्यांनी यशस्वी करून दाखविली. मोदींचा व्यक्तिगत करिश्मा त्यासाठी महत्त्वाचा ठरला हे खरे असले तरी त्याबरोबरच त्याचा लाभ उठवून पक्षाने बारा महिने चोवीस तास राजकारण करण्याचा मापदंड घालून दिला.
निवडणुकांचा सतत विचार डोक्यात ठेवूनच भाजपचे नेते अहोरात्र काम करीत असतात. त्याचमुळे सुधाकर बडगुजर, सुनील बागुल, हेमंत शेट्टी, विक्रम नागरे, मुकेश शहाणे, गणेश गिते, विशाल संगमनेरे अशांना पक्षात घेताना भाजपला काहीच वाटले नाही. अशाप्रसंगी ते मातृसंस्था असलेल्या रा. स्व. संघालाही अलगद बाजूला सारतात. किंबहुना ही माणसं कशी पक्षाच्या उपयोगाची आहे, हे ते असे काही पटवून देतात की प्रश्न विचारणार्याचीच गोची होते. वर उपरोल्लेखित माणसांपैकी काहींना पक्षात घेताना किंवा पुनर्प्रवेश देताना पक्षातील आमदारांपासून अनेकांनी केलेला विरोधही नाशिककरांनी अनुभवला आहे. सुधाकर बडगुजर, सुनील बागुल असो वा गणेश गिते यांच्या प्रवेशाला सीमाताई हिरे व राहुल ढिकले या दोन्ही आमदारांसह पक्षाच्या अनेक पदाधिकार्यांनीही विरोध केला होता. पण, गिरीश महाजनांनी एखादा फुलटॉस थेट प्रेक्षागारात टोलवून षटकार खेचावा तसा सगळ्यांचा विरोध झुगारून देत हे प्रवेश करून घेतले.
सुनील बागुल यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर बालंट आले तेव्हा याच पक्षाने मी नाही त्यातली, अशी भूमिका घेत गुन्हेगारांना आम्ही पाठीशी घालणार नाही, असा नैतिकेतचा आवही आणला. पक्षाच्या काही मान्यवरांवर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर शिंदे गटाच्या नेत्यांनी जेवढी आदळआपट केली तेवढी भाजपने केली तर नाहीच उलट पोलिसांना कसा ‘फ्री हॅण्ड’ दिला हे जाहीर सांगून नाशिककरांची पसंतीही मिळविली. ज्यांच्यावर पोलीस कारवाई करीत आहेत, त्यांना पक्षातून काढण्याचा मानभावीपणाही भाजपने दाखविला नाही, हा तर त्यांच्या राजकारणाचा मास्टरस्ट्रोकच. म्हटले तर ते पक्षात आहेत आणि म्हटले तर त्यांना आम्ही पाठीशी घालत नाही, हे सांगायलाही मोकळे. हा जो चतूर वा चलाखपणा आहे, तो विरोधकांपाशी नाही, हे निर्विवाद. त्याचमुळे ते प्रत्येक निवडणुकीला आपटी खात आहेत.
कोतवालांचा भ्रमनिरास
शिरीष कोतवाल असो वा गुरुमित बग्गा यांचे भाजपमध्ये जाणे अनेकांना धक्कादायक वाटले असणार. कोतवाल यांनी तर गेली पन्नास वर्षे चांदवडमध्ये पक्ष जिवंत ठेवला. आठ वेळा विधानसभा निवडणूक लढविली. पैकी सहा वेळा पराभव पत्करला. चांदवड बाजार समिती, जिल्हा बँक, चांदवड ग्रामपंचायत, मराठा विद्या प्रसारक समाज अशा सर्वच स्थानिक संस्थांवर कोतवाल यांचा प्रभाव राहिलेला आहे. पण विधिमंडळात त्यांना यश येत नव्हते. एकदा यश आले पण त्यातही त्यांना पक्षांतराची अवदसा आठवली अन् अपात्रता ओढवून घेतली. पण नंतर पुन्हा पक्षात आल्यानंतर त्यांनी जिल्हाध्यक्षपदही भूषविले. लोकसभा निवडणुकीत त्यांनी धुळे मतदारसंघात लक्षणीय कामगिरी बजावली. पक्षाच्या वाढत्या दुर्लक्षामुळे ते चिंतित तर होतेच शिवाय पक्षाचे सर्वच बोलघेवडे नेते लोकांशी संपर्काबाबत मात्र फारसे अनुकूल नसत. ना प्रदेशाध्यक्ष ना विभागीय नेते. कोणालाच लोकांकडे जाणे प्रशस्त वाटत नव्हते. अशावेळी स्थानिक नेते करून तरी काय करणार, अशा उद्विग्न अवस्थेत अलीकडे कोतवाल होते. त्यांचा विधानसभेत झालेला दारूण पराभव ही कदाचित शेवटची काडी पडली असेल.
पण नंतर पक्षानेही दुर्लक्ष करायला सुरुवात केल्यानंतर त्यांना मोदींचा विकास आठवला. गुरुमित बग्गा यांची अवस्था तर आणखीनच बिकट करून ठेवली होती. पक्षाशी मतभेद झाल्यानंतर कोणत्याही इतर पक्षात न जाता बग्गा यांनी महापालिकेत अपक्ष राहणे पसंत केले होते. पक्षाची स्थिती दिवसेंदिवस अवघड होत चालल्याचे पाहून काहींनी बग्गांना पक्षात घेऊन शहराध्यक्ष करण्याचा प्रस्ताव दिला. तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी भेटीगाठी झाल्या. सगळं काही ठरलं. पण नंतर नेहमीच्याच माशा शिंकल्या. कोणाला पद मिळणार असेल तर उर्वरित सगळे जण त्याच्या विरोधात त्याच दिवसापासून आघाडी उघडायला मोकळे होतात, ही शहर काँग्रेसची खासियत. साहजिकच बग्गांनाही तोच अनुभव आला. त्यांनी नंतर स्वत:च नकार कळवून तटस्थ राहणे पसंत केले. अशा व्यक्तीस आपल्याकडे खेचून आणणे सोपे खचितच नाही. पण ते भाजप जेव्हा करतो, तेव्हा त्यातून त्यांची लवचिकता दिसून येते.
एका प्रभागात तरी बग्गा आपल्याला पुढे नेऊ शकतात हा खोलवरचा विचार ज्या पद्धतीने भाजप करतो तसा विरोधकांना करता येत नाही. त्यासाठी जमिनीवरील वास्तवता माहिती असावी लागते. ती सतत लोकांमध्ये राहूनच कमावता येते. जे आले त्यांच्यासोबत आणि जे नाही येत त्यांना कसे आणायचे ते बघूच, असा क्रांतिकारी विचार भाजपमध्ये असतो. कुणाल पाटील, सुनील बागुल, सुधाकर बडगुजर, तुषार शेवाळे, संजय इंदुलकर आदींच्या बाबतीत हे असे अनुभव आलेले आहेत. पिंपळगावच्या भास्कर बनकरांबाबत हे आज शय झाले नसले तरी ते उद्या होणारच नाही असे नाही.
विजिगिषू भाजप
भाजपमध्ये सत्तेसाठी सध्या ज्या पद्धतीचे राजकारण चालले आहे, त्याचे समर्थन करण्याचा हेतू अजिबात नाही. परंतु पक्षाला सतत विजयपथावर नेण्यासाठी या पक्षात जी विजिगिषू वृत्ती दिसून येते तशी अभावानेच इतर पक्षात दिसते. पक्ष चालवितांना विविध स्वभावधर्माचे लोक गरजेचे असतात, असा विचार करून अशांना घोळात घ्यायचे आणि वेळ आली की त्यांनाही असा काही जमालगोटा द्यायचा की त्यांना गपगुमान राहण्याविना पर्यायही ठेवायचा नाही. नाशिकमधील काही लोकांच्या संदर्भात हे अनुभव आले. पण एकानेही आम्हाला भाजपने फसविले असे म्हणण्याची हिंमत केली नाही. पदरात पडलं पवित्र झालं, या न्यायाने सगळेच सोमेगोमे शांत आहेत. या स्थितीचाही भाजप पालिका निवडणुकीत फायदा करून घेईल आणि विरोधक केवळ खडे फोडत बसतील.




