मुंबई – हवामान बदलावर आपल्या बुलंद आवाजाने संपूर्ण जगभरात चळवळ उभारणारी स्वीडनमधील पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिला टाइम मॅगझीनने पर्सन ऑफ द इयर पुरस्काराने गौरवले आहे.
ग्रेटा ही अवघ्या 16 वर्षांची असून, हा बहुमान मिळालेली ती आजवरची सर्वात तरुण व्यक्ती ठरली आहे. जगप्रसिद्ध टाइम मासिकाद्वारे 1927 पासून पर्सन ऑफ द इयर निवडण्यात येतो. ग्रेटा थनबर्ग या वर्षाच्या शेवटच्या टाइम मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकली आहे.
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातच ग्रेटाने स्वीडनच्या संसदेसमोर आंदोलन केलं होतं. ग्रेटाने मागील वर्षी हवामान बदलांबद्दलच्या जागृती मोहिमेला सुरुवात केली होती. स्वीडनच्या संसदेसमोर दर शुक्रवारी ती निदर्शने करत होती. ग्रेटाच्या या कृत्याची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली.
संपूर्ण जगभरातून ग्रेटाच्या या कृतीचं कौतुक करण्यात येत होतं. मग ते रस्त्यावर उतरून करण्यात आलेली आंदोलनं असो किंवा संयुक्त राष्ट्राची बैठकीत काही देशांविरोधात करण्यात आलेलं तिचं भाषण, ग्रेटाने पर्यावरणाच्या संवर्धनासाठी नेहमी आवाज उठवला आहे.