Saturday, May 4, 2024
Homeधुळेधुळ्यात 160 लिटर भेसळयुक्त दुध केले नष्ट

धुळ्यात 160 लिटर भेसळयुक्त दुध केले नष्ट

धुळे । प्रतिनिधी dhule

शहरात विक्रीसाठी येणारे 160 लिटर भेसळयुक्त दूध आज जिल्हा दूध समितीच्या पथकाने नष्ट केले. शहरातील साक्रीरोडमार्गाने धुळे शहरात येणारे दुधाची वाहने अडवून ही कारवाई करण्यात आली. यावेळी 12 वाहनांची तपासणी केली असता त्यापैकी आठ वाहनांमध्ये दुधात पाण्याची भेसळ केल्याचे आढळून आले. कारवाईत जप्त केलेल्या दुधाच्या कॅन गटारीत सोडण्यात आल्या.

- Advertisement -

धुळे शहरात ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात दूध विक्रीसाठी आणले जाते. मात्र, भेसळयुक्त व पाणीमिश्रीत दूध येत असल्याच्या तक्रारी अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांच्या कडे आल्या. त्यामुळे जिल्हा दूध भेसळ समितीच्या बैठकीतही सदर मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.

दुधातील भेसळ रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाप्रमाणे समिती स्थापन करण्यात आली आहे. यावेळी श्री.केकाण यांनी दूध भेसळ रोखण्यासाठी समितीला आदेश दिलेे. त्यानुसार दूध भेसळ समितीच्या पदाधिकार्‍यांनी आज सकाळी साक्रीरोडवरील बजरंग मिल्क केंद्राजवळ वाहने अडवून कारवाई केली. यावेळी सुमारे 12 पशुपालकांची वाहने अडवून त्यांच्याकडील दुधाची तपासणी करण्यात आली. या तपासणीत बारा पैकी आठ वाहनांमधील दुधामध्ये पाण्याची भेसळ केल्याचे आढळून आले. त्यामुळे पथकाने या वाहनांमधील सुमारे 160 लिटर दुध गटारीत टाकून नष्ट केले. सदर पशुपालक हे सांजोरी व मोराणे आदी भागातून आले होते.

सदर कारवाई जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी डॉ.अमित पाटील, अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त संतोष कांबळे, सहायक जिल्हा दुग्धव्यवसाय अधिकारी विजय गरुड, पशुसंवर्धन आयुक्त डॉ.आर.एम.शिंदे, लिपिक पितश गोंधळी यांच्या पथकाने केली.

जनावरांचे दूध काढल्यापासून ते ग्राहकाला विक्री होईपर्यतच्या साखळीत कोणीही दुधात भेसळ करु नये, अन्यथा अन्न व औषध प्रशासनाकडून नियमानुसार फौजदारी कारवाई केली जाईल. तसेच दर पंधरा दिवसांनी कुठेही अचानक भेट देवून तपासणी केली जाईल, याची नोंद दूध वितरकांनी व दूध संकलकांनी घ्यावी, असा इशारा डॉ. अमित पाटील यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या