सिन्नर । प्रतिनिधी Sinnar
आम्हाला सत्तेची पाच वर्षे मिळाली नाहीत. जेमतेम अडीच वर्षे मिळाली. त्यातील एक वर्ष करोनात गेले. मात्र, उरलेल्या दीड वर्षात राज्यातील 288 मतदार संघांमध्ये सर्वाधिक 17 हजार कोटींचा निधी सिन्नरला दिला आहे. तेवढा निधी माझ्या बारामतीलाही दिला नाही. आम्ही आमचे काम केले, आता सिन्नरच्या मतदारांनी अॅड. कोकाटे यांना पहिल्या क्रमांकाची मते देऊन निवडून द्यावे. त्यांना मंत्रिपद देणार हा अजितदादांचा वादा आहे. मी बोलतो तसेच करतो. सत्तेवर आल्यानंतर अॅड. कोकाटे यांना महत्त्वाच्या पदावर बसवतो, असा शब्द उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिला.
महायुतीचे उमेदवार अॅड. माणिकराव कोकाटे यांच्या प्रचारार्थ पोस्ट कार्यालयासमोर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर माजी खासदार देवीदास पिंगळे, गोदा युनियनचे चेअरमन लक्ष्मण सांगळे, बाजार समितीचे सभापती शशिकांत गाडे, स्टाईसचे चेअरमन नामकर्ण आवारे, भाजपचे तालुका प्रभारी जयंत आव्हाड, पी. जी. आव्हाड, प्रा. त्र्यंबकराव खालकर, जि.प.चे माजी सभापती अॅड. राजेंद्र चव्हाणके यांच्यासह भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी विरोधकांनी पसरवलेल्या चुकीच्या समजामुळे महाराष्ट्रातील जनता फसली. हे संविधान बदलणार, आपकी बार 400 पार, हिंदू राष्ट्र बनवणार, मुस्लिमांना पाकिस्तानात पाठवणार असा प्रचार विरोधकांनी केला. त्यामुळे जनता फसली. कांदा निर्यात बंदीमुळे नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यात आम्हाला जबरदस्त किंमत मोजावी लागली. मात्र, आम्ही मागे लागून निर्यातबंदी उठवली. त्याचा फायदा बळीराजाला होतो आहे. राज्यात विविध योजना राबवण्यासाठी केंद्र सरकार प्रतिसाद देत आहे. लाडकी बहीण योजनेला विरोधक चुनावी जुमला म्हणत होते.
मात्र, माझ्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रक्षाबंधनापासून भाऊबीजेपर्यंत बहिणींच्या बँक खात्यात पैसे टाकले. टीका करणार्यांचे सरकार असताना त्यांनी सव्वा रुपया तरी दिला का असा प्रश्न अजितदादांनी विचारला. राज्यातल्या बहिणींना आम्हाला सक्षम करायचे आहे. स्वयंपाक, रोजगार हमीच्या कामावर जाणार्या आमच्या बहिणींनाही मन आहे, त्यांनाही स्वतःसाठी काही करावे असे वाटते. त्यांच्यासाठी आम्ही ही योजना आणली. शेतकर्यांचे विज बिल माफ केले. दुधाला 28 रुपयांचा भाव होता, तेव्हा सात रुपयांचे अनुदान दिले. ऑक्टोबरपासून दुधाचा भाव 35 रुपये केला. तरुणांना सहा महिन्यांसाठी सहा हजार, आठ हजार, दहा हजार रुपये आम्ही देतोय. सरपंच, पोलीस पाटील, अंगणवाडी सेवकांपासून होमगार्ड पर्यंत सर्वच घटकांचे मानधन आम्ही वाढवले.
या सर्व योजना पुढेही सुरू राहण्यासाठी महायुतीला निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. मिळालेल्या सत्तेचा वापर सर्वसामान्यांसाठी करायचा ही आम्हाला शिकवण असून काम करताना आम्ही कधीही जातीचा, धर्माचा विचार केला नाही. सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन राज्याचा कारभार केला. आताही उमेदवार देताना सोशल इंजिनिअरिंग केले असून साडेबारा टक्के जागा आदिवासी, मागासवर्गीयांना, दहा टक्के जागा महिलांना तर दहा टक्के जागा मुस्लिमांना दिल्या आहेत. आम्हाला राज्य प्रगतीपथावर न्यायचे आहे. त्यासाठी मोदी यांची मदत घेत आहोत.
राज्यात महायुतीची सत्ता आली तर केंद्राचा निधी कमी पडू देणार नाही असा शब्द पंतप्रधान मोदींनी दिला असल्याची माहिती पवार यांनी दिली. आपल्या भागाचा विकास करण्यासाठी महायुतीच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे केंद्राचा निधी आणता आला. आत्तापर्यंत केंद्राने महाराष्ट्राला दहा लाख कोटींचा निधी दिला असल्याची माहिती त्यांनी दिली.
अशा गद्दारांना थारा देऊ नका
या निवडणूकीत अनेक वावड्या, अफवा पसरवल्या जात आहेत. ज्यांचं चारित्र्य, इतिहास वाईट आहे, तेच असा संभ्रम निर्माण करीत आहेत. ज्यांचा इतिहासच विश्वासघात आहे, अशी माणसे केविलवाणा प्रयत्न करीत असून त्यांचे मनसूबे तालुक्यातील जनता पूर्ण होऊ देणार नाही असे आ. कोकाटे म्हणाले. लोकसभा निवडणूकीपूर्वी 6 सप्टेंबरला तुम्ही आतून सहकार्य करा असा प्रस्ताव आला होता. मात्र, आपण छत्रपतींचे वारसदार असून अशा पध्दतीने पाठीत खंजीर खुपसणे हा आपला धंदा नसल्याने मी प्रस्तावास स्पष्ट नकार दिला. मी युध्द समोर लढतो. जी माणसं आता खासदारांच्या नावाखाली मते मागत आहेत, ती माझी मदत मागत होती असा आरोप आ. कोकाटे यांनी केला. ज्यांनी आदिवासी, वंजारी समाजाच्या जमिनी लुटल्या. शहरातील जमिनींवरील आरक्षणं उठवली. त्यांना उद्धव ठाकरे यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिले तरीही ते स्वत:च्या समाजाला न्याय देऊ शकले नाहीत. समाजाच्या एकाही गावासाठी त्यांनी निधी दिला नाही. त्यांना असलेला पैशाचा माज येत्या 20 तारखेला जनताच उतरवेल असा इशारा कोकाटे यांनी दिला. खासदारांना माझे सांगणे आहे, अशा गद्दारांना थारा देऊ नका. अशा प्रवृत्ती माझ्याकडे असत्या तर कधीच हत्तीच्या पायाखाली घातल्या असत्या. अशी विश्वासघातकी माणसं समाजकारणातून खड्यासारखी दूर केली पाहिजेत असा टोला कोकाटे यांनी लगावला.
अजितदादांचे हात बळकट करा
वंचित बहुजन आघाडी व आरपीआयने एक रुपयाही न घेता आपल्याला पाठिंबा दिला आहे. संपूर्ण तालुका माझ्यामागे उभा असल्याचा मला अभिमान आहे. तालुक्याचे प्रश्न मीच सोडवू शकतो हा विश्वास जागवण्याचा काम गेल्या 20 वर्षांपासून मी करतो आहे. तालुक्याचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. मात्र, मनासारखे करायचे अजून बरेच बाकी आहे. तालुक्याचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर राज्यात पुन्हा युतीचं सरकार आलं पाहिजे. अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी मला विधानसभेत पाठवा. मात्र, कमीत कमी 1 लाख मतांनी विजयी झालो तरच मला समाधान लाभेल असे आ. कोकाटे म्हणाले.
हा कोकाटेंचा मनाचा मोठेपणा
मध्यंतरी बारामती ऐवजी दुसर्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी असा विचार मनात आला होता. त्यावेळी कोकाटे यांनी सिन्नरला बोलावले आणि सिन्नर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची विनंती केली, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. प्रत्येक काम जीव ओतून करण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी सिन्नरमध्ये उभी केलेली प्रत्येक इमारत अगदी बस स्थानक, नगर परिषद, पंचायत समिती, तहसीलची इमारत शहराच्या वैभवात भर टाकणारी आहे. दूरदृष्टी असणारा माणिकरावांसारखाच लोकप्रतिनिधी असला पाहिजे असं माझं मत असल्याचे ना. पवार म्हणाले. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे स्मारक व्हावे यासाठी पाठपुरावा करणार्या कोकाटे यांच्यामुळे डिसेंबर 2023 मध्येच स्मारकासाठी 483 कोटींचा आराखडा मंजूर केला असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यातील 386 कोटी पहिल्या टप्प्यासाठी तर 96 कोटींचा निधी दुसर्या टप्प्यासाठी माझ्याच नियोजन खात्याकडून मंजूर केला आहे. त्यामुळे या स्मारकासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असा शब्द ना. पवार यांनी दिला.
या स्मारकाची जागा इगतपुरी तालुक्यातील कळसुबाई शिखराच्या जवळ आहे. त्यामुळे केंद्राच्या पर्वतमाला निधीतून स्मारक ते कळसुबाई शिखरापर्यंत रोप-वे टाकण्याचा विचार आहे. या परिसराला पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचा मानस असून पंतप्रधान मोदी, अमित शहा, नितीन गडकरी, पीयुष गोयल यांच्याशी चर्चा करून तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला असल्याची माहिती अजितदादांनी दिली. पूरचार्यांच्या माध्यमातून बळीराजाच्या शेतीला पाणी देण्याचे महत्त्वाचे काम कोकाटे यांनी केले असून देवनदी-दमनगंगा नदी जोड प्रकल्पामुळे सिन्नरच्या कपाळावरचा अवर्षणग्रस्त हा कलंक कायमचा पुसला जाणार असल्याचे ते म्हणाले.