नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik
जुन्या भांडणाची कुरापत काढून चार ते पाच जणांच्या टोळक्याने एका महाविद्यालयीन तरुणावर धारदार शस्त्राने वार करून जखमी केल्याची घटना पाथर्डी फाटा येथील दामोदर नगर परिसरात घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रितेश लाटे (१७, रा. स्वराज्य नगर, पाथर्डी फाटा जवळ) हा अकरावी मध्ये शिकणारा महाविद्यालयीन तरुण सायंकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास दामोदर चौकातील नरहरी लॉन्स समोर उभा होता. यावेळी आलेल्या चार ते पाच जणांच्या टोळक्याने त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले या घटनेत रितेशाला गंभीर दुखापत झाली त्याला उपचारार्थ पाथर्डी फाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रितेश प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
घटनेची माहिती समजताच उपायुक्त परिमंडळ -२ मोनिका राऊत,सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, इंदिरा नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके , गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्यासह पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस तपासामध्ये काही संशयीतांचे नावे निष्पन्न झाले असून लवकरच संशयितांना अटक केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.