Saturday, November 23, 2024
HomeनगरSchool Uniform : अर्धे वर्ष संपवूनही १७ हजार विद्यार्थ्यांना गणवेशाची प्रतिक्षा

School Uniform : अर्धे वर्ष संपवूनही १७ हजार विद्यार्थ्यांना गणवेशाची प्रतिक्षा

अहिल्यानगर । प्रतिनिधी

यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन चार महिने लोटले. आतातर दिवाळी आली असून अर्धे शैक्षणिक वर्ष देखील संपणार आहे. तरीही जिल्ह्यातील १७ हजार शालेय विद्यार्थ्यांना सरकारी गणवेश मिळालेले नाही. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना जुन्याच गणवेशात शाळेत यावे लागत आहे.

- Advertisement -

दरम्यान, मिळालेले गणवेशही मोजमापानुसार नसून लहान-मोठे गणवेश घालण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. दुसरीकडे पहिलाच गणवेश मिळालेला नसल्याने सरकारने घोषित केलेला दुसरा स्काऊट- गाईडचा गणवेश कधी मिळणार असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांसमोर आहे.

समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था, तसेच खासगी अनुदानित शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी दोन गणवेश देण्यात येतात. पूर्वी या दोन गणवेशांचे पैसे (प्रति गणवेश ३०० रुपये) शासनाकडून शाळा व्यवस्थापन समितीकडे (एसएमसी) वर्ग करण्यात येत होते. त्यानंतर एसएमसी हा गणवेश बाजारातून खरेदी करत होती;

मात्र यंदा या गणवेश योजनेत बदल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना यंदा नियमित गणवेशाचा एक संच आणि स्काऊट गाईड गणवेशाचा एक संच पुरविण्याचे शासनाने जाहीर केले. त्यानुसार थेट पैसे न देता या गणवेशाचे कापड शाळांना पुरवण्यात आले आहे. शाळांनी हे कापड महिला बचत गटांकडून शिवून घ्यायचे होते. त्यासाठी शासन महिला बचत गटांना शिलाई देणार होती.

नगर जिल्ह्यात १५ जूनपासून शाळा सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यात २ लाख १२ हजार ७३३ विद्यार्थी गणवेशास पात्र आहेत. आतापर्यंत त्यातील १ लाख ९५ हजार २५४ विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले आहेत. म्हणजे चार महिन्यांनंतरही १०० टक्के विद्यार्थ्यांना गणवेश पुरवण्यात शिक्षण विभाग अपयशी ठरला आहे. अजूनही १७ हजार विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत.

यंदाच्या गणवेश योजनेला शाळेच्या पहिल्या दिवसांपासून उशीर झाला. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांपर्यंत गणवेशाचे कापडच मिळाले नाही. याबाबत जिल्हा परिषद शिक्षण विभाग पाठपुरावा करत राहिला. मात्र, कापड सरकार पातळीवरून पुरवण्यात येणार असल्याने कोणीच शिक्षण विभागाला दाद दिली नाही.

एक नियमित व एक स्काऊट गाईडचा असे एकूण दोन गणवेश विद्यार्थ्यांना द्यायचे होते; परंतु अद्याप १७ हजार नियमित गणवेशच शिवून झालेले नाहीत. तर स्काऊट-गाइडच्या गणवेशाबाबतही शाळांना अद्याप माहिती नाही. विद्यार्थ्यांना पहिलाच गणवेश मिळालेला नसल्याने दुसरा गणवेश कधी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

बचत गटांना प्रतिगणवेश शिलाईसाठी १०० रुपये व अनुषंगिक खर्चासाठी प्रतिगणवेश १० रुपये अनुदान मिळणार आहे. महिला बचत गटाच्या कारागिरांनी प्रत्येक विद्यार्थी, विद्यार्थिनींची मापे घेऊन त्यानुसार गणवेश शिलाई करून द्यायचे होते. मात्र, बऱ्याच ठिकाणी अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांचे मापच घेतलेले नाहीत. तर अनेक ठिकाणी गणवेश शिवून झालेले असले तरी त्याची मापे चुकली असल्याने हे गणवेश विद्यार्थ्यांना घालता येत नाहीत. विशेष म्हणजे घेण्यात येणारे मापे ही अंदाज वयानुसार ठरवण्यात आलेली आहे. अचूक मान नसल्याने विद्यार्थ्यांच्या गणवेशाच्या साईजमध्ये अनेक ठिकाणी फरक पडलेला दिसत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या