नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
झारखंडच्या देवघरमध्ये मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. बाबा वैद्यनाथ धामला जाणार्या कावड यात्रेदरम्यान कावडधारकांनी भरलेल्या बसला ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. मोहनपूर पोलिस स्थानकाच्या हद्दीतील जमुनिया जंगलाजवळ पहाटे ४.३० च्या सुमारास हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
गोड्डा-देवघर मार्गावर मोहनपूर पोलीस ठाणे हद्दीत हा अपघात झाला आहे. बाबा नगरी देवघर येथील बाबा वैद्यनाथ धाम येथे जलाभिषेक केल्यानंतर कावड यात्रेकरुंची बस दुमका येथील बासुकीनाथ मंदिराच्या दिशेने जलाभिषेक करण्यासाठी जात होती. याचदरम्यान, मोहनपूर पोलीस स्थानक क्षेत्रातील जमुनिया येथे यात्रेकरुंची बस आणि एलपीजी सिलिंडर वाहून नेणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भयंकर होता की यात ५ कावड यात्रेकरुंचा जागीच मृत्यू झाला.
जंगल भागात हा अपघात झाल्याने मदतकार्यातही अडथळे येत होते. अपघातातील मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो कारण अपघातातील अनेक जखमींची प्रकृती गंभीर आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाने जवळच्या सरकारी रुग्णालयांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.
श्रावण महिन्यात बाबा वैद्यनाथ धामला दरवर्षी हजारोंच्या संख्येने कावड यात्री जातात. अशीच एक कावड यांत्रींनी भरलेली बस देवघर-बासुकीनाथ मार्गावर जमुनिया चौकात आली असता एका भरधाव वेगात असलेल्या ट्रकने ट्र्रॅव्हल बसला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की बसच्या अक्षरशः चिंधड्या झाल्या. या अपघातात ट्र्रॅव्हल बसचा चालकाचा जागीच मृत्यू झाला. शिवाय बसमधील १७ जणांनीही आपला प्राण गमावला. अनेक जण जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने जवळच्या देवघरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या अपघाताबाबतची माहिती भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी X वर पोस्ट करत दिली आहे. ”माझ्या लोकसभा मतदारसंघातील देवघर येथे श्रावण महिन्यातील कावड यात्रेदरम्यान बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात १८ भाविकांचा मृत्यू झाला आहे. बाबा बैद्यनाथजी त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.”, असे दुबे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. श्रावणात बाबा बैद्यनाथच्या दर्शनाकरिता भाविक मोठ्या संख्येने या तीर्थ क्षेत्राला भेट देतात. देवदर्शनाकरिता जाण्याऱ्या भाविकांचा अशाप्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात शोकाचे वातावरण पसरले आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




