Tuesday, December 10, 2024
Homeमुख्य बातम्याRaj Thackeray : "मला माझीच मुले कडेवर खेळवायची आहेत"; राज ठाकरेंचा विरोधकांना...

Raj Thackeray : “मला माझीच मुले कडेवर खेळवायची आहेत”; राज ठाकरेंचा विरोधकांना टोला

नाशिक | Nashik

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशकात मनसेचा १८ वा वर्धापनदिन (18th Anniversary of Maharashtra Navnirman Sena ) साजरा झाला. शहरातील दादासाहेब गायकवाड सभागृहात हा वर्धापनदिन पार पडला असून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) राज्यभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले. लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने वर्धापनदिनाच्या निमित्ताने राज ठाकरे कोणती भूमिका मांडणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. मात्र, पक्षाच्या आजच्या वर्धापनदिनानिमित्त राज ठाकरेंनी सत्ताधारी भाजपसह सर्वच पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवरही त्यांनी भाष्य केले…

- Advertisement -

यावेळी मनसेसैनिकांना मार्गदर्शन करतांना राज ठाकरे म्हणाले की, गेल्या १८ वर्षांमध्ये मनसेने (MNS) अधिक चढउतार पाहिले यामध्ये चढ अधिक बघितले. पण तुम्ही माझ्यासोबत राहिलात. यश नक्की मिळणार, मी मिळवून देणार हा माझा शब्द आहे. पण त्यासाठी राजकारणात वावरायचं असेल तर संयम महत्वाचा आहे. सध्या राजकारणात दुसऱ्यांची पोरं खेळवतात पण मला माझ्या कडेवर माझी पोरं खेळवायची आहेत, असे म्हणत राज ठाकरेंनी भाजपसह विरोधकांना सध्या अनेक नेत्यांच्या पक्षप्रवेशावरून टोला लगावला.

पुढे ते म्हणाले की, सध्या ज्या प्रकारचे राजकारण (Political) चालू आहे. कोण कुठे आहे हेच कळत नाही. कुणाचेही नाव घेतले तर विचारावं लागतं कुठे आहे तो? मला नाट्य संमेलनात पाच नगरसेवक भेटायला आले. म्हणाले, ‘नमस्कार, आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक आहोत’. पण कुणाचे? तर तीन म्हणाले ‘आम्ही शरद पवारांचे’, दोन बोलले ‘आम्ही अजित पवारांचे’. पण आले होते एकत्र. हे फक्त तुम्हाला येडे बनवत आहेत. मूर्ख बनवत आहेत. यांचं आपापसांत राजकारण चालू आहे आणि महाराष्ट्राची फक्त माती होत आहे”, अशी टीका राज ठाकरेंनी यावेळी केली.

तसेच राज्यात जनसंघ, मनसे आणि शिवसेना हेच पक्ष खऱ्या अर्थाने राजकीय पक्ष म्हणून स्थापन झाले आहेत. राष्ट्रवादीचे दोन गट दिसत असले तरी माझी खात्री आहे ते दोघेही आतून एकच आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष म्हणजे निवडून येणाऱ्यांची मोळी असून शरद पवारांनी निवडून येणाऱ्यांना पक्षात घेतले आहे, असेही ठाकरे म्हणाले. तर गुढीपाडव्याच्या दिवशी मी खूप गोष्टी बोलणार आहे. ९ एप्रिलला शिवतीर्थावर सभा घेणार आहे. आतापर्यंत एकही आंदोलन अर्धवट सोडले नाही. राज्यात मनसेच्या आंदोलनामुळे ६५ टोलनाके बंद झाले आहेत. पण अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काय झाले? माझ्या हातात सत्ता द्या सर्व भोंगे सरसकट बंद करतो. समुद्रावर अनधिकृत दर्जा बांधत होते. एका रात्रीत पाडायला लावले, असे राज ठाकरेंनी सांगितले.

पुढे राज ठाकरे म्हणाले की, सोशल मीडियावर (Social Media) माझ्या बाबतीत काहीतरी दाखवतात, गाडी येते मी उतरतो आणि रारारा गाणं लावतात. पक्ष म्हटले की लोक बघत नाही. काहितरी माहिती असेल तरच बघतात. आधीचे वक्ते केतन जोशी जे तुम्हाला सांगत होते, ते तुमच्यासाठी समजावत होते. सोशल मीडिया आपण कशाप्रकारे वापरला पाहिजे? राजकारणासाठी म्हणून याचा कसा वापर केला पाहिजे? लोकांपर्यंत तुम्ही कसं पोहोचलं पाहिजे? इतकं शक्तीशाली-महत्त्वाचं माध्यम तुमच्या हातात आहे,ज्याच्यावर तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत खेळत असता, ते तुम्ही कसं वापरलं पाहिजे? त्याचा उपयोग पक्षाला कसा होऊ शकेल? हे ते समजावून सांगत होते. त्यामुळे प्रत्येक मनसे सैनिकांनी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करावा, असेही ठाकरेंनी सांगितले. तसेच यंदा मनसेला १८ वर्ष पूर्ण होत असून यापुढे राज्यातील प्रमुख शहरांत वर्धापनदिन साजरा होणार आहे.

तसेच महाराष्ट्र एकसंघ राहू नये, यासाठी जातीचं विष पसरवलं जात आहे. जरांगे पाटील उपोषणाला बसले होते तेव्हा त्यांच्यासमोर मी सांगितलं होतं की हे होणार नाही. पण होणार नाही याचा अर्थ होऊ नये असा नाही. तांत्रिकदृष्ट्या ते होऊ शकत नाही. मागे सगळे मोर्चे निघाले होते. सगळे मुंबईत आले वगैरे. पण पुढे काय झालं? माझी मराठा बांधवांना विनंती आहे की यांच्या भूलथापांना बळी पडू नका. जी गोष्ट होऊ शकत नाही, याची हे आश्वासनं देत आहेत. आज विषय मुलांच्या नोकऱ्यांचा, शिक्षणाचा आहे. बाहेरच्या राज्यांमधले लोक आम्ही पोसायचे आणि आमच्याकडची मुले आंदोलन करणार? जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला शिक्षण व रोजगार देणं महाराष्ट्राला सहज शक्य आहे. पण महाराष्ट्र एकसंघ राहू नये यासाठी विष कालवायला हे बसलेच आहेत”, अशा शब्दांत राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांवर टीकास्र डागले.

त्यासोबतच अरबी समुद्रातील शिवाजी महाराज यांचा पुतळा उभा करण्याचा विषय आला तेव्हा मी सांगितले असे होणार नाही. समुद्र आहे तो तिथे भर घालण्यासाठी किमान २५ ते ३० हजार कोटी लागतील. शिवाजी महाराजांनी उभे केलेले गड किल्ले स्मारक आहे. येणाऱ्या पिढीला पुतळे दाखविणार का? गड किल्ले उभे राहिले तर इतिहास दाखवू शकू. काँग्रेस सरकार,शिवसेना, भाजप आणि आताचे सरकार तेच सांगत आहे. पण त्या वेळेत वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभा राहिला, असेही राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान, नाशिक हा एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला मानला जात होता. सन २००९ च्या विधानसभा निवडणुकीत नाशिककरांनी शहरातील चारपैकी तीन आमदार मनसेचे निवडून दिले होते. त्यानंतर २०१२ च्या मनपा निवडणुकीत पक्षाचे चाळीस नगरसेवक निवडून दिले होते. त्या जोरावर मनसेने नाशिकमध्ये पक्षाचा पहिला महापौर बसवला होता. मात्र, ज्या नाशिककरांनी मनसेला सत्ता मिळवून दिली त्याच नाशिकमध्ये पक्षाला आता संघर्ष करावा लागत असल्याचे पाहायला मिळत आहे.

काय म्हणाले बाळा नांदगावकर?

गेल्या १८ वर्षांपासून आपला प्रवास आनंदाने सुरू आहे. पुढील प्रवास असाच आनंदाने जल्लोषाने करायचा आहे. नाशिकने भरभरून दिले आणि घेतले. चढ उतार यश अपयश बघितल्यानंतर ही आपली निष्ठा कायम आहे. आपण खूप आंदोलने केले, जेलभरो आंदोलन केले. पोलिसांचा मार खाल्ला तरीही आपण आहात. कोकणातील रस्त्यासाठी पदयात्रा काढली, आता रस्ता होतोय हे तुमचे यश आहे. पुण्यातील नुकताच मोर्चा काढला एवढा मोठा मोर्चा कोणी काढला नव्हता. भोंगे आंदोलनं यशस्वी झाले. लोकांना त्रास होत होता, आपल्या भोंग्याचा आवाज उत्तर प्रदेश प्रयत्न पोहचला. पण येथील सरकारने प्रयत्न केले नाही.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या