देवळा । प्रतिनिधी Deola
अक्षय्य तृतीये निमित्त भरत असलेल्या देवळा येथील दुर्गामाता यात्रौत्सवात मोठ्या प्रमाणात झालेल्या गर्दीचा फायदा घेवून रविवार (ता.१९) रोजी सायंकाळी उशिरा जवळपास २५ ते ३० महिलांचे सोन्याचे दागिने अर्थात स्त्रीधनावर चोरट्यांनी डल्ला मारल्याने नागरिकांत मोठा असंतोष दिसून आला.
पोलीस ठाण्यात अशा तक्रार करणाऱ्या महिलांनी मोठी गर्दी करत संताप व्यक्त केला. यात्रेतील अशा चोरट्यांचा बंदोबस्त करावा व आमचे दागिने परत मिळवून द्यावेत अशी मागणी महिलांनी केली. तर रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम चालू होते.
देवळा शहरासह तालुक्यातील महिलावर्ग देवळा येथील ग्राम दैवत दुर्गामाता यात्रौत्सवाठी व दुर्गामातेचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात. या गर्दीचा फायदा घेत जवळपास २६ महिलांच्या गळ्यातील मणी-मंगळसूत्र कापत त्याची चोरी करण्यात आली. सोन्याचे भाव गगनाला भिडल्याने चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे. कमीत कमी चार ग्रॅम ते एक तोळे अशा कमीअधिक प्रमाणात २५ ते ३० महिलांचे सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली असल्याने महिलावर्गाकडून चिंता व्यक्त होत आहे.
कोणीतरी चोरट्या महिलांनीच ही चोरी केली असावी असा अंदाज व्यक्त करत त्यांचा बंदोबस्त करावा यासाठी देवळा पोलिसांत तक्रार अर्ज देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. दरम्यान याबाबत एक संशयित महिला व एका पुरुषाला चौकशी कामी ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.
दरम्यान, रविवारच्या आठवडे बाजाराच्या दिवशीही सोन्याचे दागिने व मोबाईल चोरीच्या घटना ह्या नेहमीच घडत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. विशेष म्हणजे या मोबाईल चोरीची झळ बहुतांश जणांना बाजाराच्या दिवशी आठवडे बाजारातच बसत आहे. पोलिसांनी या सोनेचोरी करणाऱ्यांचा व मोबाईल चोरांचा छडा लावत त्यांना चांगलीच अद्दल घडवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.





