नाशिक । प्रतिनिधी Nashik
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या ‘अक्षय्य तृतीये’चा उत्साह यंदा नाशिकच्या बाजारपेठेत ओसंडून वाहिला. नागरिकांनी शुभ मुहूर्त साधत मोठ्या प्रमाणावर खरेदी असून केवळ सोन्या-चांदीपुरतीच नव्हे, तर वाहन, इलेक्ट्रॉनिक्स आणि बांधकाम क्षेत्रातही कोट्यवधींची आर्थिक उलाढाल झाली.
आजच्या दिवशी सुमारे ३ हजार दुचाकी आणि १ हजारांहून अधिक कार्सची विक्री झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर बांधकाम क्षेत्रात ४५० नवीन फ्लॅट्सचे बुकिंग झाल्याने रिअल इस्टेट क्षेत्रातही मोठे चैतन्य निर्माण झाले आहे.
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानले जात असल्याने अनेकांनी आधीच तयारी केली होती. सोन्याचे दर प्रति तोळा दीड लाखांच्या घरात पोहोचले असतानाही काही ग्राहकांनी १५ दिवसांपूर्वीच प्री-बुकिंग करून ठेवले होते. मात्र, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा महिला वर्गाचा सोन्यावरील कल काहीसा कमी झाल्याचे दिसून आले. दिवसभर सराफा बाजारात तुरळक गर्दी होती; मात्र दुपारनंतर ग्राहकांची संख्या वाढली. तरुणाईने हलक्या वजनाच्या दागिन्यांना अधिक पसंती दिली. परंपरेनुसार चांदीच्या लक्ष्मी-गणेश मूर्ती, ताट-वाट्यांची खरेदीही मोठ्या प्रमाणात झाली.
रात्री उशिरापर्यंत वाहन डिलिव्हरीची लगबग
दरवर्षीप्रमाणे यंदाही वाहन कंपन्यांनी स्पॉट लोन ऑफर्स आणि सवलती जाहीर केल्याने ग्राहकांचा उत्साह वाढला. अनेकांनी दोन महिन्यांपूर्वीच प्री-बुकिंग करून ठेवले होते. सकाळपासूनच ग्राहक कुटुंबासह शोरूममध्ये दाखल झाले. वाहनांचा ताबा देण्यासाठी विक्री प्रतिनिधींची रात्री उशिरापर्यंत धावपळ सुरू होती.
इलेक्ट्रॉनिक्स आणि रिअल इस्टेटमध्ये तेजी
कडक उन्हाळ्यामुळे एसी, कुलर आणि फ्रीजच्या विक्रीतही मोठी वाढ झाली. नाशिक असोसिएशन ऑफ बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या विविध प्रकल्पांमध्ये आज ४५० फ्लॅट्सचे बुकिंग झाले.
दरवाढीच्या शक्यतेने बुकिंगला वेग
आखाती देशांतील युद्धामुळे सिमेंट, स्टीलसारख्या बांधकाम साहित्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे आगामी काळात घरांच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या काही व्यावसायिकांकडे जुन्या दरातील साहित्य उपलब्ध असल्याने दरवाढ झालेली नसली, तरी “उद्या महाग होण्यापेक्षा आजच बुकिंग” या भावनेतून ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात फ्लॅट्स बुक केल्याचे वृत्त आहे.





