Friday, March 28, 2025
Homeनंदुरबारनंदुरबार जिल्हयात 19 बालविवाह रोखले

नंदुरबार जिल्हयात 19 बालविवाह रोखले

नंदुरबार nandurbar । प्रतिनिधी

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने सुरु केलेल्या ऑपरेशन अक्षता उपक्रमांतर्गत आतापर्यंत एकुण 19 बालविवाह रोखण्यात पोलीसांना यश आले आहे.

- Advertisement -

बालविवाहांना प्रतिबंध करणे तसेच महिलांविषयक कौटुंबीक हिंसाचार व अन्य अत्याचाराच्या घटनांना आळा घालून त्यावर उपाययोजना करण्याच्याउद्देशाने पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन अक्षता हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून राबविण्यात येणार्‍या ऑपरेशन अक्षताचे नंदुरबार पोलीसांचे सर्वत्र कौतूक होत आहे. तसेच ऑपरेशन अक्षता हा उपक्रम यानंतर देखील नंदुरबार जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यातील बालविवाहाच्या समस्येचे समूळ उच्चाटन करण्यात यश येईल. आजपावेतो नंदुरबार जिल्ह्यातील 634 ग्रामपंचायतींपैकी 631 ग्रामपंचायतींमध्ये बालविवाह विरोधी ठराव घेण्यात आले आहेत. तसेच उर्वरीत 03 ग्रामपंचायतींचे ठराव देखील लवकरच घेण्यात येतील. त्याचप्रमाणे आज पावेतो नंदुरबार जिल्हा पोलीसांनी एकुण 19 बालविवाह रोखण्यात पोलीसांना यश आले आहे.

ऑपरेशन अक्षता या उपक्रमांतर्गत पोलीस ठाणे स्तरावरील अक्षता सेलच्या सदस्य असलेले गाव पातळीवरील महत्वाचा घटक म्हणजे पोलीस पाटील यांची ऑपरेशन अक्षता हा उपक्रम सुरु झाल्यापासून दर मंगळवारी बैठक घेण्यात येत असते. नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस पाटील यांच्या आज पावेतो 120 बैठका घेण्यात आलेल्या आहेत. तसेच पुढील काळात पोलीस ठाणे येथे घेण्यात येणार्‍या प्रत्येक मंगळवारच्या बैठकीत स्तरावरील अक्षता सेलचे सदस्य असलेले ग्रामपंचायत, ग्रामसेवक, पोलीस पाटील, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व बीट अंमलदार यांच्या देखील बैठका घेण्यात येणार आहेत. पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी किंवा दुय्यम पोलीस अधिकारी पोलीस ठाणे हद्दीत दररोज एका गावाला भेट देवून गावातील नागरिकांना बालविवाह केल्याने अल्पवयीन मुलीला होणारा त्रास तसेच बालविवाहामुळे होणारे दुष्परिणाम यांची व मुलीचा बालविवाह केल्यास पालकांवर होणारी कायदेशीर कारवाई याबाबत माहिती देवून जनजागृती करण्यात येत आहे. आजपावेतो जिल्ह्यातील नंदुरबार शहर-2, नंदुरबार तालुका-10, उपनगर-6, नवापूर-6, विसरवाडी-6, शहादा-8, धडगांव-6, सारंगखेडा-6, म्हसावद-7, अक्कलकुवा-7, तळोदा-8, मोलगी-6 पोलीस ठाणे हद्दीतील एकुण 78 गावांना भेटी देवून ऑपरेशन अक्षता या उपक्रमाची जनजागृती बाबत माहिती देण्यात आली आहे.

बालविवाहांना प्रतिबंध करणे तसेच महिलांविषयक कौटुंबीक हिंसाचार व अन्य अत्याचाराच्या घटनांना आळा घालून त्यावर उपाययोजना करणे या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या ऑपरेशन अक्षता या उपक्रमासाठी 9022455414 हा हेल्पलाईन नंबर जिल्हा पोलीस दलाकडून सुरु करण्यात आला आला आहे. याबाबत देखील नागरिकांना बैठकांमध्ये सांगण्यात येत असते व कोणत्याही गावात बालविवाह होत असल्यास त्याबाबत हेल्पलाईन नंबरवर तात्काळ संपर्क करुन माहिती देण्याचे आवाहन करण्यात येत असून सदरच्या हेल्पलाईनवर तक्रारी प्राप्त होत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या