अहिल्यानगर (प्रतिनिधी)
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार अनुराधा राजेंद्र नागवडे यांच्या मालकीच्या चारचाकी वाहनातून (एमएच 12 युव्ही 2525) प्रवास करणार्या तिघांकडे दोन लाख रूपयांची रोकड मिळून आली. अहिल्यानगर शहरातील आयुर्वेद कॉर्नर येथे नाकाबंदी दरम्यान कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी दुपारी ही कारवाई केली.
दरम्यान, दोन लाखाची रोकड व 20 लाखाचे वाहन असा 22 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अहिल्यानगर शहरात पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी केली जात आहे. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी आयुर्वेद कॉर्नर येथे नाकाबंदी लावली होती.
नाकाबंदी दरम्यान, पोलिसांनी एमएच 12 युव्ही 2525 हे चारचाकी वाहन पकडले. ते वाहन अनुराधा नागवडे यांच्या नावावर असल्याचे समोर आले. यामध्ये अनुराधा नागवडे यांचा मुलगा दिग्विजय राजेंद्र नागवडे (वय 20, रा. वांगदरी, ता. श्रीगोंदा), विनेश राजहंस शिर्के (वय 26, रा. बाबुर्डी, ता. श्रीगोंदा), ईश्वर अंबर मेहेत्रे (वय 25, रा. अढळगाव, ता. श्रीगोंदा), अविनाश बाळू इथापे (रा. श्रीगोंदा फॅक्टरी ता. श्रीगोंदा) असे चौघे होते.
पोलिसांनी वाहनाची तपासणी केली. तसेच वाहनातील विनेश शिर्के यांच्याजवळ एक लाख रूपये, अविनाश इथापे यांच्याजवळ 50 हजार व ईश्वर मेहेत्रे यांच्याकडे 50 हजार अशी दोन लाखांची रोकड आढळून आली. या रकमेबाबत त्यांनी असमाधानकारक उत्तर दिल्याने, तसेच निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 50 हजार पेक्षा जास्त रक्कम जवळ बाळगण्यास निर्बंध असल्याने पोलिसांनी सदर रक्कम व वाहन ताब्यात घेतले आहे. सदर रकमेबाबत चौकशीसाठी ती रक्कम समितीकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक दराडे यांनी सांगितले.