धुळे – शहरातील चितोड रोडवरील क्रांती चौकातील एक कुरियर सेंटर फोडून चोरट्यांनी 2 लाखांची रोकड लंपास केली आहे. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
शहरातील चित्तोड रोडवरील हुडको कॉलनीत, क्रांती चौकातील प्लॉट नं.2 मध्ये तळमजल्यावर अमॅझोन कंपनीचे कुरियर ऑफिस आहे. काल रात्री अज्ञात चोरट्यांनी कुरियर ऑफिसच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. ऑफिसमधील ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले 2 लाख 1 हजार 305 रूपयांची रोकड चोरून नेली. पहाटे ऑफिस उघडण्यासाठी आलेल्या कर्मचार्यांना हा प्रकार लक्षात आला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. तसेच शहर पोलिसांसह श्वान पथकाचे प्रमुख एएसआय. एम.आर.काझी, पो.कॉ.मंगले, चालक पिंजारी हे जॅक श्वानासह घटनास्थळी दाखल झाले. तर ठसे तज्ज्ञ पथकातील एपीआय. राजपूत, पोकॉ.प्रशांत माळी हे देखील घटनास्थळी पोहचले.
येथील सीसीटिव्ही कॅमेर्यात एक चोरटा कैद झाला असून जॅक श्वानने परिसरात दोन चक्कर मारीत रस्त्यापर्यंत माग काढला. याप्रकरणी मॅनेजर विजय पवार यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.