नवी दिल्ली | New Delhi –
केंद्र सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने नवीन 20 क्रीडा प्रकारांतील खेळाडूंना आता क्रीडा कोट्या अंतर्गत सरकारी नोकरीसाठी
पात्र ठरविण्याचा क्रीडा मंत्रालयाचा प्रस्ताव मान्य आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये गुणवंत खेळाडूंची नियुक्ती करण्यासाठी असलेल्या खेळांच्या 43 प्रकारांच्या सूचीमध्ये आता भर पडली आहे. नवीन 20 खेळांच्या समावेशामुळे आता ही 63 खेळांची सूची बनली आहे. या यादीमध्ये मल्लखांब, टग ऑफ वॉर, रोल बॉल यासारख्या देशी आणि पारंपरिक क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.
भारत सरकारच्या विविध खात्यांमध्ये आणि मंत्रालयामध्ये नोकरीसाठी 43 क्रीडा प्रकारांमध्ये खेळणा-या क्रीडापटूंसाठी कोटा निश्चित करण्यात आलेला होता. या कोट्यामध्ये ऑक्टोबर 2013 मध्ये सुधारणा करण्यात आली होती. आता कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने क्रीडा कोट्याचा आढावा घेवून देशी आणि पारंपरिक 20 खेळ प्रकारांचा त्यामध्ये समावेश केला आहे. नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या क्रीडा प्रकारांमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा,ऑलिम्पिक आणि इतर स्पर्धांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणार्या गुणवंत खेळाडूंना आता या नवीन क्रीडा कोट्याचा लाभ होवू शकणार आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने समावेश केलेल्या नवीन 20 क्रीडा प्रकारांची सूची जारी केली आहे. यानुसार बेसबॉल,बॉडी बिल्डिंग, सायकलिंग पोलो, दिव्यांग-डेफ क्रीडा प्रकार, फेन्सिंग, कुडो, मल्लखांब, मोटारस्पोर्टस, नेट बॉल, पॅरा स्पोर्टस्, (पॅरालिम्पिक आणि पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धा ), पेनकॅक सिलाट, रग्बी, सेपॅक टक्रॉ, सॉफ्ट टेनिस, शूटिंग बॉल, टेनपिन बॉलिंग, ट्रायथलॉन, टग-ऑफ- वॉर आणि वुशू या क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.
या निर्णयाबद्दल बोलताना केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडामंत्री किरेन रिजीजू म्हणाले, आपले सरकार सर्व क्रीडापटूंचा सर्वांगीण विकास आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी महत्व देत आहे. याचेच एक महत्वाचे पाऊल म्हणजे आणखी काही क्रीडा प्रकारांचा डीओपीटीच्या सूचीमध्ये समावेश करण्याचा प्रस्ताव मान्य करणे आहे. क्रीडापटूंचे मनोबल वाढविण्यासाठी या निर्णयाचा लाभ होणार आहे, असे नाही तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणा-या क्रीडापटूंना त्यांच्या परिश्रमाचे फळ मिळण्यासाठी आणि देशातील खेळाच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्यास मदत होणार आहे.