नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – सल्लागार संपादक
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नाशिक जिल्ह्यात महायुतीने देदीप्यमान विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाला. अकरा शहरांमध्ये झालेल्या नगरपरिषदांच्या निवडणुकीत तब्बल आठ ठिकाणी परिवर्तन झाले. शिवसेनेने पाच ठिकाणी तर भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी अजित पवार पक्ष यांनी प्रत्येकी तीन ठिकाणी यश मिळवले. या तीनही पक्षांनी प्रत्येकी आठ ठिकाणी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवलेली असल्याने पैकी पाच ठिकाणी विजय मिळवून शिवसेना हा नाशिक जिल्ह्यापुरता तरी महायुतीत मोठा भाऊ ठरला आहे.
भगूर, पिंपळगाव बसवंत, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नांदगाव, सिन्नर, सटाणा व मनमाड या ठिकाणी सत्ताबदल झाला आहे. बव्हंशी ठिकाणी परिवर्तन झालेले असले तरी या निवडणुकीतील राजकीय पॅटर्न देखील सगळीकडे सारखा राहिलेला नाही. शिवसेनेला जिल्ह्यात सर्वत्र अभूतपूर्व यश मिळत असतांना त्यांची भगूर येथील तब्बल पंचवीस वर्षांची सत्ता समस्त विरोधकांनी उलथून टाकली. पिंपळगाव बसवंतमध्ये पूर्वीचे सत्तारुढ व विरोधक एकत्र आल्याचा फटका त्यांना बसला तर निष्ठावंतांना डावलले म्हणून सटाणा व त्र्यंबकमध्ये भाजपला सत्ता गमवावी लागली.
चांदवडमध्ये मात्र एकमेकांचे कट्टर विरोधक एकत्र आल्याचा त्रास न होता उलट तेथे भाजपला सत्ता राखता आली. साहजिकच कोणत्या तरी एकाच प्रेरणेमुळे हे निकाल लागले असे म्हणता येत नाही. लोकांनी विकासाला कौल दिला असे म्हणावे तर बव्हंशी ठिकाणी झालेल्या सत्ताबदलाचे काय असा प्रश्न पुढे येतो. राज्याच्या सत्तेतीलच सगळे एकमेकांविरोधात असल्याने आम्ही निधी आणू. आम्हीच विकास साधू असा दावा सगळे करीत असले तरी लोकांनी मात्र त्याचाही फारसा विचार केल्याचे दिसत नाही. सिन्नर शहरात गेली काही वर्षे खासदार राजाभाऊ वाजे यांना मानणारा मोठा वर्ग असल्याचे विविध निवडणुकांमध्ये दिसले होते. तरीही यावेळेस आमदार माणिकराव कोकाटे यांच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने लोकांनी निवडून दिले. हा विजय कोकाटेंच्या नेतृत्वाच्यादृष्टीने मोठाच दिलासा म्हणता येईल.
राज्याच्या सत्तेतून ते बेदखल झाले असले तरी लोकांच्या सत्तासिंहासनावर अजूनही ते विराजमान असल्याचे या निकालातून दिसले. छगन भुजबळ गेले काही दिवस रुग्णशय्येवर असल्याने यंदा त्यांच्या विरोधकांचे हौसले बुलंद होते. दराडे बंधूंना भुजबळांच्या इतर विरोधकांचीही मदत होत होती तरीही भुजबळांचा प्रभाव पडलाच. विशेषत सिनिअर भुजबळांच्या पश्चात प्रथमच माजी खासदार समीर भुजबळ यांनी येवल्याचा किल्ला लढविला आणि त्यात त्यांना यशही आले. आमदार सुहास कांदे यांनी मात्र कोणालाच फारसे फटकू दिले नाही. भारतीय जनता पक्षाबरोबर युती करण्याचा त्यांचा निर्णय शहाणपणाचा ठरला. नांदगाव व मनमाड अशा दोन्ही परिषदांमध्ये शिवसेनेने दणयात विजय मिळविला.
सटाणा व त्र्यंबकेश्वर येथे भाजपने नाकारलेल्या उमेदवारांना ऐनवेळी पदरात घेण्याचे प्रसंगावधान दाखवून शिवसेनेने लवचिक राजकारणात बाजी मारली. मंत्री दादा भुसे यांच्या मास्टरस्ट्रोकमुळे सटाण्यात इतिहास घडला. सटाण्यात निष्ठावानांना दूर लोटल्याची शिक्षा भाजपला भोगावी लागली. शिवसेनेचे अस्तित्वही नसताना थेट सत्तेचा बोनस मिळाला. भाजप आमदार दिलिप बोरसे यांच्या उमेदवार निवडीतील चुका आणि यतीन पगार, प्रशांत बच्छाव व संजय सोनवणे यांना दूर केल्याचा फटका पक्षाला बसला. त्र्यंबकेश्वरमध्ये मंत्री गिरीश महाजन यांचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार चुकला आणि तेथेच भाजपच्या पराभवाची बीजे रोवली गेली. उमेदवारी नाकारली गेल्यानंतर काही क्षणातच त्रिवेणी तुंगार यांना शिवसेनेने थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर करुन भाजपला जणू चेकमेट केले होते.
इगतपुरीतील जनभावनांचा अनादर केल्यामुळे पंचवीस वर्षे सत्तेत असलेल्या संजय इंदुलकरांना लोकांनी घरी बसवतांना शिवसेनेला सत्ता देऊन आपली नाळ अधिक घट्ट केली. इंदुलकरांनी अखेरच्या क्षणी ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ करीत भाजपचे ‘कमळ’ हाती घेतले होते. लोकांना ते रुचले नाही. गिरीश महाजन यांना येथेही धक्का बसला. त्या तुलनेत ओझरमध्ये यतीन कदम व पिंपळगावमध्ये सतीश मोरे यांच्या ठाम भूमिकेमुळे भाजपला दोन्ही ठिकाणी अभूतपूर्व यश मिळाले. भास्कर बनकर यांची पंचवीस वर्षांची सत्ता गेली, ती त्यांच्या अभद्र युतीमुळे. राष्ट्रवादीचे आमदार दिलिप बनकर यांच्याशी त्यांचा उभा दावा सर्वश्रुत असताना सत्तेच्या लोभासाठी त्यांनी केलेली हातमिळवणी कोणालाच पसंत पडली नाही. या रागाचा परिणाम म्हणून प्रथमच भास्कर बनकरांसह त्यांच्या पॅनलचाही पिंपळगावकरांनी धुव्वा उडविला. मतदारांना गृहित धऱणे हल्लीच्या काळात कसे चुकीचे ठरते याचा असा प्रत्यय भगूरमध्येही अनुभवास आला. तेथेही विजय करंजकर यांची पंचवीस वर्षांची सत्ता समस्त विरोधकांनी एकत्र येत आरामात उलथवून टाकली. करंजकर यांचा अहंकार आणि आमदार सरोज अहिरे यांच्याविषयी केलेली असभ्य भाषा याने बाजी पलटली.
सार्वजनिक विकास कामांच्या आक्रमकतेने आमदार अहिरेंनी सुरुवातीपासूनच करंजकरांना आव्हान द्यायला सुरुवात केली होती. प्रत्यक्ष निवडणुकीत तर त्यांनी आव्हानांचा कहर केला. करंजकरांना त्यांचे आव्हान पेलणे शय झाले नाही. प्रेरणा बलकवडे या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी असून त्या संघटनेत कमालीच्या सक्रीय होत्या. त्यातून डोकावणारा त्यांचा आत्मविश्वास भगूरकरांना भावला. त्यामुळेच आपले अन् परके हा वाद यावेळेस कामी आला नाही. बलकवडेंना प्रदीर्घ काळानंतर भगूरकरांनी आपलेसे केले यालाही ऐतिहासिक महत्व आहे. जिल्ह्यातील सर्वच परिषदांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सिन्नर वगळता कोठेच मनापासून लढली नाही. स्टार प्रचारक तर सोडाच; पण साधे नेतेही कोणी प्रचाराला फिरकले नाहीत. एका अर्थाने त्यांनी जणू महायुतीला बाय दिला होता. महायुतीतील घटक पक्षांनी त्याचा फायदा आपल्या विस्तारासाठी केला. शिंदेंच्या शिवसेनेने त्यात बाजी मारली, ही खरी कमाई.




