धुळे – Dhule – प्रतिनिधी :
शहरात कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनामार्फत व मनपा प्रशासनामार्फत आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाय योजना व वैद्यकिय सेवेची उपलब्धता करण्यात येत आहे. रुग्णांना तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी तसेच रुग्णांची अतिरिक्त संख्या वाढल्यास त्यांना दाखल करण्यासाठी खाटा (बेड) आरक्षित करणे अनिवार्य असल्याने याबाबत शहरातील सर्व रुग्णालयांना आयुक्त अजिज शेख यांनी आदेश पारीत केले आहेत.
शहरात कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रुग्ण संख्या वाढल्यास त्यांना ठेवण्यासाठी खाजगी रुग्णालयात कोविड 19 संसर्गग्रस्त रुग्णांकरीता खाटा (बेड) आरक्षित करणे अनिवार्य झालेले आहे. जिल्हा प्रशासन व मनपा प्रशासनामार्फत यासाठी विविध पातळीवर प्रयत्न व उपाययोजना सुरू आहेत.
यापूर्वीही वेळोवेळी खाजगी रुग्णालय व संस्थाच्या बैठका घेवून त्यांना याबाबत विनंती करण्यात आलेली आहे. नागरीकांचे आरोग्य रक्षण व वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी या अनुषंगाने मनपा कार्यक्षेत्रातील कार्यरत हॉस्पीटल्स, नर्सिंग होम, नोंदणीकृत खाजगी रुग्णालय, मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पीटल्स या मधील किमान 25 टक्के खाटा वैद्यकीय सोयी सुविधा व मनुष्यबळासह कोविड-19 रुग्णांकरीता आरक्षित करण्यात आले असून असे आदेश सक्षम प्राधिकारी म्हणून आयुक्त अजिज शेख यांनी याबाबत शहर कार्यक्षेत्रातील सर्व रुग्णालयांना आदेश पारीत केले आहेत.
कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी शासन निर्देशाचे उल्लंघन केल्यास ते आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 50 ते 61 व भारतीय दंडसहिता (45 ऑफ 1860) चे कलम 188 नुसार कायदेशिर/दंडनिय कारवाईस पात्र राहतील याची संबंधितांनी नोंद घ्यावी. तसेच नागरिकांनी देखील घाबरून न जाता वैद्यकीय यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे