Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपडसाद : कोकाटेंची सरशी, बोरसे पडले फशी!

पडसाद : कोकाटेंची सरशी, बोरसे पडले फशी!

नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – सल्लागार संपादक

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निकालांनी जिल्ह्यातील राजकारणाची फेरमांडणी झालेली असल्याने नाशिक व मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीत त्याचे प्रतिबिंब पडल्यास नवल नाही. सध्यातरी महापालिका निवडणुकीत महायुती होणार नाही, असे वातावरण तयार झाले आहे. परंतु, उद्धव व राज ठाकरे एकत्र आल्याने व त्यांच्या दोन्ही पक्षांची युती झाल्याचे अधिकृत जाहीर झाल्याने महायुतीनेही आपसातील मतभेद बाजूला ठेवत एकत्र येण्याच्या दृष्टीने मानसिक तयारी केल्याचे दिसते आहे. तोपर्यंत नगरपरिषद निवडणुकीतील आमदार व खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेऊन त्याची चर्चा करणे क्रमप्राप्त ठरते.

- Advertisement -

कालच्या लेखात आ. सरोज अहिरे, आ. हिरामण खोसकर तसेच आ. सुहास कांदे आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्या कर्तृत्वाची ओझरती दखल घेतली आहेच. आजपासून टप्प्याटप्प्याने राजाभाऊ वाजे, शोभा बच्छाव, भास्कर भगरे हे खासदार तसेच माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, दिलीप बोरसे, राहुल आहेर, छगन भुजबळ या आमदारांच्या मतदार संघातील निकालाचे विश्लेषण करू या. सिन्नर नगराध्यक्षपदी माणिकराव कोकाटे यांचे कट्टर समर्थक विठ्ठलराजे उगले विजयी झालेच; शिवाय त्यांचे तेरा नगरसेवकही विजयी झाल्याने सत्ता राबविण्यात फारशी अडचण येणार नाही. तेथे शिवसेना व भाजपला अगदीच दोन-तीन जागा मिळालेल्या असल्याने त्यांच्या दबावाचा प्रश्नच येणार नाही. राजाभाऊ वाजेंच्या कर्तृत्वाला मात्र या निवडणुकीत ब्रेक लागला. खरे तर चुलते हेमंत वाजे यांनी साथसंगत सोडून भाजपची वाट धरली तेव्हाच काहीतरी गडबड होणार असे दिसत होते. त्याचा अंदाज घेऊनच ज्येष्ठ नेते दस्तुरखुद्द प्रकाश वाजे हे प्रचाराच्या रिंगणात उतरले होते. तरीही नगराध्यक्षपद दूरच राहिले.

YouTube video player

सर्वच पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढविल्याने गुंतागुंत वाढली होती. नामदेव लोंढे यांनीही कोकाटेंची साथ सोडून शिंदे सेनेत प्रवेश केलेला असल्याने चौरंगी लढतीची चुरस होती. उबाठाने प्रमोद चोथवे यांना उमेदवारी दिली तेव्हा त्या निर्णयाचे सर्वांनीच कौतुक केले होते. दोन मराठा व एक ओबीसीमध्ये वंजारी समाजाच्या चोथवे यांना आरामात विजय मिळेल असा अंदाज वर्तविला जात होता. परंतु, हेमंत वाजेंच्या पक्षांतरामुळे नाराज मराठा समाज विठ्ठल उगलेंभोवती एकवटल्याने चोथवेंची अडचण झाल्याचे दिसते. विशेष म्हणजे, माणिकराव कोकाटे फारसे प्रचारात नसतानाही उगलेंनी जी मते घेतली ती शहरातील सामाजिक ध्रुवीकरणामुळेच, हे स्पष्ट झाले. शिवाय वाजे व कोकाटे यांच्यात छुपी युती असल्याच्या चर्चेला छेद देणे वाजेंना शय न झाल्याने सर्वाधिक नगरसेवक निवडून येऊनही त्यांना सत्तेपासून वंचित रहावे लागले. कोकाटेंना मात्र या विजयामुळे चार हत्तींचे बळ मिळाले असेल. सध्या त्यांचे सगळेच ग्रह वक्री झालेले असताना मतदार संघातील एकमेव नगरपालिकेची सत्ता मिळाल्याने त्यांच्या नेतृत्वालाही तो दिलासा आहे.

सटाणा नगरपरिषदेत झालेल्या सत्तापरिवर्तनाला आमदार दिलीप बोरसेंना जबाबदार धरले जात असल्याने स्थानिक पातळीवर भाजपमध्ये बरीच खळबळ आहे. नगराध्यक्षपद गमावले असले तरी पंधरा नगरसेवक निवडून आल्याने सत्तेवर भाजपचीच मांड राहील असे दिसते. अर्थात तरीही सुनील मोरेंच्या प्रेमामुळे बोरसेंनी शहरातील सर्वाधिक प्रबळ समजल्या जाणार्‍या सोनवणेंवर अन्याय केल्याची भावना त्यांना दूर करता आली नाही. सटाण्याचे राजकारण हे सोनवणेंभोवतीच फिरते हा वर्षानुवर्षांचा अनुभव असतानाही संजय सोनवणे, प्रशांत बच्छाव व यतीन पगार या त्रिमूर्तींना बेदखल करण्याची शिक्षा बोरसेंना मिळाली. या अनुभवातून वेळीच सुधारणा करून बोरसेंना भरपाई करावी लागेल, अन्यथा जिल्हा परिषदेतही अडचण होऊ शकेल. आत्मपरीक्षण करून बोरसेंना कार्यशैलीत सुधारणा करावीच लागेल. अन्यथा जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीत चिरंजीवांच्या कारकिर्दीच्या श्रीगणेशात विघ्न यायचे. माजी आमदार संजय चव्हाण यांनी समयसूचकता दाखवित आपल्या पक्षाच्या उमेदवाराची माघार घेऊन शिंदेंच्या उमेदवाराला केलेली मदत हा राजकीय शहाणपणा ठरला. सोनवणे कुटुंबाकडे सत्ता आल्याने भविष्यात चव्हाण त्याचा नेमकेपणाने लाभ उठवू शकतात.

शिंदेंच्या शिवसेनेचे आत्मबल वाढल्याने ते देखील आता आक्रमक होतील. भाजपमधील नाराज घटकांना त्यांनी आपल्याकडे ओढले तर तालुयाच्या राजकारणातील भाजपच्या प्रभावाला ओहोटी लागू शकेल. काँग्रेसच्या खासदार शोभाताई बच्छाव यांनी मतदार संघातील या निवडणुकीकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याचे दिसले. छगन भुजबळ रुग्णालयात असल्याने येवल्याची जहागिरी यावेळेस समीर भुजबळ यांना सांभाळावी लागली. सुरुवातीलाच त्यांनी भाजपला जवळ करून पहिली लढाई जिंकली. मोठ्या साहेबांच्या पश्चात समीर यांच्या नेतृत्वाची खरोखरच कसोटी होती. ती त्यांनी यशस्वीरीत्या पार केली.

आमदार किशोर दराडे व माजी आमदार नरेंद्र दराडे यांना यावेळीही भुजबळांची मजबूत पकड भेदता आलेली नसली तरी भुजबळांना मानणार्‍या मुस्लिम समाजाची तसेच आजपर्यंत कधीच ज्यांनी मदत केली नाही अशा समाजाची मते मिळविण्यात व तेथील उमेदवार निवडून आणण्यात मोठे यश मिळवता आले, ही खरी त्यांची कमाई म्हणता येईल. अर्थात, नेहमीप्रमाणे सगळे एकत्र आल्यावर भुजबळांना जनतेची अधिक साथ मिळते, याचा अनुभव यावेळीही आला. येवला शहर हा खरे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालेकिल्ला समजला जातो. त्याचा लाभ उठवित भुजबळांनी भाजपला साथीला घेण्याचा शहाणपणाचा निर्णय घेतला. त्याचा फायदा जरूर झाला; पण भाजपचे संख्याबळ घटल्याने त्यांना मात्र फटका बसला. भुजबळांना कायम साथ देणार्‍या मुस्लिम समाजाने यावेळी कूस बदलली ती एकाच घरात अधिक उमेदवारी देणे व तेच ते चेहरे देण्याच्या राष्ट्रवादीच्या निर्णयामुळे. प्रत्येकालाच बरेच काही शिकता येण्यासारखे हे निकाल आहेत.

ताज्या बातम्या

Baramati Politics : बारामतीत शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवारांमध्ये...

0
बारामती । Baramati राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली आणि अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. या दुःखद घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज्याच्या...