Sunday, July 26, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसुरगाणा तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के

सुरगाणा तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे कडून भूकंपप्रवण क्षेत्राची पाहणी

- Advertisement -

सुरगाणा | प्रतिनिधी Surgana


सुरगाणा तालुक्यातील सराड, घागबारी, वाझुळपाडा, हरणटेकडी, रोटी, शिंदे दिगर, भिंतघर आणि जामनेमाळ या परिसरात आज (शनिवार) सकाळी सुमारे १० वाजण्याच्या दरम्यान सलग चार वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या धक्क्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. भर पावसात अनेक नागरिक घराबाहेर धावत आले, तर शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनीही सुरक्षित ठिकाणी धाव घेतली.

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सराड येथे पहिला सौम्य धक्का सकाळी ९:५६ वाजता, त्यानंतर ९:५९ वाजता दुसरा धक्का जाणवला. १०:०० वाजता तुलनेने अधिक तीव्र धक्का बसला, तर १०:०१ वाजता पुन्हा एकदा सौम्य धक्का जाणवला. अशा प्रकारे अवघ्या काही मिनिटांत सलग चार वेळा भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली.

पोलीस पाटील कांतीलाल भोये, रामचंद्र चौरे, लक्ष्मण चौरे, पंडित भोये, चिंतामण गायकवाड, तुळशीदास पिठे, गोपाळ गायकवाड आणि प्रकाश गायकवाड यांनी घटनास्थळी माहिती दिली. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी केलेल्या प्राथमिक पाहणीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी अथवा मोठे नुकसान झाले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, तहसील कार्यालयाच्या नैसर्गिक आपत्ती निवारण व्यवस्थापन विभागाने या घटनेची माहिती नाशिक येथील भूकंप मापन केंद्राकडे पाठविली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांत राहावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार रामजी राठोड यांनी केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची तातडीने पाहणी

घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, कळवणच्या उपविभागीय अधिकारी कश्मिरा संखे आणि तहसीलदार रामजी राठोड यांनी सराड परिसराला भेट देऊन भूकंपप्रवण भागाची पाहणी केली.

यावेळी घागबारी ते नागझरी फाटा या गुजरातला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचीही पाहणी करण्यात आली. रस्त्यावरील खड्डे तातडीने खडी टाकून बुजविण्याचे तसेच घागबारीजवळील मोठा खड्डा सिमेंट काँक्रीटने भरून वाहतूक सुरळीत करण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला देण्यात आले.

याशिवाय सराड येथील शासकीय आश्रमशाळेतील इमारतीच्या गळतीची पाहणी करण्यात आली. पावसामुळे तसेच भूकंपामुळे बाधित झालेल्या घरांचे व शेतीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. हतगडजवळील गायधरपाडा येथील अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळेचीही पाहणी करून आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले.

या पाहणीदरम्यान गटविकास अधिकारी साहेबराव खेडकर, बाल विकास प्रकल्प अधिकारी कोंडार, शिक्षण विस्तार अधिकारी धनंजय कोळी तसेच सामाजिक कार्यकर्ते जनार्दन भोये, सखाराम भोये, नामदेव भोये, कांतीलाल भोये आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

NEET paper leak case : नाशिक शहर व जिल्हा काँग्रेस पक्षाकडून...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी, परीक्षेतील अनियमितता, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनी व आंदोलनाच्या आयोजकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तातडीने मागे घ्यावेत, दिल्लीतील जंतरमंतर...