Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपडसाद : तीनही खासदारांची पाटी कोरी

पडसाद : तीनही खासदारांची पाटी कोरी

नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – सल्लागार संपादक

- Advertisement -

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना उबाठा, काँग्रेस तसेच शरद पवारांची राष्ट्रवादी या पक्षांची कामगिरी अत्यंत वाईट तर झालीच शिवाय या तिन्ही पक्षांच्या खासदारांच्या कार्यक्षेत्रात विधानसभेनंतर लागोपाठ दुसर्‍यांदा सपशेल पराभवाचा सामना करावा लागला. उबाठाचे खासदार राजाभाऊ वाजे, राष्ट्रवादी (शप)चे भास्कर भगरे आणि काँग्रेसच्या शोभाताई बच्छाव या तिघांच्याही कार्यक्षेत्रात एकही आमदार विजयी झाला नव्हता. आता एकाही नगरपरिषदेत त्यांना त्यांच्या पक्षाला विजय मिळवून देता आलेला नाही. विजय मिळविणे तर दूरच; अनेक ठिकाणी त्यांच्या पक्षांनी निवडणूकच लढविण्याचे कष्ट घेतले नाही. निवडणूक लढविली नसल्याने प्रचार करण्याचाही प्रश्न आला नाही.

YouTube video player

एकापरीने या तीनही पक्षांनी महायुतीला निवडणुकीत स्वत:हून पुढे चाल दिल्याचे दिसते. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात, साहजिकच त्यांच्या ऊर्जेसाठी तरी संबंधित लोकप्रतिनिधींनी कष्ट उपसायला हवे होते. सिन्नरचा अपवाद वगळता इतरत्र आनंदीआनंद होता. सिन्नरला राजाभाऊ वाजेंनी जीवाचे रान केले हे नाकारता येणार नाही. वाजेंच्या कार्यक्षेत्रातील सिन्नर, इगतपुरी, भगूर व त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेतील त्यांच्या पक्षाची कामगिरी अत्यंत सुमार राहिली. केवळ सिन्नरलाच यश मिळू शकले, तेदेखील वाजेंचे ते घरचे गाव आहे म्हणून. पंचवीस वर्षे जेथे अनभिषिक्त सत्ता राखली, त्या इगतपुरी व भगूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला अनुक्रमे एक व दोन जागा मिळाल्यात. त्र्यंबकेश्वरमध्ये तर भोपळाही फोडता आला नाही. हीच गत राष्ट्रवादीचे खासदार भास्कर भगरे यांची. त्यांचा मतदारसंघ प्रचंड मोठा, म्हणजे तब्बल नऊ तालुयांचा. नांदगाव, मनमाड, चांदवड, येवला, पिंपळगाव बसवंत, ओझर अशा सहा नगरपरिषदा त्यांच्या कार्यक्षेत्रात येतात.

या सहा पालिका मिळून केवळ तीन नगरसेवक भगरेंच्या राष्ट्रवादीचे निवडून आले आहेत. गंमत म्हणजे त्यांचे वास्तव्य व कर्मभूमी असलेल्या पिंपळगाव बसवंतला त्यांचे शालक गोपालकृष्ण गायकवाड यांचा नगराध्यक्षपदाच्या लढतीत दारूण पराभव झाला. शोभा बच्छाव यांच्या कार्यक्षेत्रातील केवळ सटाणा येथेच निवडणूक होती. तेथे तर त्यांच्या काँग्रेस पक्षातर्फे केवळ एकच उमेदवार उभा होता. त्यांचाही पराभव झाला हे ओघाने आलेच; परंतु ऐतिहासिक विजय मिळविणार्‍या शोभाताईंच्या घरच्या मतदारसंघात नगाला नग म्हणूनसुद्धा उमेदवार मिळविता येऊ नये हे अति झाले. पक्षपातळीवर काही प्रयत्न झाले म्हणावे तर तसेही काही नाही. सटाण्याचे पक्षाचेच लोक म्हणतात की, लोकसभेनंतर ताई सटाण्याला फिरकल्याच नाहीत. एकूणच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडीच्या तीनही खासदारांच्या प्रगतीपुस्तकात केवळ लाल शेरेच दिसतात.

भविष्यात यश मिळवायचे असेल तर या सर्वांना प्रचंड काम करावे लागेल. अर्थात, निफाड विधानसभा मतदारसंघातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर यांच्या दृष्टीनेही या निवडणुकीत धोयाची घंटा वाजली आहे. पिंपळगाव व ओझऱ पालिकांमध्ये त्यांचा पक्ष तिसर्‍या क्रमांकावर फेकला गेला आहे. पिंपळगाव या घरच्या गावातही त्यांना केवळ सात जागा जिंकता आल्या. नशिबाने त्यांचे पुतणे विजयी झाले, अन्यथा चांगलेच हसे झाले असते. दिलीप बनकर यांच्या राजकारणाच्या दृष्टीने ही दोन गावे अत्यंत महत्त्वाची समजली जातात. तेथेच त्यांचे खच्चीकरण झाल्याने आगामी काळात त्यांना नव्याने मांडणी करावी लागेल. पिंपळगावच्या राजकारणावर जबरदस्त मांड टिकवून असलेले भास्करराव बनकर यांच्याशी सत्तेसाठी युती केली खरी; पण तीच मुळावर उठल्याने यापुढे या दोघांसह तानाजी बनकर यांनाही राजकीय अवकाशाची फेरमांडणी करावी लागेल. तरुणांच्या हातात सत्ता आली आहे. मोरे कुटुंबांकडे दीर्घ कालावधीनंतर गावाचा कारभार आल्याने स्वअस्तित्वाचे बनकरांपुढे तेदेखील आव्हान राहील.

चांदवडमध्ये भारतीय जनता पक्षाने सत्ता राखली असली तरी अपेक्षित यश मिळविण्यात ते कमी पडले. आमदार राहुल आहेर यांचे कट्टर विरोधक शिरीष कोतवाल यांना काँग्रेसमधून भाजपमध्ये आणल्यानंतरही भाजपचा आकडा वाढू शकला नाही, याचे आत्मपरीक्षण आमदार आहेर यांना करावे लागेल. भूषण कासलीवाल यांच्या वाढत्या आकांक्षांमुळे कोतवालांना पक्षात आणून आहेरांनी भविष्याची बेगमी करून ठेवण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यामुळे पक्षावरच गंडांतर येता येता वाचले. शिरीष कोतवाल यांना मानणारे काही अपक्ष निवडून आले आहेत. उमेदवारी नाकारल्याने बंडखोरी केलेले काही जण विजयी झाल्याने त्यांची डोकेदुखी चालूच राहू शकते. तसेच भाजपमधीलही काही नगरसेवक हे पूर्वीचे कोतवालांचे समर्थक राहिलेले आहेत. कोतवाल यांचे चिरंजीव राहुल यांच्या राजकीय कारकीर्दीचा श्रीगणेशा यानिमित्ताने सुफळ संपूर्ण झाला.

विधानसभेतील दारूण पराभवानंतर पक्षांतर करून कोतवालांनी मुलाच्या माध्यमातून विजयाला गवसणी घातली आहे. साहजिकच त्यांचे हौसले बुलंद असतील. त्यामुळेच भविष्यात कोतवालांना नियंत्रणात ठेवून आपला प्रभाव वाढविणे वा टिकविणे हे नेतृत्वाची आस बाळगून असलेले भूषण कासलीवाल व आमदार राहुल आहेरांच्या दृष्टीने आव्हान राहू शकते. शिरीष कोतवाल हे धुरंधऱ आहेत. सात वेळा विधानसभा लढवून केवळ दोनदा विजय मिळविता आलेला असला तरी तालुयातील जवळपास सर्वच स्थानिक संस्थांवर त्यांचा प्रभाव राहिलेला आहे. केव्हा ना केव्हा असंख्य कार्यकर्ते त्यांच्या मांडवाखालून गेलेले असल्याने आमदार आहेरांना डोळ्यांत तेल घालूनच राजकारण करावे लागू शकते. देवळ्यात त्यांचे बंधू केदा यांनी आधीच सवता सुभा मांडला आहे. चांदवडमध्ये आत्माराम कुंभार्डे पक्षात होते तेव्हाही कधी बरोबर नव्हते. त्यामुळे आता ही सारीच नाराज, असंतुष्ट मंडळी एका व्यासपीठावर येऊ शकते, हा धोका ओळखून आमदार आहेरांना राजकीय पावले टाकावी लागतील.

ताज्या बातम्या