Monday, May 20, 2024
Homeमुख्य बातम्यामनपाचे 262 व्यावसायिक गाळे वापराविना

मनपाचे 262 व्यावसायिक गाळे वापराविना

नाशिक । देशदूत टीम Nashik

नाशिक महानगरपालिकेच्या आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने सातत्याने प्रयत्न केले जात आहे. थकबाकीदारांकडून वसुलीसाठी ढोल बजाव मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्या माध्यमातून मनपा मोठ्या प्रमाणात उत्पन्नवाढ करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला असला तरी मनपाच्या अनेक वास्तू आजही वापराविना पडून असल्याने त्या माध्यमातून उत्पन्नाचे स्त्रोत केव्हा जिवंत केले जातील, असा सूर सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे.

- Advertisement -

सातपूर विभागाचा विचार केल्यास विभागातील विविध व्यापारी संकुल व बाजारपेठांमध्ये अनेक गाळे आजही वापराविना पडून आहेत. काही गाळे वाटपच झालेले नाही तर काही गाळे थकबाकीमुळे जप्त करण्यात आलेले आहेत. मात्र, गाळ्यांचे वाटप केल्यास नवीन उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होण्यास मदत होईल.

सातपूर विभागातील आनंदवली गावामध्ये गेल्या दहा वर्षांपासून शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधून पडलेला आहे. याचे वाटप अडचणीत आलेले आहे. मात्र, प्रशासकीय कार्यकाळामध्ये या गाळ्यांचे वाटप करून उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करणे सहज शक्य असल्यास मनपा आयुक्त यावर लक्ष देतील, अशी अपेक्षा आहे.

नाशिक महानगरातील विविध पाच भागांतून सुमारे 262 गाळे रिक्त आहेत. तर 58 गाळे जप्त केलेले बंद अवस्थेत आहेत. या गाळ्यांचे गतीने वाटप करुन नागरिकांना उपलब्ध करुन दिल्यास रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्यास मदत होईल. सोबतच मनपाच्या बंद गाळ्यांपासून उत्पन्नाचे नवे स्त्रोत जिवंत होण्यास मदत होईल. सातपूर विभागातील शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी मार्केट हे देखील गेल्या अनेक वर्षांपूर्वी बांधलेले आहे. 2003 सालानंतर या मार्केटच्या वाटपाचे नियोजनच झालेले दिसून येत नाही. अनेक वेळा विस्थापितांद्वारे मागणी करण्यात आली. मात्र प्रशासन त्यावर लक्ष देत नसल्याचे बोलले जात आहे. या गाळ्यांचे नियोजन करून त्याचे वाटप केल्यास निश्चितच सर्वसामान्यांना व्यवसायाची संधी उपलब्ध होईल आणि त्यासोबतच महापालिकेच्या उत्पन्नात ही मोठ्या प्रमाणात भर टाकण्याला मदत होईल, असा विश्वास नागरिक व्यक्त करीत आहेत.

सातपूरचे मटन मार्केटचे गाळे महापालिकेच्या स्थापनेच्या आधी नगरपालिका असताना बांधलेले आहेत. मागील 50 वर्षांत या मार्केटकडे तूटफूट दुरुस्ती सोडून काहीच केलेले नाही. गेल्या अनेक वर्षात वाढलेली नागरी वसाहत पाहता गाळ्यांचे देखील नव्याने नियोजन करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजे. या ठिकाणी नवे गाळे बांधून, नवीन मार्केट बांधून व्यावसायिकांना उपलब्ध करण्याची मागणी करण्यात येत आहे.

नवीन नाशिक परिसरात मनपाने कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेले गाळे वापराविना बंद अवस्थेत तर आहेत. नवीन नाशिक परिसरात मनपाच्या सुमारे 79 गाळे बांधण्यात आले आहे. त्यातील 56 वाटप करण्यात आले असून 23 गाळे वापराविना पडून आहेत. संभाजी स्टेडियमच्या मागे, दत्त मंदिर अमरधामच्या बाहेर, चुंचाळे घरकुल योजना येथे व्यावसायिक गाळे बांधण्यात आले असून त्यातील बरेच गाळे हे अद्यापही जास्त दर असल्याने धूळखात पडून आहेत. मनपाचे उत्पन्नाचे स्त्रोत या पडिक गाळ्यांमुळे बंद आहे. हे गाळे वापरास द्यावे, अशी मागणी नवीन नाशिककरांनी केली आहे.

तिबेटियन गाळे फुल

नाशिक महापालिकेचा पश्चिम विभाग तसा सुखवस्तू वसाहतीचा विभाग आहे. या परिसरात मनपाच्या गाळ्यांना विशेष मागणी राहिलेली आहे. त्यामुळे दोनमजली पालिका बाजार, तिबेटियन गाळे फुल आहेत. त्यालगत मनपाने सुरुवातीला बांंधलेल्या शरणपूर भाजीपाला मार्केटला आता सुगीचे दिवस आले आहेत. पश्चिम विभागात जागेचे भाव प्रचंड वाढल्यापासून येथे शरणपूर मार्केटमध्ये सरुवातीला ज्यांनी गाळे घेतले त्यांंना आता त्यांची फळे मिळू लागली आहे.

मात्र, या भागात असलेला पालिका भाजीबाजारात मात्र भाजीपाला, मासळी बाजार बसवण्याची संकल्पना होती. मात्र तितकासा प्रतिसाद न मिळाल्याने हा भाजीबाजार ओस पडलेला दिसून येतो. या मार्केटच्या वरच्या मजल्यावर विविध कार्यालयांसाठी जागा तयार करण्यात आली होती. या गाळ्यांमध्ये सध्या भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, तसेच ब्रम्हा व्हॅली शिक्षण संस्था यांचे कार्यालय आहे. तसेच काही खासगी संंस्थांनी कार्यालये थाटली आहे. सायंकाळी तर चायनीय फूडचे मार्केट एवढे बहरते. रोज यात्रा भरल्यासारखे वातावरण असते. येथे स्वच्छतागृह व दैनंंदिन स्वच्छता व पार्किंगच्या प्रश्नाकडे गांंभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. मात्र त्यासाठी महापालिकेला पैशांची गरज असते, म्हणून महापालिकेच्या वतीने शहरातील विविध भागांमध्ये आपल्या जागांवर व्यावसायिक इमारती उभ्या केल्या असल्या तरी त्यातील अनेक इमारती अद्याप रिकाम्या असल्याने महापालिकेचे कोट्यवधी रुपये उत्पन्न थांबले आहे तर दुसरीकडे अशा इमारतींमध्ये गुन्हेगारी स्वरूपाचे लोक आश्रय घेत असल्यामुळे ती डोकेदुखी वेगळी आहे.

शहरातील मध्य भाग असलेल्या जुने नाशिक भागात अनेक ठिकाणी महापालिकेच्या वतीने व्यावसायिक गाळे तयार करण्यात आले आहे. वर्षानुवर्षे ते बंदच आहे. महानगरपालिकेच्या आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने सातत्याने प्रयत्न केले जात आहे. जुने नाशिक विभागाचा विचार केल्यास विभागातील विविध व्यापारी संकुल व बाजारपेठांमध्ये अनेक गाळे आजही वापराविना पडून आहे. काही गाळे वाटपच झालेली नाही तर काही वेळेस थकबाकीमुळे जप्त करण्यात आलेले आहेत. सुमारे तीन दशकांपूर्वी तयार करण्यात आलेल्या भद्रकाली पोलीस ठाणे समोरील महात्मा फुले मंडईतील शेकडो गाळे तसेच ओटे यांच्यावर कोट्यवधी रुपये थकबाकी बाकी आहे.

मध्यंतरी ही मंडई तोडून त्या ठिकाणी बहुमजली इमारत तयार करण्याचा विचार सुरू झाला होता. त्या वेळेला स्थानिक नगरसेवकांसह प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांनी पाहणी देखील केली होती. मात्र नंतर हा प्रस्ताव कुठे गेला याचा पत्ताच लागत नाही. या ठिकाणी बहुमजली इमारत उभी राहिली तर त्याच्या फायदा परिसरातील व्यापार्‍यांचा नागरिकांना देखील होणार आहे. सध्या या ठिकाणी वाहन पार्किंगची मोठी समस्या निर्माण झालेली आहे. जर नवीन इमारत बहुमजली झाली तर तळ मजल्यावर पार्किंगसाठी भरपूर जागा उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे सध्या असलेल गाळ्यांच्या संख्येत तीन पटीने वाढ होऊन व्यवसाय करण्याच्या संधी उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे महापालिकेच्या उत्पन्नात देखील मोठी भर पडणार आहे.

मागील अनेक वर्षापासून हा प्रस्ताव मागे पडला असून प्रशासनाने याबाबत विचार करून निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तीन मजली या संकुलच्या काही गाळ्यांचा लिलाव झाला असला तरी अद्याप निम्म्यापेक्षा जास्त गाळे बंदच आहे. तळमजल्यावरील दुकानांना मागणी असली तरी वरच्या दुकानांना मात्र मागणी नसल्यामुळे महापालिकेचा उत्पन्न बुडत आहे. बंद पडलेले गाळे, दुकाने सुरू झाल्यास रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्यास मदत होईल, सोबतच मनपाला उत्पन्नाचे नवे स्त्रोत जिवंत होण्यास मदत होईल. मात्र प्रशासन त्यावर लक्ष देत नसल्याचे बोलले जात आहे.

शहरातील महापालिकेच्या एकमेव मटन मार्केट जुने नाशिक परिसरात आहे, मात्र त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे त्याची बिकट अवस्था झाली आहे. भली मोठी जागा असून देखील त्याच पाहिजे तसा उपयोग होताना दिसत नाही. त्यामुळे या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यात यावी व इतर व्यावसायिकांना देखील त्यात व्यवसाय करण्याची संधी देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांची आहे. या ठिकाणी महापालिकेचे आयुक्तांनी देखील पाहणी करून त्याच्या प्रस्ताव सादर करण्याचे आदेश सहा वर्षांपूर्वी दिले होते, मात्र त्याच्याही पुढे काही झाले नाही व सध्या हे मटन मार्केट अत्यंत दुरवस्थेत सापडले आहे. चोहोबाजूने या ठिकाणी घाण कचरा पडून असतो.

गर्दुल्ल्यांच्या ताबा

जुने नाशिक परिसरात बंद पडलेल्या महापालिकेच्या गाळ्यांमध्ये गर्दुल्ले यांची गर्दी होत आहे. त्यामुळे या ठिकाणी गुन्हेगारी वाढत आहे. अनेक वेळा आपसात भांडण करून हे गर्दुल्ले परिसरात तणाव निर्माण करतात तर पोलिसांना यावे लागते. महापालिकेने आपल्या मालमत्तांकडे लक्ष देऊन व्यवस्थित निगा ठेवली तर असे उद्योग बंद होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या