Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदिंडोरी-पिंपळगाव रस्ता रुंदीकरणास विरोध

दिंडोरी-पिंपळगाव रस्ता रुंदीकरणास विरोध

भू-संपादन न करता रस्त्याचे काम सुरू केल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचे साखळी उपोषण सुरू

- Advertisement -

दिंडोरी | तालुका प्रतिनिधी Dindori

YouTube video player

दिंडोरी–पालखेड–लोखंडेवाडी–जोपूळ मार्गे सिंहस्थ निधीतून त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या बायपास रस्त्याचे काम भू-संपादन न करता सुरू केल्याच्या निषेधार्थ जोपूळ येथे बाधित शेतकऱ्यांनी साखळी उपोषणास सुरुवात केली आहे. जोपर्यंत भू-संपादन करून योग्य मोबदला दिला जात नाही, तोपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका शेतकरी कृती समितीने घेतली आहे.

गेल्या दीड महिन्यांपासून पालखेड, जोपूळ व लोखंडेवाडी, धामणवाडी, चिंचखेड येथील शेतकरी एकत्र येत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी व उपअभियंता यांच्याकडे वारंवार अर्ज सादर करत आहेत. आधी भू-संपादन करा, नियमानुसार भरपाई द्या आणि त्यानंतरच काम सुरू करा, अशी मागणी ग्रामसभेच्या ठरावाद्वारेही करण्यात आली आहे. मात्र या नोटिसांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

या प्रकरणात मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मध्यस्थी करत जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. त्या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागास रस्त्याचे नकाशे, भू-संपादनाचा तपशील देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र विभागाकडून केवळ संबंधित रस्ता जिल्हा मार्ग किंवा राज्य मार्ग कधी झाला व त्याची मानक रुंदी किती असते, इतकीच माहिती देण्यात आली. भू-संपादनाबाबत कोणताही ठोस तपशील न दिल्याने शेतकरी असमाधानी राहिले.
यानंतर पुन्हा ग्रामसभा घेऊन “आधी भू-संपादन व भरपाई, नंतरच रस्ता रुंदीकरण” असा ठराव सर्व संबंधितांना देण्यात आला. त्यावरही कोणतीच कार्यवाही न झाल्याने अखेर आज (दि. ३) पासून जोपूळ येथे साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.

या उपोषणाला शिवसेनेचे संपर्कप्रमुख सुनील पाटील व तालुकाप्रमुख अमोल कदम यांनी भेट देत पाठिंबा दिला. त्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करून न्याय देण्याची मागणी केली.आंदोलनास शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहे. प्रशासनाने त्वरित भू संपादन करत मोबदला देण्याची भूमिका घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

पालखेड, लोखंडेवाडी, जोपूळ, धामणवाडी व चिंचखेड येथील बहुतांश शेतकऱ्यांच्या जमिनी यापूर्वी धरण व कालव्यांसाठी संपादित झालेल्या असून ते अत्यल्प भूधारक आहेत. पूर्वी ३.७५ मीटर असलेला रस्ता आता तिप्पट रुंद करण्यात येत असल्याने पुन्हा मोठ्या प्रमाणावर जमीन जाण्याची भीती आहे. आजपर्यंत या रस्त्यासाठी कधीही भू-संपादन झालेले नसल्याने आवश्यक जागेचे नियमानुसार संपादन करून योग्य मोबदला द्यावा, ही शेतकऱ्यांची रास्त मागणी आहे. सरकारने या प्रकरणात तत्काळ लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा.
— रोशन उगले, शेतकरी

दिंडोरी तालुका शिवसेनेचा या उपोषणाला पाठिंबा असून आम्ही सर्व पदाधिकारी या उपोषणात सक्रिय सहभाग घेत आहोत. शेतकर्‍यांच्या मागण्या रास्त असुन शेतकर्‍यांच्या भावनांना शासनाने न्याय द्यावा, यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शेतकर्‍यांच्या मागण्यांचा पाठपुरावा करु व न्याय मिळवून देवू व शेतकर्‍यांना चांगला फायदा करण्यासाठी प्रयत्न करु.
अमोल कदम, तालुकाप्रमुख शिवसेना, दिंडोरी

ताज्या बातम्या

Ahilyanagar : शेवगावच्या गायके खून खटल्यातील तीन आरोपींना जन्मठेप

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar भावकीतील जुन्या वादातून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात वडिलांचा मृत्यू व मुलगा गंभीर जखमी झालेल्या प्रकरणी येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एच....