Saturday, June 15, 2024
Homeनगरसात वर्षात 30 हजार मद्यसेवन परवाने

सात वर्षात 30 हजार मद्यसेवन परवाने

परवाना न घेताच रिचवणार्‍यांची संख्या मोठी

अहमदनगर | सचिन दसपुते| Ahmednagar

- Advertisement -

रेस्टो बार, पबमध्ये देशी व विदेशी मद्यसेवनसाठी, मद्याच्या दुकानातून मद्य खरेदीसाठी कायद्याने आवश्यक असलेला परवाना गेल्या सात वर्षात जिल्ह्यातील फक्त 29 हजार 708 लोकांनी घेतला आहे. यामध्ये एक वर्षासाठी 18 हजार 638 व कायमस्वरूपीसाठी 11 हजार 70 इतके परवाने काढणार्‍यांचा समावेश आहे. परवाना घेण्याचे हे प्रमाण नगण्य आहे. मात्र एक दिवशीय देशी व विदेशी मद्य सेवन परवान्यांची संख्या गेल्या सात वर्षात 13 लाख 23 हजार 500 झाली आहे. दरम्यान, त्यामुळे मद्यविक्री आणि मद्यसेवन मोठ्या संख्येने बेकायदा पध्दतीने सुरू असल्याचे दिसून येते.

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये भरधाव आलिशान कारने धडक दिल्याने दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. ही कार अल्पवयीन मुलगा चालवित होता आणि त्याने मद्यसेवन केल्याचे समोर आले. त्यावरून अल्पवयीन मुलांना मद्याविक्री का केली, अशा प्रश्न उपस्थित झाला.

तसेच, त्या मुलाला मद्य देणार्‍या पब चालकांवर गुन्हा दाखल करून त्याला अटकही कारण्यात आली. मात्र, या प्रकरणावरून मद्यविक्री किंवा मद्यसेवनात नियमांचे पालन होत नसल्यावर शिक्कामोर्तब झाले. या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्कच्या नगर विभागाकडून नगर जिल्ह्यातील मद्यसेवन परवान्याची माहिती घेतली असता एक वर्षासाठीचा आणि कायमस्वरूपीचा परवाना घेणार्‍यांचे प्रमाण नगण्य असल्याचे दिसून आले. देशी व विदेशी मद्य सेवन परवाने ऑनलाईन पध्दतीने देण्यास सन 2017 पासून सुरूवात झाली. यापूर्वी ऑफलाईन पध्दतीने अर्ज करून परवाना घेता येत होता. ऑनलाईन पध्दतीने परवाना मिळत असतानाही तो काढण्याकडे मद्यपान करणारे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते.

मद्यविक्री आणि मद्यसेवन यावर राज्य उत्पादन शुल्क विभाग नियंत्रण ठेवतो. त्यासाठी परवाना बंधनकारक आहे. उत्पादन शुल्क विभागाकडून एक दिवस, एक वर्षाचा किंवा कायमस्वरूपी परवाना दिला जातो. मात्र, हे परवाने घेण्याकडे मद्यपान करणारे दुर्लक्ष करतात. उत्पादन शुल्कच्या नगर कार्यालय व विभागाच्या कार्यक्षेत्रीय अधिकार्‍यांमार्फत 2017 पासून आजपर्यंत एक वर्षासाठी 18 हजार 638 व कायमस्वरूपीसाठी 11 हजार 70 इतके परवाने वितरीत करण्यात आले आहेत.

नाममात्र शुल्क, तरीही कानाडोळा

एक दिवसाचा परवाना काढण्याकडे मद्यापान करणार्‍यांचा कल जास्त असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. एक दिवसाचा परवाना काढण्यासाठी देशी दोन रूपये व विदेशी मद्यासाठी पाच रूपये शुल्क आकारले जाते. सन 2017 पासून आतापर्यंत 13 लाख 23 हजार 500 लोकांनी एक दिवसांचा मद्यसेवन परवाना काढला आहे. एक दिवसाचा परवाना काढण्यासाठी रेस्टो बार, पबमध्ये सुविधा उपलब्ध करून दिली जाते. एक वर्षाचा परवाना काढण्यासाठी 100 रूपये तर कायमस्वरूपीचा परवाना काढण्यासाठी एक हजार रूपये शुल्क आकारले जाते. ही पध्दत ऑनलाईन आहे. तरीही परवाना काढण्याकडे मद्यपान करणार्‍यांनी कानाडोळा केल्याचे दिसून येते.

मद्यपान करणार्‍यांनी विना परवाना रेस्टो बार मध्ये देशी व विदेशी मद्यसेवन करू नये तसेच मद्याच्या दुकानातून विना परवाना मद्य खरेदी करू नये, असे आढळून आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

– प्रमोद सोनोने, अधीक्षक उत्पादन शुल्क विभाग नगर.

- Advertisment -

ताज्या बातम्या