नाशिक | प्रतिनिधी
पारंपरिक इंधनास पर्याय म्हणून आता इलेक्ट्रिक (इव्ही) वाहनांना पसंती मिळत आहे. त्यानुसार नाशिकमध्ये सन २०२१ पासून जून २०२५ पर्यंत ३३,२०० इव्ही वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. या वाहनांमध्ये सर्वाधिक दुचाकी व मोपेड वाहनांचा समावेश असून, त्याखालोखाल चारचाकी वाहनांना पसंती आहे. सोबतच, वरील कालावधीत जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, वीज व सीएनजीवर धावणाऱ्या तब्बल ४,६७,७२८ नव्या वाहनांची नोंद नाशिक प्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभागाकडे झाली आहे.
राज्यात सन २०२१ ते जून २०२५ या कालावधीत ५,७३,१८९ ‘इव्ही’ वाहनांची खरेदी झाली आहे. त्यापैकी पुणे व पिंपरी चिंचवड जिल्ह्यात सर्वाधिक ‘इव्ही’ वाहने आहेत. यावर्षी नाशिक जिल्हा इव्हीच्या वापरासह खरेदीत राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. ‘इव्ही’ वापरास प्राधान्य मिळत असल्याने व वाहनांमध्येही आमुलाग्र बदल व फिचर मिळत असल्याने खरेदीचा जोर कायम आहे. इलेक्ट्रिक वाहन धोरणाच्या अंमलबजावणीसाठी पुढील पाच वर्षांसाठी तब्बल १,९९३ कोटी रुपयांच्या निधींच्या तरतुदीस मंजुरी देण्यात आली आहे. या नवीन धोरणाचा इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणाऱ्या नागरिकांना मिळणाऱ्या भरघोस सवलती आणि सबसिडीचा फायदा घेतला जात आहे.
दरम्यान, लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्यादेखील उच्चांक गाठत आहे. ‘स्मार्ट सिटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक शहरासह एमआयडीसीतील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे दळणवळणाचे जाळे हे अधिक पसरत आहे. दळणवळणासाठी रेल्वे, सिटीलिंक, एनएमएमटी, रिक्षा असे सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय देखील आहेत. तरीही अनेकांकडून खासगी वाहनांचा वापर वाढला आहे. मुंबई, पुणे, छ. संभाजीनगर, ठाणे, धुळे, नागपूर या शहराबरोबरच राष्ट्रीय महामार्गांना जोडणारे रस्ते उपलब्ध झाल्याने शहरातील रस्त्यावर चारचाकी, दुचाकी वाहनांबरोबरच ऑटो रिक्षा, खाजगी टुरिस्टच्या बसेसमध्ये देखील वाढ झाली आहे. त्यातच, वाहुतक व्यवस्था सुरळीत नसल्यामुळे खासगी वाहनांचा बापर वाढला आहे. शिवाय कर्ज उपलब्धतीमुळे वाहन घेणे आता सोयीस्कर झाले आहे. त्यामुळे इव्हीसह पेट्रोल, डिझेल व तत्सम पर्यायांवर धावणाऱ्या वाहनांसाठी खरेदीदारांची संख्या रोजच वाढत आहे.
३४० कोटींहून अधिक महसूल
चार लाख नव्या वाहननोंदीतून नाशिक आरटीओला सरासरी ३४० कोटींहून अधिकचा महसूल मिळाल्याचे समजते. नाशिक विभागात जानेवारी २०२२ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत जिल्ह्यात २,१९,९०० नव्या वाहनांची नोंद झाली. त्यामुळे नाशिककरांनी सरासरी दररोज २७८ नवीन वाहने खरेदी केल्याचे आरटीओचे म्हणणे आहे. त्यात सर्वाधिक दुचाकी वाहनांचा समावेश आहे.
सतरा लाख वाहने
दुचाकी :१२,९६,१७८
स्कूटर :२,३२,५१९
(काही स्क्रॅप आहेत)
मोपेड : ६७,२९१
कार : २,८६,६८५
जीप : ३०,५१६
रिक्षा : ३२,३९०
कॅब : ५,७४८
स्कूल बसेस : २,६५६
रुग्णवाहिका : ९१६
ट्रक : ३६,५९०
टैंकर
डिलीव्हरी व्हॅन ६०१
(चारचाकी) : ४८,७१०
(तीनचाकी) : १,६६४
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





