मुंबई | Mumbai
पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हवेत, पण उमेदवार बदला, असे धक्कादायक निष्कर्ष भाजपच्या सर्वेक्षणात आले असल्याने आमदार-खासदारांना उमेदवारीची चिंता वाटू लागली आहे. भाजपच्या विद्यमान खासदार आणि आमदारांपैकी सध्याच्या परिस्थितीत साधारणपणे 60 टक्के जागा भाजप जिंकू शकते आणि 40 टक्के जागा धोक्यात असल्याचा निष्कर्ष भाजपने केलेल्या सर्वेक्षणात नोंदविण्यात आले असल्याचे वृत्त एका वृत्तसमूहाच्या ऑनलाईन पोर्टलने दिले आहे.
या वृत्तानुसार, भाजप पक्षश्रेष्ठींनी तीन-चार राजकीय सर्वेक्षण कंपन्यांकडून राज्यातील प्रत्येक लोकसभा-विधानसभा मतदारसंघाचे सर्वेक्षण गेल्या दोन-अडीच महिन्यात केले. उपमुख्यमंत्री अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यावर नव्याने सर्वेक्षण करण्यात आले. प्रत्येक मतदारसंघातील राजकीय परिस्थिती, आमदार-खासदारांचे कार्य, जनता व पदाधिकार्यांशी वर्तन, समाजमाध्यमांवरील सहभाग, जनतेचे मोदी आणि आमदार-खासदाराविषयीचे मत आदी बाबींविषयी विस्तृत सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार राज्यातील प्रत्येक आमदार-खासदाराच्या मतदारसंघातील परिस्थितीचा आढावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी दिवसभर व रात्री उशिरापर्यंत घेतला. त्यात भाजपच्या प्रत्येक आमदार-खासदाराचे सर्वेक्षणानुसारचे रिपोर्ट कार्ड देण्यात आले व त्याविषयी कुठेही वाच्यता न करण्याची ताकीद देण्यात आली. लोक प्रतिनिधीच्या कामानुसार त्यांना श्रेणी देण्यात आल्या असून तो मतदारसंघ भाजपला किती सुरक्षित आहे किंवा धोक्यात आहे, याविषयी बारीकसारीक तपशील देण्यात आला आहे.
भाजप शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना त्यांच्या विद्यमान आमदार-खासदारांव्यतिरिक्त फारशा जागा देणार नाही. विधानसभेसाठी साधारणपणे 170 जागा भाजप लढविण्याची तयारी करीत असून उर्वरित जागा शिंदे व पवार गटाला दिल्या जातील. अजित पवारांबरोबर किती आमदार आहेत, हा आकडा अजून गुलदस्त्यात असल्याने त्यांना त्यांच्याकडे असलेल्या आमदारांव्यतिरिक्त फारशा जागा मिळणार नाहीत.
सर्वेक्षणात जनतेकडून मोदी आणि आमदार-खासदाराबाबत घेतलेल्या प्रतिसादानुसार 50-60टक्के लोकांनी मोदींना पसंती दिली आहे, मात्र उमेदवार बदलण्याचे मत व्यक्त केले आहे. संबंधित लोकप्रतिनिधीने करोना काळात व नंतरही आरोग्य प्रश्नी मदत केलेली नाही, अन्य कामे केलेली नाहीत, उर्मटपणे वागणूक दिली जाते, भ्रष्टाचार आहे, आदी अनेक तक्रारी केल्या आहेत. भाजप पक्षश्रेष्ठींनी हा अहवाल गंभीरपणे घेतला असून पुढील सर्वेक्षण डिसेंबरमध्ये होणार आहे. प्रत्येक आमदार-खासदारांच्या कामाच्या व अहवालातील श्रेणीनुसार निवडणुकीत उमेदवारी दिली जाईल. कोणीही पक्षाला गृहीत धरू नये, याची स्पष्ट कल्पना लोकप्रतिनिधींना दिली असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.