नाशिक। प्रतिनिधी Nasik
गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देण्यासोबतच शहर पोलिसांनी बेरोजगार तरुणांसाठी युवाशक्ती फाऊंडेशनच्या विद्यमाने मिळून रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यात ५१३ पैकी ४३१ तरुण-तरुणींना २२ कंपन्यांमध्ये १५ ते ३० हजार रुपये प्रति महिना वेतनाच्या नोकऱ्या मिळाल्या आहेत. त्यामुळे तरुणांना रोजगार तर कंपन्यांना मनुष्यबळ मिळाल्याचे सकारात्मक चित्र बुधवारी पहावयास मिळाले.
पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या संकल्पनेतून आणि युवाशक्ती फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने शहर पोलिसांनी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले हाेते. त्यात नाशिकसह इतर जिल्ह्यांमधील २२ नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवला. नावनोंदणी केलेल्या तरुण-तरुणींच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी ५१३ जणांनी नावनोंदणी केली होती. त्यापैकी ४३१ जणांना जागेवर नियुक्ती पत्रक देण्यात आले.
यावेळी पोलीस आयुक्त कर्णिक यांच्यासह उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, मोनिका राऊत, चंद्रकांत खांडवी, युवाशक्ती फाऊंडेशनचे संचालक विक्रमादित्य पवार, व्यवस्थापक गिरीष लाड, सहव्यवस्थापक वैभव कुलकर्णी, वरिष्ठ निरीक्षक रणजीत नलवडे आदी उपस्थित होते.
५१ पाेलीस पाल्यांची निवड
मेळाव्यात ६३ पोलिस पुत्रांनी सहभाग घेतला होता. त्यातील ५१ पाल्यांना नियुक्तीपत्रक देण्यात आले आहे. तर, नाशिकसह जळगाव, कांदिवली, रत्नागिरी व पुणे या विभागांसह गोवा राज्यातील एकूण २२ कंपन्यांनी सहभाग घेतला होता. त्यात १ हजार ३२५ रिक्त पदांसाठी मुलाखती घेण्यात आल्या. आयटी, ऑटोमोबाईल, फार्मा ,कॅपिटल गुड्स ,बँकिंग तसेच इतर क्षेत्रातील कंपन्यांनी यात सहभाग नोंदवला होता. अप्रेंटिस, ट्रेनि, फिक्स टर्म तसेच कंपनी रोल वरील पदांसाठी मुलाखती पार पडल्या.