मुंबई | प्रतिनिधी Mumbai
राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीत भाजपचे ४४ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यात कल्याण – डोंबिवली महापालिकेत सर्वाधिक १५ उमेदवारांचा समावेश आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी दिली. या सर्व उमेदवारांचे चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे.
महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आज अखेरचा दिवस होता. अर्ज मागे घेण्यासाठी दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत होती. ही मुदत संपल्यानंतर राज्यभरात भाजपचे ४४ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे स्पष्ट झाले.
कल्याण – डोंबिवली १५, पुणे २, पिंपरी चिंचवड २, पनवेल ६, भिवंडी ६, धुळे ४, जळगाव ६, अहिल्यानगर ४ असे एकूण भाजपचे ४४ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. ही बिनविरोध निवड म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार करत असलेल्या विकास कामांवर मतदारांचा असलेला विश्वास आहे. कारण मतदार भाजप उमेदवारालाच निवडून देणार याची खात्री विरोधी उमेदवारांनाही असल्यामुळे त्यांनी माघार घेतली, असे चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे १९ उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहेत.




