नाशिक । भारत पगारे
देशातील अवघे 46 टक्के तरुण हे पदवीनंतर नोकरीसाठी पात्र असतात, असा अहवाल केंद्र शासनाच्या अखत्यारीत येणार्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) जाहीर केला आहे. परिषदेने जाहीर केलेल्या ‘इंडिया स्किल्स रिपोर्ट 2019-20’ मध्ये ही बाब समोर आली आहे. आनंदाची बाब म्हणजे रोजगाराच्या संधी उपलध करून देणार्या देशातील नव्या शहरांच्या यादीत नाशिक आणि ठाण्याचा समावेश झाला आहे. त्यामुळे भविष्यात नोकरीच्या विपुल संधी दृष्टिक्षेपात आहे.
आंध्रप्रदेश हे सर्वाधिक रोजगार निर्माण करणारे राज्य ठरले आहे, तर महाराष्ट्र सर्वाधिक रोजगार देणार्या राज्यांच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे. मुंबई हे सर्वाधिक रोजगार देणारे शहर ठरले असून त्याखालोखाल हैदराबाद, बंगळुरू, नवी दिल्ली, पुणे, लखनौ या शहरांचा क्रमांक लागतो. शिक्षकांना चांगले प्रशिक्षण आणि पायाभूत सुविधा देण्याच्या दृष्टीने तातडीने पावले उचलावीत, अन्यथा ही परिस्थिती आणखी बिकट होईल, असा गर्भित इशाराही या अहवालात देण्यात आला आहे. तसेच, तरुणांमध्ये नोकरीसाठी आवश्यक कौशल्ये निर्माण व्हावीत, यासाठी शालेय स्तरावरून प्रयत्न व्हावेत, अशी सूचनाही यात करण्यात आली आहे. आजमितीस एमबीए पदवीधारकांना बाजारात मोठी मागणी आहे. तसेच, त्यांच्यात नोकरीस आवश्यक कौशल्ये असल्याचे या अहवालातून समोर आले आहे.
तर, ‘बीए’ची पदवी घेणार्यांच्या नोकरीकौशल्यांत 2014 पासून दुप्पट वाढ झाली असल्याचेही यात म्हटले आहे. मात्र, मूलभूत विज्ञान क्षेत्रातील पदवीधरांची मागणी मर्यादित राहिली आहे. याच जोडीला एमसीए, बी-फार्मसारख्या पदवीधरांच्या मागणीही गेल्या सात वर्षांपासून स्थिर असल्याचे यात म्हटले आहे. 2020 मध्ये बँकिंग आणि वित्तसेवा आणि विमा क्षेत्र, बीपीओ, केपीओ आणि आयटीशी संबंधित उद्योगांमध्ये तरुणांना मोठी मागणी असेल असे भाकितही यात वर्तविण्यात आले आहे. तसेच या अहवालानुसार पुरुष आणि महिला नोकरदारांच्या संख्येतील तफावत कमी झाली असून काही राज्यात महिला नोकरदारांची संख्या वाढली आहे. यात पहिल्या क्रमांकावर आंध्र प्रदेश आहे, तर महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर आहे.
आवश्यक कौशल्यांचा अभाव
लाखो विद्यार्थी पदवीचे शिक्षण पूर्ण करत असतात. मात्र, ते पदवीधर झाले, तरी त्यांच्यात नोकरीसाठी आवश्यक कौशल्यांचा अभाव असल्यामुळे ते नोकरीस पात्र ठरत नाहीत. अशा तरुणांची संख्या तब्बल 54 टक्के इतकी आहे. गेल्या काही वर्षांपासून या आकड्यांमध्ये कोणतीही सुधारणा झाली नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. यासाठी इंजिनीअरिंग आणि तंत्र शिक्षणात आमूलाग्र बदल करणे अपेक्षित असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
या क्षेत्रात इतकेच नोकरीस पात्र (आकडे टक्केवारीत)
इंजिनीअरिंग – 57 टक्के
एमबीए, पीजीडीएम – 36
बीए, बीएस्सी, बीकॉम – 35
पदव्युत्तर पदवी – 43
पॉलिटेक्निक – 18
हा अहलावाल उपयुक्त
या अहवालातील काही निष्कर्ष आश्चर्यजनक होते. त्यातून अनेक तथ्य बाहेर आली. हा अहवाल, शिक्षण तज्ज्ञ, रोजगार उपलब्ध करून देणार्या संस्था आणि शिक्षणक्रमाची रचना करणार्यांंसह विद्यार्थ्यांनाही दिशादर्शक ठरणार आहे.
-प्रा. अनिल सहस्त्रबुद्धे, अध्यक्ष, एआयसीटीई