मुंबई | Mumbai
मुंबईच्या मालाड मार्व समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी आलेल्या बारा ते पंधरा वर्षे वयोगटातील पाच मुले समुद्रात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुडालेल्या पाच मुलांपैकी दोघांना वाचवण्यात यश आले असून तीन मुले अद्यापही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्याचा काम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मालवणी परिसरातील ही पाच मुले मालाड मारवे समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेली असता यांनी आंघोळ करण्यासाठी समुद्रात उड्या घेतल्या मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ही पाचही मुले बुडू लागली. समुद्रकिनाऱ्यापासून साधारणपणे अर्धा किलोमीटर आत खोल समुद्रात ही मुले बुडाली. यातील दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे.
समुद्र किनारी, चौपाट्यांवर विशेष करुन पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. परंतु समुद्रात उसळणाऱ्या उंच लाटा धोकादायक ठरु शकतात, त्यामुळे समुद्रात जाऊ नये असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात येते. तसेच लाईफ गार्ड व स्थानिक पोलीस याबाबत सतत घोषणा करत असतात. तरीही काही अतिउत्साही पर्यटक सगळ्यांची नजर चुकवून समुद्रात खोल पाण्यात जातात आणि स्वतःचा जीव गमावतात.