शहादा । ता. प्र.
तालुक्यातील पिंपरी येथील एका फॅक्टरी मालकाला धनादेश अनादरप्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम.बी. पाटील यांनी तीन वेगवेगळ्या प्रकरणात एकूण 59 लाख रुपये दंड व एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या या निकालाने व्यापारी वर्गात खळबळ माजली आहे.
पिंपरी येथील सिल्वर पॅक सोल्युशन या पॅकिंग पट्ट्या बनविण्याच्या फॅक्टरीचे प्रोप्रायटर नंदकुमार अशोक पाटील (रा.म्हसावद ता.शहादा) यांनी आपल्या फॅक्टरीतील विविध बांधकामासाठी म्हसावद ता. शाहदा येथील महावीर कृषी सेवा केंद्र या प्रतिष्ठानातून सन 2014 मध्ये वेळोवेळी सुमारे 32 लाख रुपयांचे लोखंड, तार, सिमेंट आदी साहित्य उधारीने खरेदी केलेले होते. ती उधारी चुकती करण्यासाठी त्याच वर्षी नंदकुमार पाटील यांनी कृषी सेवा केंद्राचे मालक योगेश केसरीमल बेदमुथा यांना आयसीआयसीआय बँक खात्याचे अनुक्रमे 5 लाख 15 हजार, 13 लाख 50 हजार व 14 लाख रुपयांचे तीन धनादेश दिले होते. परंतू खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने तीनही धनादेशांचे अनादर झाले.
या प्रकरणी श्री.बेदमुथा यांनी सन 2015 मध्ये शहादा येथील प्रथम वर्ग न्यायालयात तीन वेगवेगळी प्रकरणे दाखल करून दाद मागितली होती. या तीनही प्रकरणात न्यायाधीशांनी आज दि.24 ऑगस्ट रोजी निकाल दिला असून धनादेश अनादर प्रकरणी आरोप सिद्ध झाल्याने नंदकुमार पाटील यांना प्रथम प्रकरणात 9 लाख रुपये दंड व 8 महिन्याचा साधा कारावास, दुसर्या व तिसर्या प्रकरणात प्रत्येकी 25 लाख रुपये दंड व एक वर्ष साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. फिर्यादीतर्फे अॅड.ब्रजेश जायसवाल यांनी काम पहिले.