पंचवटी | प्रतिनिधी Panchavati
म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मखमलाबाद परिसरात एका २१ वर्षीय तरुणाचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोमेश्वर विलास कानकाटे असे मृत तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
म्हसरूळ पोलीस ठाण्याने दिलेल्या अहवालानुसार, मखमलाबादच्या विद्यानगर भागातील सितला देवी मंदिराजवळ राहणारा सोमेश्वर विलास कानकाटे (वय २१) हा तरुण दिनांक ५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ८:३० वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरी असताना त्याला अचानक विजेचा शॉक लागला.
विजेचा शॉक लागल्याने सोमेश्वर गंभीर जखमी झाला. घटनेनंतर तात्काळ त्याचा मावस भाऊ एकनाथ पांडुरंग लहामगे याने त्याला पुढील औषध उपचारासाठी नाशिक येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे रात्री ११:३० वाजेच्या सुमारास डॉ. गावीत यांनी सोमेश्वरची तपासणी करून त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
या माहितीच्या आधारे म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.या प्रकरणी अंमलदार रोशन मरसाळे पुढील तपास करत आहेत. तरुण मुलाचा असा अचानक अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.




