मुंबई | Mumbai
राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आणि ओबीसी असा संघर्ष पाहायला मिळत असतानाच धनगर बांधवही आक्रमक झाला आहे. आज राज्यभर धनगर बांधवांनी आंदोलन सुरु केले आहे. धनगर समाजाला (Dhangar Reservation) अनुसूचित जमात या प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी आज शिंदे सरकार जीआर काढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अजितदादा गटाचे आमदार नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातून आरक्षण देण्याला आपला स्पष्ट विरोध दर्शवत सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. राज्य सरकारने धनगर समाजाला अनुसूचित जमात या प्रवर्गातून आरक्षण देण्याचा शासन अध्यादेश काढला तर राज्यातील ६० ते ६५ आमदार राजीनामा देतील, असा इशारा झिरवाळ यांनी दिला आहे.
राज्य सरकार आज धनगर आरक्षणाचा जीआर काढण्याचा तयारीत आहे. सरकार कुठल्याही प्रकारचा अभ्यास न करता हा निर्णय घेत आहे. आमचा याला विरोध आहे, असे नरहरी झिरवाळ यांनी ठणकावून सांगितले. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
तसेच, धनगर समाजाला आरक्षण देण्यावरून महायुतीच्या विरोधात असलेल्या नेत्यांनी आदिवासी आमदार आणि खासदारांची बैठक बोलविली आहे. या बैठकीत पुढील भुमिका काय असावी याची चर्चा केली जाणार आहे, असे झिरवाळ यांनी सांगितले. धनगर आणि धनगड या जाती वेगळ्या असल्याचे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे. तरीदेखील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून धनगर आरक्षणाचा जीआर काढत आहे, याला आमचा विरोध आहे.
धनगर आरक्षणाचा जीआर काढला तर मी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची घोषणाच काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी केली आहे. राज्य सरकारच्या या चुकीच्या निर्णयामुळे आमची मुलं रस्त्यावर येतील, असा आरोप खोसकर यांनी केला आहे.