दहावीच्या परीक्षेत 75 हजार विद्यार्थी
मराठी भाषा विषयात नापास झाली. बारावीत सुमारे वीस हजार विद्यार्थी नापास झाली आणि चक्क ही मुले महाराष्टातील माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातील आहे. त्यातील बहुतांश विद्यार्थ्यांची मातृभाषा ही मराठी आहे हे विशेष.
परीक्षेत नापास होणे याचा अर्थ शंभर गुणापैकी पस्तीस गुणापंर्यत देखील भाषेचे आकलन न होणे. खरेतर आता नव्या मूल्यमापनात कृतीपत्रिका आहे, त्यामुळे पाठयपुस्तकातील आशय पाठ करून उत्तरे लिहिणे अपेक्षित नाही. मुळतः नव्या मूल्यमापनात विद्यार्थ्याचे आकलन जितके समृध्द असेल तितके त्याचे शिकणे आणि गुण मिळविणे सुलभ होणार आहे. असे असतांना ही मुले चक्क मराठीत नापास होतात याची चिंता करावी अशी परीस्थिती आहे.
खरेतर पूर्वी दहावीचा निकाल इंग्रजी आणि गणित
या विषयात मिळणा-या गुणांवरती लागत होता. त्यामुळे त्या विषयाकडे गांर्भियाने लक्ष दिले जात होते. त्या विषयासाठी चांगले शिक्षक कसे मिळतील त्यासाठी प्रयत्न होत होते.हळूहळू या विषयाचे महत्व व काठिण्यपातळीची ओळख झाली आणि त्या विषयात विद्यार्थी नापास अधिक होत असल्यामुळे त्या विषयाच्या शिकवणी महानगरे आणि शहराबरोबर गावोगावी सुरू झाल्या.ते विषय विद्यार्थ्यासाठी अधिक लक्षपूर्वक अभ्यासाचे बनले. अलीकडे दहावीच्या निकालावर लक्ष टाकले तर मराठी भाषेत विद्यार्थी नापास होता आहेत. आपल्या राज्य भाषेत मराठीत ही मुले नापास होता आहेत हे अत्यंत चिंतनीय आहे. विद्यार्थी नापास होतात हे जितके चिंतनीय आहे, तितकेच स्वतःच्या मातृभाषेत,आपल्या राज्य भाषेत विद्यार्थी नापास होणे हे जास्त धक्कदायक आहे. घरची,परीसराची असलेली भाषा, जी विद्यार्थ्यांना दहा बारा वर्ष शाळा, महाविद्यालयात येऊनही प्राप्त होत नाही हे चिंतनीय नाही का ?
अलीकडे भाषेची शुध्दता समाजमाध्यमांच्या वापराने काहीशी अशुध्द
बनत चालली आहे. मराठीतील अनेक शब्द,वाक्य लिहितांना ती इंग्रजीत लिहिली जातात तेव्हा त्यांचे उच्चारातील गंमती तर नव्याने विनोद निर्माण करतात. मध्यंतरी एका एफ.एम वरती शुध्द मराठी एक मिनिट बोलायचे अशी स्पर्धा होती. तर चक्क कोणालाही ते बक्षीस मिळाले नाही. आपण सहजतेने आपल्या अवती भोवती बोलणे ऐकतो तेव्हा भाषेची हरवलेले अस्सलपण सहजतेने जाणवते. अलिकडे वाढत्या प्रसारमाध्यमांमुळे भाषेची भेळपूरी झाली आहे का ? असा प्रश्न पडतो. मागे एकदा एक विद्यार्थी आईला नव्या भ्रमणध्वनी बददल माहिती सांगत होता. तो म्हणाला,
‘आई, मोबाईलचे इनकमिंग लाईफटाईम फ्री आहे ‘.
यावाक्यातील आहे हे क्रियापद वगळले तर वाक्यातील चारही शब्द इंग्रजीतील आहे. आपल्या भाषेत जगभरातील विविध भाषेतील नवनविन शब्दांचा समावेश होण्याने भाषा समृध्द होत असते. पण दुस-या भाषेतील शब्द स्विकारतांना आपल्या भाषेतील शब्दसंपत्ती आटत तर चालली नाही ना याचाही विचार करण्याची गरज आहे. मुळात मराठी भाषेतील अनेक शब्द आणि त्या भाषेतील शब्दांच्या छटा देखील विद्यार्थ्यांपर्यत पोहचलेल्या नसतात. त्यामुळे समान अर्थाचे शब्द सुचित करतांना त्या शब्दात लपलेल्या छटा अधोरेखित करण्याची गरज असते.
अनेकदा समान अर्थ सांगितले जातात
पण त्याचा दडलेला अर्थ हरवला जातो. जसे नयन, डोळे हे समानार्थी शब्द आहेत,पण तरी त्यात अर्थ भिन्नता आहे. बायको, पत्नी, सौ यांच्यातील अर्थ शोधायला हवे की नको? पिणे आणि ढोसणे यात फरक आहे की नाही ? पण मराठी शिकतांना , शिकविताना शब्दांच्या अर्थामागे जाणे आणि शोध घेणे होत नाही.यातही ही एक गंमत आहे. ती गंमत विद्यार्थ्यांना पर्यंत पोहचण्याऐवजी केवळ पाठातील, कवितेत असलेले शब्द सांगून आशय पोहचविला जातो.मराठी भाषेत एकाच शब्दाला किती भिन्न अर्थ असतात हे आपण लक्षात घेतले, की भाषा शिकण्यात देखील सहज मज्जा येते.
‘ सर ‘ हा मुळचा इंग्रजी शब्द ,
मराठीत मात्रा त्याला विविध अर्थ आले. ‘ सर ‘ म्हणजे वर्गात शिकविणारे शिक्षक. स्त्रीच्या गळ्यात असलेले एक अलंकार म्हणजे ‘ सर’. आपल्या बाजूला बसलेले एखाद्या व्यक्तिला बाजूला व्हा असे सांगायचे असेल तर बाजूला ‘सर’ असे म्हणतो. पावसाची जोरदार येते ती ‘ सर ‘, अनेकदा तुलना करतांना देखील आपण सहजतने म्हणतो तुला कसलीच ‘ सर’ नाही. असे अनेक अर्थाचे शब्द मराठीत असतात. त्याचा अर्थ वाक्याच्या उपयोगाने जाणून घ्यावे लागतो. या गोष्टी मुलांना शब्दकोशात कशा सापडणार ? यासाठी अवांतर वाचन,व्यवहार,संवादाची गरज आहे. मुळतः पुस्तककेंद्रीत असणारे शिक्षण जीवनव्यवहाराशी जोडले जाण्याची गरज आहे.
शिक्षण प्रारंभी मुलांच्या भाषेत
होणे. परीसर भाषेत होणे. त्यांनंतर प्रमाणभाषेशी नाते सांगत शिक्षण सुरू ठेवणे महत्वाचे आहे. त्यादृष्टीने भाषा शिक्षण सुरू राहाणे महत्वाचे असते. मराठी हा विषय नाही , तर भाषा म्हणून तीचे अध्यापन होण्याची गरज आहे. भाषा समृध्दतेने शिकणे आणि शिकविण्यासाठीचे मार्ग व्यापक होण्याची गरज आहे. भाषा शिक्षणात प्रयोगशीलता देखील महत्वाची आहे.ती भाषा शिक्षकांनी अनुसरायला हवी. शेवटी निकाल भाषा शिक्षकांच्या अध्ययन अध्यापनावरती असतो हेही लक्षात घ्यायला हवे.
भाषा शिक्षण म्हणजे केवळ अक्षराची साक्षरता नाही.
भाषा शिकतांना असलेली कौशल्याची साध्यता होतांना त्यात शब्दांच्या, वाक्यांच्या मध्ये दडलेला अर्थ शोधणे असते. अनेकदा वाचन करतांना वाक्य भराभर वाचत जाणे होते,पण त्या वाक्याच्या मध्ये शब्द नसला तर मोठा अर्थ दडलेला असतो. तो अर्थ वाचता आला तरच वाचन आले असे म्हटले जाते. भाषा विविध अंगाने जाणणे घडण्यासाठी प्रयोगशिलता जोपासली जाण्याची गरज आहे. या मुलांना जेव्हा मराठी येत नाही याचा अर्थ त्यांना वाचलेल्या शब्दांचा, वाक्यांचा अर्थ लागत नाही. साधे अर्थ जाणता येत नसेल , तर ते जीवनाशी जोडून पाहाणे कसे घडणार हा खरा प्रश्न आहे.
साधा वाचनातील अर्थ ओळखता येत नसेल तर
चिंतन, मनन ही बाब दूर राहाते. त्यामुळे शिक्षणाच्या उद्दीष्टांची परीपूर्ती दूर राहाणारच. जीवनाचा अर्थ शोधण्याचा जो प्रवास शिक्षणात होतांना दिसत नाही, याचे कारण भाषिक कौशल्यांचे आत्मसाथीकरण होतांना दिसत नाही. जीवनात अपयश येण्याचे ते एक कारण आहे .कारण भाषा हीच व्यवहाराची आणि संवादाचे माध्यम असेल तर तीचे महत्व जीवनाच्या पातळीवर किती आहे हे जाणून घ्यायला हवे. भाषा हे समग्र शिक्षणाच्या केंद्रस्थानी असलेला विषय आहे .त्यामुळे भाषा शिक्षण होत नाही याचा अर्थ विद्यार्थ्यांचे शिक्षण होत नाही असाच होतो. त्यामुळे उद्या समाजात मराठी विषयासाठीच्या शिकवणी सुरू झाल्यातर नवल वाटायला नको. पण अशा स्वरूपात शिकवणी सुरू होणे हा मराठी विषयाचे अध्यापन करणा-या शिक्षकांचा पराभव असेल हेही लक्षात घ्यायला हवे.
मराठी विषयातील नापास विद्यार्थ्याची जबाबदारी
त्या विद्यार्थ्यावरती ढकलून पुढे जाता येईल, पण त्याचे मराठीतील नापास होणे म्हणजे त्याच्यासाठी नवा मार्ग निर्माण करणे असे पण नाही हे लक्षात घ्यायला हवे. शेवटी विद्यार्थी नापास होणे म्हणजे त्याचा पुढचा शैक्षणिक प्रवासाला अडथळा निर्माण होणे असते. कदाचित यातून शिक्षण खंडीत होईल. पण शिक्षण खंडीत होणे म्हणजे भविष्यातील एका कुंटुबाला आपण पुन्हा एका दारिद्रयाच्या सिमारेषेवर लोटणे आहे. या प्रश्नाकडे सामाजिक दृष्टीने पाहाणे गरजेचे आहे. विद्यार्थी नापास होणे याचा अर्थ शिक्षक नापास होणे हे भावना निर्माण झाली की आपोआप नव्या नव्या पाऊलवाटा निर्माण होतील. गरज दृष्टीत बदल करून उत्तरदायित्व निभावण्याचे…
_संदीप वाकचौरे
(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहेत )