मुंबई, दि. २३:- खेलो इंडिया युथ गेम स्पर्धेत पदक तालिकेत महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकाविल्याबद्दल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी म्हटले आहे की, ‘स्पर्धेत महाराष्ट्र सलग दुसऱ्या वर्षीही सर्वसाधारण विजेता ठरला आहे. ही बाब अभिमानास्पद आहे. या युवा खेळाडूंना यापुढेही अशीच चमकदार कामगिरी करता यावी यासाठी सर्वतोपरी पाठबळ दिले जाईल.’
केंद्रीय युवा आणि क्रिडा मंत्रालयाच्यावतीने आसाममधील गुवाहाटी येथे ९ जानेवारी पासून सुरु असलेल्या या तिसऱ्या खेलो इंडिया युथ गेम स्पर्धेत देशातील विविध राज्यातील सुमारे साडेसहा हजार खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेच्या अंतिम पदक तालिकेत आज महाराष्ट्राच्या खेळाडुंनी चमकदार कामगिरी करत तब्बल ७८ सुवर्ण पदकांसह २५६ पदकांची लयलूट केली. यात ७७ रौप्य आणि १०१ कास्यं पदक पटकाविली आहेत.
सुरवातीपासून महाराष्ट्राच्या संघाने पदक तालिकेत निर्विवाद अव्वल स्थान राखले होते. जलतरणपटूंनी मध्ये सर्वाधिक पदकांची कमाई केली आहे.
युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित या स्पर्धेत १७ वर्षांखालील आणि २१ वर्षांखालील युवा खेळाडूंना आपले क्रिडानैपुण्याच्या प्रदर्शित करण्याची संधी दिली जाते. त्यामुळे शालेय आणि महाविद्यालयीन स्तरातून पूढे येणाऱ्या युवा खेळाडूंसाठी ही स्पर्धा मोठी संधी ठरत आहे.
स्पर्धेत महाराष्ट्रातून ५९० खेळाडूंनी १९ क्रिडा प्रकारात आपल्या क्रिडा नैपुण्याची चुणूक दाखविली आहे. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक संचालनालयाने खेळाडुंकरीता उत्तम सुविधा पुरविल्या. तसेच सराव शिबीरांचे आयोजन केले. त्यामुळेच स्पर्धेत खेळाडूंनी दमदार कामगिरी करत पदकांचा द्विशतकी आकडा पार केला आहे.