Monday, May 20, 2024
Homeनाशिकउपोषणाचे हत्यार उगारताच 80 लाखांचा प्रस्ताव

उपोषणाचे हत्यार उगारताच 80 लाखांचा प्रस्ताव

पिंपळगाव ब. । Pimpalgaon Baswant (प्रतिनिधी)

निफाड तालुक्यातील कारसूळ येथील जुन्या पालखेड रस्त्याच्या कामासाठी उपोषणाचे हत्यार उगारताच 80 लाखांचा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच या रस्त्याचे भाग्य उजाळणार आहे.

- Advertisement -

निफाड तालुक्यातील कारसूळ येथील रस्त्याची अवस्था फार वाईट आहे. त्यातच कारसूळ ते जुना पालखेड रस्ता राज्य मार्ग-27ला जोडणारा (जाधव रिसोर्टजवळ निघणारा) रस्ता पावसाळ्यानंतर खराब असायचा. एखादा रूग्ण किंवा अंत्यसंस्कारासाठी मोठी गैरसोय व्हायची. परिणामी, अंत्ययात्रा स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी तीन गावांची शिव ओलांडण्याची नामुष्की नातेवाईकांवर यायची. तसेच शेतीमाल बाजार समितीपर्यंत नेण्यासाठी फार जिकरीचे होते.

याबाबत कारसूळचे माजी उपसरपंच देवेंद्र काजळे यांनी रस्त्यांसाठी अनेकदा लोकप्रतिनिधी व प्रशासनाला वारंवार पत्र, निवेदने देऊनही कार्यवाही झालेली नाही. माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी बोलावलेल्या 30 ऑक्टोबर 2017 च्या जनता दरबारात तत्कालीन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी आश्वासन देऊनही कार्यवाही झाली नाही.

हे निवेदन मिळताच 15 दिवसांमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सदर रस्त्याबाबत कार्यवाही सुरु करावी किंवा समाधानकारक खुलासा द्यावा, यावरही कार्यालयाकडून कुठल्याही प्रकारचा खुलासा झाला नाही.

तसेच 20 जानेवारी 2020 रोजी पालकमंत्री भुजबळ यांना निवेदन दिल्यानंतर समाधानकारक उत्तर मिळाले. पण यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. त्यामुळे काजळे यांनी 2 ऑक्टोबर 2020 रोजी आपल्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देताच नाशिक जिल्हा परिषद इवद विभाग क्र. 3 नाशिक अंतर्गत जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील अतिरिक्त गट ब सन 2019-2020 विशेष दुरूस्ती कार्यक्रमांतर्गत कारसूळ ते जुना पालखेड रस्ता सुधारणा करणे कि.मी. 0/00 ते 4/00 ग्रामा 315 यासाठी 80.00 लाख रुपयांचा निधी 1 कामांना मिळावा, असा प्रस्ताव मंजुरीस्तव ग्रामविकास व जलसंधारण विभागास पाठविल्याची माहिती काजळे यांना जिल्हा परिषद व उपविभाग निफाड यांच्याकडून पत्राद्वारे कळविण्यात आली आहे. त्यामुळे या रस्त्याचे भाग्य लवकरच उजाळणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या