सोनेवाडी (वार्ताहर)
कोपरगाव तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातल्यानंतर अनेक ठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्यात आले होते.वन विभागाने हिंगणी परिसरातही पिंजरा लावला होता. काल शुक्रवारी रात्री पावणे नऊ वाजता डॉ सौरव गोरक्षनाथ रोकडे यांच्या शेतात कोंबडीवर ताव मारण्याच्या नादात बिबट्या अखेर जेरबंद झाला.
धनराज पवार यांनी बिबट्या जेरबंद झाल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत घडलेल्या घटनेची माहिती दिली. बिबट्या पिंजऱ्यात अटकल्यानंतर त्याला बघण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी झाली होती. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन पुढील निर्णय घेणार आहेत. धनराज पवार यांच्या शेतात लावलेला पिंजरा बिबट्याच्या पाळदीवर राहून पारधी वस्तीवरील तरुणांनी हा पिंजरा डॉक्टर सौरव रोकडे यांच्या शेतात संध्याकाळी पाच वाजता हलवला.या पिंजऱ्यामध्ये दोन कोंबड्या ठेवण्यात आल्या होत्या. रात्री बरोबर पावणे नऊ वाजता बिबट्या रात्री भ्रमण करत असताना त्याला पिंजऱ्यात कोंबड्या दिसून आल्या. आणि या कोंबड्यावर ताव मारण्याच्या नादात तो अलगद पिंजऱ्यात अटकला. कोपरगाव तालुक्यात वन विभागाला बिबट्या पकडण्याच्या मोहिमाला मोठे यश आले आहे. जवळपास तीन ते चार बिबटे वन विभागाने आत्तापर्यंतचे जेरबंद केले आहे.
या परिसरात बिबट्याच्या धास्तीने नागरिक भयभीत झाले होते. या परिसरात बिबट्यांची संख्या जास्त आहे. दोन किंवा तीन बिबट्या असल्याचा अंदाज डॉ. गोरक्षनाथ रोकडे यांनी सांगितला. बिबट्या पकडला गेला आहे मात्र अजूनही दुसरा बिबट्या जेरबंद होऊ शकतो त्यासाठी या परिसरातील पिंजरा वनविभागाने हलवू नये अशी मागणी डॉ रोकडे व धनराज पवार यांनी केली आहे.




