पंचवटी । Panchvati
धुळेकडून नाशिककडे अवैधरित्या गांजाची तस्करी करणाऱ्या एकूण पांच जणांना आडगाव पोलिसांनी दहावा मैल येथे ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३२ किलो गांजा, एक स्विफ्ट डिझायर, रोख रक्कम, चार मोबाईल असा एकूण ९ लाख १७ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याबाबत अधिक महिती अशी की, आडगाव पोलिस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, धुळेहुन नाशिक मार्गाने मुंबईत गांजा विक्री करण्यासाठी काही जण स्विफ्ट डिझायर गाडीतून जाणार होते. त्या अनुषंगाने आडगाव पोलिस ठाणे अंतर्गत दहावा मैल येथे कोविड – १९ च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या नाकाबंदीच्या ठिकाणी पोलीस उपस्थित झाले.
शनिवार (ता.११) रोजी रात्री सुमारे सव्वा अकराच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख, गुन्हे शोध पथकांचे सहायक पोलीस निरीक्षक एस तोडकर, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र माळी, सहायक पोलीस उपनिरीक्षक दिलीप शिंदे,पोलीस हवालदार कहांडळ,जाधव, गौंगुर्डे, पोलीस नाईक कंदिलकर, सूर्यवंशी, घुगे, पोलिस शिपाई चासकर, वाल्मिक पाटील, वाहनचालक पोलिस हवालदार बेडकुळे व पोलीस शिपाई शरद ढिकले यांनी सापळा रचला.
यावेळी धुळे कडून नाशिक कडे आलेली स्विफ्ट डिझायर एम एच १८ ऐजे २१२३ थांबविली असता यातील वाहनचालक व त्यांचे साथीदारानी पलायन करण्याचा प्रयत्न केला. भिसन पावरा, भूषण भोई, राजेश पावरा, विकास पावरा, कमलसिंग पावरा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले .या संशयिताकडून ९ लाख १७ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एस डी बिडकर करीत आहेत.