Sunday, September 29, 2024
Homeधुळे9 लाखांची सुगंधीत तंबाखू, पानमसाला जप्त

9 लाखांची सुगंधीत तंबाखू, पानमसाला जप्त

धुळे । Dhule । प्रतिनिधी

जिल्हा पोलिस दलाकडून गुटखा तस्करी विरोधात कारवाईचे सत्र सुरू असून त्याचे नागरिकांनी स्वागत केले आहे. मात्र या सलग कारवाईमुळे गुटखा तस्करांसह विक्रेत्यांचेही धाबे दणाणले आहे. दरम्यान काल शिरपूर तालुका पोलिसांनी हाडाखेड चेक पोस्टवर गुटख्याची वाहतूक करणार्‍या हरियाणा पासिंगच्या ट्रकला पकडले. 10 लाखांचा ट्रक व 9 लाखांची सुगंधीत तंबाखू व पानमसाल्याचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी एकास ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मानवी सेवनास हानीकारक तसेच मानवी शरीरावर दुष्परिणाम करणारे कर्करोग सारखे दुर्धर आजार व मुत्युस निमंत्रणकारक अन्नपदार्थ, महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेली सुंगधीत तंबाखुजन्य पदार्थाची बेकायदा वाहतुक करणारा ट्रक (क्र. एच.आर. 55 ए.जी.1827) हाडाखेड सिमा तपासणी नाका येथे उभा असल्याची गोपनिय माहिती काल दि. 12 रोजी शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जयेश खलाणे यांना मिळाली. त्यांनी तत्काळ पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकाने पहाटे दीड वाजता हाडाखेड सिमा तपासणी नाका येथे जावुन ट्रकचा शोध घेतला.

वाहनाच्या कॅबीनमधील इसमाची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव इर्शाद सगीर अहमद (वय 24 घर नं.डी. 126, मस्जिद जवळ, लडमाकी 264, पलवल, हरियाणा) असे सांगितले. वाहनातील मालाबाबत विचारपुस केली असता उडवा-उडवीची उत्तरे देत असल्याने पथकाने त्यास ताब्यात घेत वाहन पोलीस ठाण्यात आणले. वाहनाची तपासणी केली असता त्यात 30 हजार 240 रुपये किमंतीचे रत्ना छाप तंबाखु नं.3000 चे एकुण 80 पाकीटे, 5 लाख 76 रुपये किंमतीचे रजवाडा पानमसाल्याचे एकुण 4 हजार 800 पाकीटे, 1 लाख 50 हजार रुपये किंमतीचे आरजेडी जर्दा सुंगधित तंबाखुचे 5 हजार पाकीटे, 1 लाख 62 हजारांचे सुंगधीत तंबाखुच्या 180 पिशव्या मिळून आल्या. असा 9 लाख 18 हजार 240 रूपयांचा गुटखा व दहा लाखांचा ट्रक असा एकुण 19 लाख 18 हजार 240 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन इर्शाद सगीर अहमद याच्याविरोधात शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात भादंवी कलम 328, 272, 273, 188 सह अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 चे कलम 26 (2) (आयव्ही), 27 (3) (ई), 27 (3) (डी), 3 (1) (झेडझेड) (आय), 3 (1) (झेडझेड) (व्ही) व व 59 (आय) चे उल्लंघन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोसई संदीप पाटील हे करीत आहेत.

या पथकाची कामगिरी

ही कामगिरी पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि जयेश खलाणे, पोसई संदीप पाटील, पोकाँ योगेश मोरे, संतोष पाटील, शिवाजी वसावे, कृष्णा पावरा, इसरार फारुकी यांच्या पथकाने केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या